जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Thursday 27 October 2011

दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू

नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!!
दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू.
तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.

साहित्य :



२ वाट्या बेसन.
३/४ वाटी वितळलेल तुप.
१/४ वाटी चण्याची डाळ.
३/४ वाटी बारीक साखर / पिठी साखर
२-४ चमचे दुध.



१ लहान चमचा वेलची पुड
आणि आवडी नुसार काजु तुकडा , बेदाणे, चारोळ्या आदी सुका मेवा.

कृती :

बेसनाचे लाडु खाताना बरेच वेळा टाळ्याला चिटकुन बसतात आणि माझा विचका करतात. त्यामुळे माझी आई निव्वळ बेसन वापरण्या पेक्षा चण्याची डाळच भाजुन ती गीरणीवाल्या कडुन थोडी भरड वाटुन आणत असे. भारतात असेल तर ठिक आहे पण परदेशात असण्यार्‍यांनी आता पीठाची गिरणी कुठे शोधायची. त्यावर तोडगा म्हणुन मग मी थोडी चण्याची डाळ वापरतो.



चण्याची डाळ कोरडी भाजुन घ्यावी. थोडीशी डागाळायला लागली बाजुला काढुन ठेवावी.
गार झाल्यावर मिक्सर मध्ये थोडी भरड(रवाळ) वाटुन घ्यावी.



नॉनस्टीकच्या कढईत वितळवलेले तुप घेउन त्यात बेसन आणि डाळीच रवाळ पीठ टाकुन मध्यम आचेवर किमान २५-३० मिनिटं चांगल खरपुस भाजाव. सुरवातीला घट्ट दिसणार मिश्रण नंतर तुप सोडु लागल की थुलथुलीत दिसायला लागेल.



कढई गॅसवरुन उतरवुन मग त्या मिश्रणावर दुधाचा हबकारा मारावा. दुधामुळे मिश्रण लगेच फसफसुन येईल. ते चांगल ढवळुन घ्याव. आणि लागलीच एका वेगळ्या भांड्यात काढुन घ्याव.



साधारण १५-२० मिनिटां नंतर जेव्हा मिश्रण थोड गार होईल तेव्हा त्यात वेलची पुड आणि सुकामेवा टाकावा.
बरेच वेळा लाडू वाळुन झाले की मग वरुन एखादा बेदाणा, काजु लावुन तो सजवतात मला तो प्रकार आवडत नाही. हे म्हणजे काय की आमच्या लाडुत सुकामेवा आहे बरका अशी जाहिरात केल्या सारख झाल. Wink
सुकामेवा कसा लाडूखाताना मध्येच दाता खाली येउन सरप्राईज मिळायला हवं. जर एखादा जास्त पुण्यवान असेल त्याला मिळतील २-३ सुक्यामेव्याचे तुकडे. Wink असो हे झाल माझं मत.
तर सुकामेवा टाकुन झाल्यावर त्यात बारीक साखर नाहीतर सरळ पिठीसाखर टाकावी आणि मिश्रण एकत्र करावे. साखरेचे कण जेव्हा दाताखाली येतात तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा रवाळपणा लाडुत येतो जो मला खुप आवडतो.

नंतर लगेच आवडत्या आकारात लाडू वाळुन घ्यावे.



ही आमची वाढीव स्टेप.
चित्र फितीत दाखवल्या प्रमाणे एका बाऊल मध्ये दिड चमचा बारीक साखर घ्यावी. त्यात एका वेळी एक करत लाडू घोळवून घ्यावा. थोडासा हातात फिरवुन जास्तीची लागलेली साखर काढुन टाकावी.
आणि हे आहेत तयार बेसनचे लाडू.



Smile


~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

दुसरे जे लाडू करणार आहोत ते फारच सोप्पे आणि अगदी १५-२० मिनिटात होण्यासारखे आहेत.
मुख्य म्हणजे जेवढे करायला सोप्पे तेवढे चवीत अफलातुन Smile
चला तर सामान गोळा करु या.
खोबर्‍याचे लाडू.

साहित्य :



२ वाट्या डेसिकेटेट नारळ.+ १/४ वाटी बाजुला काढुन ठेवावा
१/२ वाटी पेक्षा थोड कमी क्रिम.
१/२ वाटी कंडेन्स्ड दुध.
१ चमचा वेलची पुड.
चीमुट्भर मीठ (ऑप्श्नल.)
बेदाणे

कृती :



नॉनस्टीक कढईत खोबर मध्यम आचेवर गुलाबी-सोनेरी रंगावर भाजुन घ्याव.



आच मंद करुन खोबर्‍यात क्रिम आणि कंडेंन्स्ड दुध टाकुन मिश्रण चांगले एकत्र करुन घ्याव.



५-१० मिनिटांनी आच बंद करुन वरुन वेलची पुड आणि बेदाणे मिश्रणात टाकावे.



मिश्रण गरम असतानाच पटापट लाडू वाळुन घावे आणि खोबर्‍याच्या चुर्‍यात घोळवुन घ्यावे.
हे आहेत तयार खोबर्‍याचे लाडू.



Smile







शुभ दिपावली.


Wednesday 19 October 2011

कॅरमलाईज्ड चिकन

             कालच विजुभौंनी एक खरड केली होती की नॉन व्हेज मध्ये गोड पदार्थ नसतात का? तर त्यांच्या या शंकेच निरसन करण्यासाठी म्हटल आपणच आधी एखादा पदार्थ बनवुन पहावा. झाला बरा तर मग कळवाव.
तस चिकन मटण म्हटलं की ते जर झणझणीत, मसालेदार नसेल तर मी फारसा त्याच्या वाटे जात नाही.
मी मधात घोळवुन रोस्ट केलेली कोंबडी नुसती बघितली आहे. पण ती चाखायची तेव्हा हिंमत झाली नव्हती. चिकन आणि ते ही गोड??? नोऽऽऽऽऽ वे.

             पुढेमागे जालावर फिरताना, काही टिव्ही वरचे कुकिंगचे कार्यक्रम पहाताना त्यात फळांच्या रसात मुरवुन वा शिजवताना फळांचे रस वापरुन केलेले काही नॉनव्हेज पदार्थही पाहिलेही. पण वाट वाकडी करुन तिथे जाण्याच धैर्य कधी झालं नाही.

             पण आज विजुभौंच्या निमित्ताने मुद्दाम वाट वाकडी केली आहे. नेहमीच्या झणझणीत चिकन पेक्षा जरा वेगळी चव. तुमच्या चिल्लर्पार्टीला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
दोन पदार्थ आहेत. एकात बेकन (डुक्कराच मांस) वापरलय तर एकात केवळ चिकन.

साहित्य : 




१/२ किलो बोनलेस चिकन. १ इंचाचे तुकडे केलेल.



१/४ ते २/३ वाटी ब्राउन शुगर. (चॉललेटी रंगाची साखर.)
१ चमचा आल पेस्ट.
१ चमचा लसुण पेस्ट.
२ चमचे भरड वाटलेली लाल मिर्ची किंवा चीली फ्लेक्स.
१ चमचा ऑलिव्हच तेल.
१/२ कप पाणी.

कृती :



चिकनला ओलिव्हच तेल, आल-लसुण पेस्ट आणि लालतिखट लावुन १५-२० मिनिटं मुरत ठेवाव.



नॉनस्टिकच्या कढईत साखर आणि १/४ कप पाणी टाकुन एक उकळी आणावी.



पाकाला उकळी आली की त्यात उरलेल १/४ कप पाणी आणि मुरवलेल चिकन टाकुन एकत्र करुन घ्याव.
वरुन एखाद झाकण ठेवुन एक वाफ काढावी.
वाफ काढुन झाल्यावर झाकण काढुन, आच मंद करुन, उरलेल पाणी आटु द्याव.

गरमा गरमच असतानाच वाढाव.


~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

दुसरा प्रकार : (बेकन वापरुन.)


साहित्यः

३०० ग्रॅम बोनलेस चिकन. १ इंची तुकडे केलेल.



१/२ वाटी ब्राउन शुगर.
२ मोठे चमचे पेपरीका / नसल्यास लाल तिखटही चालेल.
२ चमचे ऑलिव्ह तेल.



बेकन.

कृती :



चिकनच्या तुकडयांना ऑलिव्हच तेल, साखर आणि पेपरिका मध्ये घोळवुन घ्याव.
१५- २० मिनिटे मुरत ठेवाव.




बेकनच्या पट्ट्यांनाही याच मिश्रणाचा लेप द्यावा.



एका पट्टीचे मधोमध कापुन २ तुकडे करावे. चिकनचा एक तुकडा मध्ये ठेवुन रोल करावा आणि आधारासाठी टुथपीकने टोचुन ठेवाव.



बेकिंग ट्रेला अ‍ॅल्युमिनियची शीट लावुन वरुन तेलाच बोट फिरवाव. त्यात हे रोल्स रचुन ओव्हनमध्ये २००° C वर ३० ते ४० मिनिटे शिजवावे. मध्ये एकदा वर खाली करावे.

या तर मग हाणायला बेकन चिकन.







Monday 10 October 2011

तंदुरी विंग्ज्

गेल्या आठवड्यात माझा मित्र प्रभो याने तंदुरी विंग्जचे जीव घेणे फोटो आणि पाककृती टाकुन मला ईनो घेण्यास भाग पाडले. पण ईनो घेउनही समाधान नाही. त्यामुळे या विकांती हा भारी पदार्थ बनवून क्षुधा शांती केली गेली.

साहित्य :



१ लहान चमचा लाल तिखट.
१/२ लहान चमचा हळद.
२ चमचे घट्ट दही.
२ चमचे तंदुर मसाला. (मी एव्हरेस्टचा वापरलाय)
१.५ चमचा आल लसुण वाटण.
१ चमचा घरचा मसाला ( ऑप्शनल.)

आवडत असल्यास तंदुरचा केशरी रंग चिमुट भर.
मीठ चवी नुसार.
थोडस बटर किंवा तेल.



१०-१२ विंग्ज् (अर्धे कापले की २०-२४ पीस होतात .)

कृती :

सगळे मसाले एकत्र करुन घ्यावे.



चिकनचे विंग्ज् वर एकत्र केलेल्या मसाल्यात किमान २-३ तास मुरत ठेवावे.



बेकिंग ट्रेला अ‍ॅल्युमिनियम फॉईल लावुन त्यावर तेलाच वा बटरच बोट लावुन घ्याव.
चिकनचे तुकडे एक मेकांपासुन थोड्या अंतरावर पसरवुन घ्यावे.
ओव्हन १८० ते २०० °C वर ठेवुन त्यात ३० ते ४० मिनिटे शिजवावे.
मध्ये एकदा सगळे तुकडे उलटुन घ्यावे. वरुन ऑईल स्प्रे /बटरचा ब्रश  फिरवावा.
शेवटची ८-१० मिनिट ब्रॉईल मोडवर ठेवाव.


Sunday 2 October 2011

हांडवो (बेक्ड्)

साहित्यः

१ वाटी तांदुळ.
१/४ वाटी चणा डाळ.
१/४ वाटी मुग डाळ.
१/४ वाटी तुर डाळ.
१/२ वाटी उडिद डाळ.
१/२ वाटी दही. (आंबट असल्यास उत्तम.)



दुधी किसलेला. (पाणी काढुन.)
कोबी बारीक चिरुन.
(तुमच्या आवडी नुसार गाजर आणि अन्य भाज्या सुद्धा चालतील.)
१ ते दिड इंच आलं.
२-४ हिरव्या मिरच्या.



१ चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा हळद.
साखर-मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी :
तेल, राई, तिळ, हिंग.

कृती: 



तांदुळ आणि सगळ्या डाळी स्वच्छ धुवून किमान २-३ तास भिजत ठेवाव्या.
आल मिरची, भिजवलेले तांदुळ आणि डाळी थोड्या भरड वाटुन घ्याव्या. (ईडलीच्या पिठापेक्षा किंचीत दाट.)
दही टाकुन मिश्रण ढवळुन घ्याव.
उबदार ठिकाणी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवाव.



मीठ, साखर, हळद, लाल तिखट, किसलेला दुधी आणि कोबी टाकुन मिश्रण चांगल एकत्र करुन घ्याव.



राई, तिळ, हिंग टाकुन फोडणी करावी. आणि त्यातली १/२ ह्या मिश्रणात टाकावी.



बेकिंगच्या भांड्याला तेला/तुपाचा हात लावुन घ्यावा. आणि हे मिश्रण त्यात ओताव. (साधारण १.५ ते २ इंच जाडीचा थर ठेवावा.)
राहिलेल्या फोडणीत १/४ चमचा लाल तिखट टाकुन ती वरुन टाकावी.



ओव्हन १८० ते २०० °C वर ठेवुन त्यात हा हांडवो ३० ते ४० मिनिटे बेक करावा.

ओव्हन नसल्यास नॉन्स्टीकच्या फ्राइंगपॅनमध्ये मंद आचेवर १५ मिनिटे शिजवाव. आणि मग उलटुन परत १५ मिनिटे शिजवाव.
बेक करायचा नसल्यास ढोकळ्या प्रमाणे उकडूनही करता येतो. (पण चवीत फरक पडतो.)





चटणीसोबत वा दुपारच्या वाफाळत्या चहासोबत हांडवोचा आस्वाद घ्यावा.