जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday 26 December 2010

सुरळीच्या वड्या (उर्फ खांडवी)

सुरळीची वडी हा माझा अतिशय आवडता पदार्थ. मुंबईत असताना ह्या सहजा सहजी फरसाणवाल्याच्या दुकानात मिळायच्या. त्यामुळे सहसा त्या बनवण्याच्या भानगडीत पडलो नाही. फक्त एकदा जेव्हा घरी नवा मायक्रोवेव्ह घेतला होता तेव्हा हा प्रयोग मी मागे १० वर्षांपुर्वी केला होता. सुदैवाने तेव्हा घरात कुणी नव्हत. गुणी बाळा सगळ किचन नीट आवरुन ठेवल होतं. तरी आईला शंका आलीच की मी काही तरी उपद्व्याप करुन ठेवला आहे म्हणुन.
कारण किचन जरा जास्तच चकचकीत दिसत होत. :)

सध्या इथे परदेशात माझ्या या आवडत्या पदार्थाच दर्षनही दुर्लभ झालय. त्यामुळे अंगातला किडा स्वस्थ बसु देईना. ऑफिसमध्ये थोडी उसंत असताना, थोड गुगलुन पाहील. एक -दोन सोप्प्या पाककृती टिपुन घेतल्या आणि ठरवल की आज ही मोहीम फत्ते करायचीच.

पुढे सचित्र कृती देत आहे. जेणे करुन माझ्या सारख्या नवशीक्या हौशी खवय्यांना सोप्प जाव.

सर्वप्रथम लागणारा कच्चामाल.


१ वाटी चण्याच पीठ. (बेसन)
१ वाटी दही . (घरातल दही संपल होत म्हणुन वाटीत कमी दिसतय )
१ वाटी पाणी.
१/२ चमचा हळद.
१/४ चमचा हिंग.
१/२ चमचा आल लसणाची पेस्ट
मीठ चवीनुसार
सजावटी साठी : नारळ, कोथिंबीर.
फोडणी साठी : तेल, मोहरी, हिरवी मिरची.

कृती :

बेसन, दही, पाणी एकत्र करुन त्यात हळद, मीठ, हिंग , आल लसणाची पेस्ट टाकुन चांगले फेटाव.


गुठळ्या होउ देउ नये. म्हणुन मी सगळ मिश्रण मिक्सर मध्ये घातल.


जाड बुडाच्या पातेल्यात थोड तेल तापवाव.


तयार मिश्रण त्यात टाकुन मंद आचे वर शिजत ठेवाव. सतत ढवळत रहाव, कारण पुन्हा गुठळ्या होण्याची दाट शक्यता असते.



मिश्रण शिजत आल की लगेच एका अ‍ॅल्युमिनीयम फॉईल वर हे मिश्रण कलथ्याने पसरवावे.



साधारण ५ मिनिटांनी गार झाल्यावर सुरीने (एक ते दिड इंच रुंदीचे) उभे चर पाडावे.



अलगद हाताने रोल करुन वड्या बनवाव्या.



वरुन नारळ कोथिंबीर पेरावी.
मोहरीची फोडणी करुन वरुन तडका द्यावा.
फोडणी करताना त्यात हिरवी मिरची कापुन टाकल्यास तिचा थोडा तिखट पणा तेलात उतरतो.

1 comment:

  1. अगदि सुंदर.. कशा छान जमल्यात..

    ReplyDelete