जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday 26 December 2010

मेथी चिकन

आज रविवार म्हणजेच कोंबडीचा दिवस:)
नेहमीच तेच ते कोंबडीच सुकं आणि त्याच त्याच पद्धतीचा कोंबडी रस्सा खाउन मित्र कंटाळले होते. त्यामुळे काही तरी नव करण्याची सगळ्यांची इच्छा उफाळुन आली. फ्रिज उघडुन कच्च्या मालाची पहाणी केली. मेथीची जुडी दिसली. सर्वानुमते मेथी चिकन कराव अस ठरलं. वासरांत लंगडी गाय शहाणी असल्याने मला भलताच भाव होता. आणि मी ही आयतेच ३-४ गिनीपिग हाती लागले म्हणुन खुष. म्हट्ल करु नविन प्रयोग.

एखाद्या शेफच्या थाटात मी पटापट मित्रांना फर्मानं सोडली.
एकाला २ टोमॅटो, २ कांदे बारीक कापायला लावल.
दुसर्‍याला मेथी धुवुन चिरायला बसवल.
तिसर्‍याला कोंबडी साफ करायला लावल.
आल लसुणाची पेस्ट हाती होतीच.

सर्व सिद्धता झाल्यावर मी सुत्र हाती घेतली.

कोंबडीला मीठ, हळद, आल लसुण पेस्ट, थोडा मसाला लावुन १/२ तास फ्रिज मध्ये मुरत ठेवल.



एका भांड्यात २ डाव तेल गरम केलं. तेल कडकडीत तापल्या वर त्यात चिरलेला कांदा गुलाबी होइस्तव परतुन घेतला. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकुन परत २ मिनिट परतुन घेतल. त्यात १ चमचा मसाला टाकुन तेल सुटे पर्यंत चांगला परतला. मग त्यात मेथी टाकली. चवी नुसार मीठ टाकल. भांड झाकुन १ दणदणीत वाफ आणली. (मेथी झाकणे ही मोठी घोडचुक होती हे मागाहुन कळलं. कारण मेथी शिजताना झाकली की कडु होते.)



नंतर त्यात मुरवलेल्या कोंबडीचे तुकडे टाकले . नीट ढवळुन आच मध्यम करुन १०-१५ मिनीटं शिजत ठेवलं.

चाखुन पाहिलं तर इतक कडु की तोंडात घेवेना. हातशी नारळ होताच.
लगेच १/२ नारळ वाटुन त्याच दुध झालेल्या पदार्थात टाकल. झक्कास उकळी आणली.
पण हे सगळ इतक सफाईने चेहेर्‍यावरचे भाव न बदलता केलं की मित्रांना वाटल हा प्रकार माझ्या पाककृतीचाच एक भाग आहे.

2 comments:

  1. ""पण हे सगळ इतक सफाईने चेहेर्‍यावरचे भाव न बदलता केलं की मित्रांना वाटल हा प्रकार माझ्या पाककृतीचाच एक भाग आहे.""
    HA HA

    ReplyDelete