लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत गावालाच मुक्काम असायचा. दुपारी उकाड्याने जिवाची नुसती काहीली काहीली व्हायची (फ्रिज वगैरे लाड तेव्हा गावाला नव्हते) आणि तेव्हा तो देवदुता सारखा यायचा. मगन आईस्फ्रुटवाला. त्याच्या कडे १० पैश्यांपासुन ते १ रुपया पर्यंतची वेगवेगळी आईस्पृटं/ कुल्फ्या असायच्या. लांबुनच त्याच्या सायकलची घंटी (देवळात असते ना तशी घंटा) कानी आली की आम्ही धुम घरात पळायचो. आजीच्या मागे कटकट करुन शेवटी २०-२५ पैसे पदरात पाडुन घ्यायचो. पण तो वर तो पठ्या पुढे निगुन हेलेला असायचा. मग माकडा सारख्या उड्या मारत आम्ही त्याच्या मागावर जात असु. पण एवढ्या कडक उन्हात फक्त एक कुल्फि खाउन कुणाच भागतय. उगाच रसना चाळवायची आपली झालं. परत आजी कडे जायची सोय नसायची. मग मोर्चा मामाच्या घरी (आजोळपण त्याच गावात आहे.) मग आईच्या आईला मस्का मारायचो . दुधापेक्षा दुधावरची साय प्रिय असल्याने आजी जास्त आढेवेढे न करता पैसे द्यायची. मग आमची स्वारी थेट मगनभाईच्या पुढ्यात. तो मस्त पैकी पळसाच्या पानावर कुल्फीचे तुकडे कापुन द्यायचा. आहा हा हा काय सुख असायच ते काय सांगु?
बालपण सरलं. जस जसे मोठे होत गेलो तस तसं त्या आईस्फ्रुटाची जागा पेप्सीकोलाने घेतली. कुल्फी मात्र अजुन तग धरुन होती. पुढे पुढे मगनभाईपन यायचा बंद झाला, दुसरा कोणी तरी यायचा पण मगनभाईच्या कुल्फीची सर त्याला नव्हती.
हल्ली बाजारात तर रेडिमेड कुल्फी मिळते, कुल्फी मिक्स् पण मिळते.
तर मग काय करायची का आज कुल्फी
एकदम सोप्पी आणि झटपट कृती आहे. प्रयत्न करुन पहा.
साहित्यः
१५० ग्रॅम कंडेंस मिल्क.
१५० ग्रॅम क्रिम.
१२० ग्रॅम दुधाची भुकटी (मिल्क पावडर).
५० ग्रॅम साखर.
सुका मेवा (काजु बदाम पिस्ता मनुका)
केशर.
कृती:
सुक्या मेव्याचे बारीक तुकडे करुन घ्यावे.
साखर आणि केशर मिक्सर मध्ये वाटुन घ्यावे.
एका मोठ्या भांड्यात कंडेंस मिल्क+ भुकटी + क्रिम + साखर एकत्र करुन चमच्याने फेटुन घ्यावे.
मग त्यात सुका मेवा टाकावा. आणि परत एकदा फेटावं.
तयार मिश्रण लहान कप मध्ये ओतुन वरुन अॅल्युमिनियमच्या कादगाने बंद करावं.
आणि मग ते कप फ्रिजर मध्ये किमान ४ तास थंड करत ठेवावं.
सर्व्ह करताना वरुन परत थोडासा सुका मेवा टाकावा.
काय मग? करतायना आज
superb
ReplyDelete