जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday 4 October 2016

चॉकलेट मूस.






    चॉकलेट मूस हा पदार्थ जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता तेव्ह तो दिसायला केकसारखा वाटला होता. गोडाचा फारसा चाहता नसल्याने खावं की न खावं या विचारात होतो. मनाचा हिय्या करुन एकदाचा चमचा उपसला आणि त्या पदार्थावर ठेवला तर एकदम लोण्याच्या गोळ्यावरुन वर तापलेली सुरी फिरवावी तद्वत तो आत शिरला. इतकं सॉफ्ट... क्षणभर वाटलं अरे हे आईस्क्रिम तर नाही ना?
    पहिला चमचा तोंडात गेला तो एकदम लख्ख स्वच्छ होऊनच बाहेर आला. त्या क्षणापासुन आस्मदिक या डेझर्ट्चे दिवाने झालो. पदार्थ चवीला येवढा भारी म्हणजे त्याची बनवण्याची कृती तेवढीच क्लिष्ट असणार असं समजून आजवर याच्या वाटे गेलो नव्हतो. परवा सहज म्हटलं पाहू तरी काय कौशल्य पणाला लावावं लागतं या आवडत्य पदर्थासाठी आणि म्हणून रेसीपी शोढून काढली. मग मनात विचार आला अरेच्चा इतका सोप्पा पदार्थ आपण या पुर्वी का बरं नाही ट्राय केला? खोटं वाटतय ना? चला तर मग दाखवतोच तुम्हाला किती सोप्पा आहे हा पदर्थ.

साहित्यः


३०० ग्रॅम चॉकलेट
२०० ग्रॅम क्रिम
२ अंड्यांचा पांढरा भाग
डार्क चॉकलेट (मर्जीनुसार आवडत असल्यास - सजावटीसाठी)
१५-२० चॉकलेट बिस्कीट
थोडी पीठी साखर
(जिलेटीन वापरल्यास मुस केक सारखा उभा राहू शकतो, कप मधेच सर्व्ह करणार असाल तर हा पदार्थ वगळला तरी चालेल)

कृती :



बिस्कीटं मिक्सरमध्ये फिरवून त्याचा चुरा करुन घ्यावा.



हा बिस्किटांचा चुरा ज्यात मूस सर्व्ह करायचय त्यात भांड्यात खाली दाबून भारावा. फार जाड थर नको १/२ सेंटीमिटर पुरे.



चॉकलेट ओव्हनमधे दिड ते दोन मिनीटं गरम करुन घ्यावं. (प्रत्येक ओव्हनचं हिटींग वेग वेगळ असल्याने एखाद मिनीटानंतर उघडून बघावं.) जर ओव्हन नसेल तर सरळ एका खोलगट भांड्यात पाणी उकळवावे त्यावर दुसरं भांडं ठेऊन त्यात चॉकलेट वितळवून घावं. चॉकलेटच्या भांड्याच स्पर्श खालच्या भांड्यातल्या उकळत्या पाण्याला होणार नाही याची दक्षता घ्या.


क्रिम फेटून घ्यावं. त्यात चवीनुसार थोडी पीठी साखर टाकावी.
फेटलेलं क्रिम वितळलेल्या चॉकलेटमधे टाकून ते ही फेटून घावं. गुठळ्या रहाणार नाही याची काळजी घ्या.
(जिलेटीन वापरायचं झाल्यास चमचा भर जिलेटीन २-३ चमचे पाण्यात विरघळवून ते क्रिमसोबत चॉकलेट्मध्ये फेटुन घ्यावं.)


अंड्यांतला बलक वेगळा काढुन उरलेला भाग तो आगदी हलका होईस्त्व फेटून घ्यावा.



फेटलेलं अंड अलगदपणे चॉकलेटमधे चमच्याने एकजीव करुन घ्यावं. शक्यतो हातानेच करावं. बीटर/ब्लेंडर वापरु नये.



तयार झालेलं मिश्रण डावाने/चमच्याने सर्व्हिंग भांड्यात सोडावं.



आवडत असल्यास डार्क चॉकलेट वितळवून वरून त्याचा पातळसा थर द्यावा.
त्यार सर्व्हिंग्स फ्रिजमध्ये २-४ तास सेट करायला ठेवावं.

Sunday 3 July 2016

बैदा रोटी

गेल्या वर्षी पावसाळ्यातच एके रात्री बडेमियाँला भेट दिली. त्यावेळी हा पदार्थ पहिल्यांदा चाखला. खरपूस भाजलेली ती बैदा रोटी अन रिमझिम बरसणारा पाऊस कायम आठवणीत राहिल.
काल ते जुने फोटो चाळताना, लेकीने फरमाईशवजा प्रश्न टाकला 'बाबा तुला बैदा रोटी येते का रे?'
गेले दोन आठवडे इथे पाऊस ठाण मांडून बसलाय. मनात म्हटलं मौका है, मौसम भी है, फिर दस्तुर तो निभानाही पडेगा ना. :)
साहित्यः
रोटीसाठी

१ कप मैदा.
१ लहान चमचा मीठ.
१ अंडे
२-३ चमचे तेल.
सारणासाठी

२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ लहान चमचे जीरं पुड, धणे पुड, लाल तिखट, मसाला, तेल, आलं-लसुण वाटण प्रत्येकी.
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आवडी नुसार.
१/२ किलो खिमा.
२ अंडी.

पातीचा कांदा आणि टॉमेटो. (आवडत आसल्यास.)
कृती :


एका भांड्यात मैदा चाळून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ घालून, एक अंडे फेटुन घालावे. थोडे थोडे पाणी घालत मैदा मळून घ्यावा.
(मी अंड घालायला विसरलोय हे लेकीने नजरेस आणून दिले. )
मैदा ओल्या कापडाखाली झाकून, सारणाच्या तयारीला लागावे.

कढईत तेलावर कांदा मिरची परतून घ्यावी. आलं-लसणाचं वाटण टाकून त्याचा कच्चट वास जाई पर्यंत परतावं.

कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात सर्व मसाले टाकून बाजून तेल सुटेपर्यंत परतावं. चवीनुसार मीठ घालावं.
नंतर त्यात खिमा टाकून मोठ्या आचेवर ४-५ मिनिटं ढवळावं. खिमा अन मसाला व्यवस्थित एकजीव झाला की आच लहान करावी. भांड्यावर झाकण ठेवून खिमा शिजवून घ्यावा.

झणझणीतपणा वाढवण्यासाठी मी २ चमचे कोल्हापुरी मसाला टाकला. झाकण काढल्यावर जर आत पाणी सुटलं असेल तर आच वाढवून पाणी आटवावं. वरुन कोथिंबीर पेरुन गॅस बंद करावा.

दोन अंडी फेटून बाजूला ठेवावी. आवडीनुसार पाती कांदा, टॉमेटो बारीक चिरुन ठेवावा.


ओट्यावर थोडं तेल लावून त्यावर मैद्याचा एक लहान गोळा ठेवून हाताने त्याची पातळ रोटी करावी.
त्यावर डाव-दोन डाव(मोठा चमचा) खिमा पसरवावा. टॉमेटो, पातीच कांदा टाकावा. त्यावर २-४ चमचे फेटलेलं अंडं घालावं.
रोटीच्या कडा आत मुडपून हवा तो आकार द्यावा.

ही रोटी अलगद उचलून तापलेया तव्यावर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावी.
गरमागरम बैदा रोटी, आवडीच्या डीप सोबत सर्व्ह करावी.

आंब्याचा बदामी हलवा

नमस्कार मंडळी,
  एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे.
साहित्यः

२ वाट्या आमरस, १ वाटी कॉर्न स्टार्च, २ वाट्या साखर (आमरसाच्या गोडीनुसार कमी जास्त)

सुका मेवा (काजू, बदाम) , केसर, वेलची पूड, साजुक तूप
कृती :

एका नॉनस्टिक कढईत २ चमचे तूपात आमरस घालून परतावा.

एक उकळी आली की कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून टाकावं व गुठळ्या न होऊ देता ढवळत राहावं. रस थोडा दाटसर
झाला की त्यात साखर टाकावी.

मधे मधे चमचाभर तूप सोडत रहावं. आणि मिश्रण उलथण्याने हलतं ठेवावं. यामुळे त्यात हवेचे बुडबूडे तयार होत राहतील. ही प्रक्रिया किमान ४०-५० मिनिटे चालू ठेवावी.

जेव्हा कडेने तूप सुटू लागेल तेव्हा त्यात सुक्यामेव्याचे काप, वेलचीपूड, केशर टाकावे.

जेव्हा मिश्रण एकजीव गोळा होईल तेव्हा हलवा शिजत आला असे समजावे. जितका जास्त वेळ शिजवू तेवढा तो चिवट होत जाईल.

एका पसरट भांड्याला तुपाचं बोट लावून त्यात मिश्रण किमान २-४ तास थंड करत ठेवावं. लवकर थंड करण्यासाठी फ्री़जचा वापर टाळावा. थंड झाल्यावर सुरीने काप करावे.