जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday 28 December 2010

सुकं मटण / (व्हेज व्हर्जन)

गेल्या महिन्यात छोट्याश्या सुट्टीत घरी जाउन आलो. नेहमी जायच्या आधी माझं आणि बहीणचही आठवडाभर प्लॅनिंग असत की आईच्या हातच काय काय खाउन घ्यायच. शक्यतो इथे परदेशात न मिळणारे मासे आणि भाज्या. (शक्यतो मासेच. कोंबडी / मटण टाळतो , ते काय इथेही खातोच नेहमी)
वर्षभर वजन कमी करण्याचे प्रयत्न करणारे आम्ही दर सुट्टीत हटकुन १-२ किलो वजन वाढवुन येतो.
यावेळी काही दिवस गावालाही जायला मिळाल. तिकडे बोंबील, निवट्या, घोळीच/दाढ्याचं खार(काटा), काटेरी, पापलेटं मनसोक्त खाल्ले.

दोन दिवस सासुरवाडीला ही भेट देउन आलो. आमच्याकडे एक आहे की पाहुणा आला (आणि त्यात तो जावई असला) की त्याला कोंबडी /मटण खाउ घातल्या शिवाय पाहुणाचार झाला अस मानत नाहीत. त्यामुळे नको नको म्हणता नाही सासर्‍यांनी मटण आणलच. आणि मग सासुबाईंनी जे सुक्क मटण बनवल होत त्याला तोड नव्हती. (मनातल्या मनात सासर्‍यांचे आभार मानले , अहो नाय तर काय जावयाचा आग्रह म्हणुन त्यांनी मटण नसत आणल तर Smile ) हात धुता धुताच आईंना कृती विचारुन घेतली.

मागे एकदा मी सुक्या मटनाची कृती इथे दिली होती ती आमची आई करते तशी, तर आजची ही माझ्या सासुबाईंची कृती.

साहित्य :


१ छोटा चमचा हळद.
२ चमचे मसाला (वाडवळी/मालवणी)
२ चमचे हिरव वाटण. (आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर)
१ १/५ चमचा गरम मसाला
१ चमचा जिरे पुड (भाजलेली)



१ मोठा कांदा पातळ उभा चिरुन.
२ लहान बाटाटे साला सकट गोल फोडी करुन.
२ मोठे चमचे सुक खोबर किसुन. (किसायचा कंटाळा आल्यास १/३ वाटी खोबर आगीवर भाजुन घ्याव आणि मग ठेचुन घ्याव. याने अजुन लज्जत वाढते. )



१/२ किलो कोवळ मटण.
२ चमचे लिंबाचा रस.
तेल, मिठ चवी नुसार


कृती :



फ्राईंग पॅनमध्ये कापलेला अर्धा कांदा आणि खोबर तेल न टाकता परतुन घ्याव. कांदा पारदर्शी झाल्यावर गार करुन बारीक वाटुन घ्याव.



मटण स्वच्छ धुवुन त्याला वरील सर्व मसाले, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ लावुन चांगले मिक्स कराव.



मग त्यात कांद्याखोबर्‍याच वाटण आणि १ मोठा चमचा तेल टाकुन किमान २ तास मुरत ठेवाव.



फ्राईंग पॅनमध्ये थोड्या तेलावर उरलेला अर्धा कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा.



त्यात मुरवलेल मटण टाकाव. पाणी अजीबात टाकु नये.



त्यात बटाट्याचे काप घालावे. आणि वर झाकण लावुन (झाकाणावर पाणी ठेवाव) आच मंद ते मध्यम ठेवावी.



मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे किमान ३०-४० मिनिटे शिजु द्यावे. त्या दरम्यान बाटाटा पण एकदम मस्त मऊ होतो. (फुटला तरी उत्तम)



मुख्य जेवणात तांदळाची भाकरी जर जोडीला असली तर उत्तमच.

पण सोबतीला २-४ मित्र आहेत, गप्पांच फड रंगलाय, समोर बियरचे मग फेसाळलेले आहेत सोबतीला हा चखणा. आहा हा हा स्वर्ग स्वर्ग म्हाणातात तो हाच आसावा Wink

***************************************************************************
मटणाला पर्याय :
ज्यांना मटण आवडत नाही किंवा चांगल मटण मिळण कठीण आहे त्यांना चिकन वापरुन हिच कृती करता येईल.
चिकनला शिजायला मटणापेक्षा कमी वेळ लागतो, १५ मिनिटं पुरेशी होतात. त्यामुळे आधी कांद्यावर बटाटा शिजवुन घ्यावा, आणि मगच चिकन टाकाव.

***************************************************************************

व्हेज व्हर्जन :

मटणाला पर्याय म्हणुन व्हेज प्रेमिंना सोयाबीन चे तुकडे वापरायला हरकत नाही. सोयाबीन चे तुकडे आदल्या रात्री पाण्यात भीजत ठेवावे.
दुसर्‍या दिवशी हाताने प्रत्येक तुकडा दाबुन पाणी काढुन टाकावे.
सोयाबीन शिजायला मटणा एवढा वेळ लागत नाही,. त्यामुळे आधी कांद्यावर बटाटा शिजवुन घ्यावा, आणि मगच,सोयाबीनचे तुकडे टाकावे.

सोयाबीन इतक फक्कड लागत की मी लहान असतान चक्क फसलो होतो.

3 comments:

  1. मस्तच दिसतय... भूक लागली.. करुन पहायला हव..

    ReplyDelete
  2. kaal Mutton Chops sathi recipe shodhat hote....DEnar ka?
    ithlya barach kruti aamhi ghari karat asto :)
    aabhar

    ReplyDelete
  3. *चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही टिप्स*

    १. पहिल्यांदा टांगलेल्या धुडाच्या मागच्या पायांच्यामध्ये एक नजर टाकून घ्यावी.
    २. साधारण आकारावरून मगच ठरवावं की घ्यायचं का नाही.

    मध्यमवयीन पालव्याचं मटन सर्वोत्कृष्ट असतं.

    कोवळं लगेच शिजतं, राळ होतं, आणि हाडं खायला मजा येत नाही.

    ३. थोराड बोकडाचं मटन शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं नाही लागत.
    ४. मटन घेताना हाडं आणि मऊ समप्रमाणात घ्यावं. हाडांमुळं रश्याला चांगली चव येते.
    मऊ मटन खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात.
    आमच्याकडे हाडांच्यावर जास्त डोळा असतो त्यामुळे हे प्रमाण ७०:३० आहे.
    ५. सीन्याचा भाग सर्वात चांगला. यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं. त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळता येतात.
    ६. मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. नळीतला गुद्दु ओढून खाताना प्रचंड आनंद मिळतो.(Noal Harari च्या म्हणण्यानुसार हे आपलं आद्य खाद्य आहे.)
    ७. काळजाचा माफक तुकडा आठवणीनं घ्यावा.
    ८. चरबीसुद्धा थोडीशी घ्यावी, यामुळे सुक्क्या मटणाच्या चवीत दुपटीने वाढ होते.
    चरबीच्या नावाखाली पडदा दिला जातो, तिथं २ मिनिट वाद घालण्याची तयारी ठेवावी.
    ९. जर्मनच्या पातेल्यात शिजवलेल्या मटणास सर्वोत्तम चव येते. कुकर सहसा वापरू नये, मटन बेचव होतं.
    १०. घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती-भाकरी चुरून खाता येते.
    चुरून खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे.
    ११. लिंबू फार पिळून खाऊ नये, कांदा सुद्धा अगदी २-३ घासात एकदाच खावा. कोशिंबीर असेल तर हात सैल सोडण्यास हरकत नाही.
    १२. लहानग्यांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा.

    मोठ्यांसाठी हाच रस्सा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सूप म्हणून देता येऊ शकतो.

    *मांसाहार - एक आध्यात्मिक पुण्य*

    *84 लक्ष योनीनंतर जर मनुष्य जन्म मिळतो असे सांगतात. पशूंपक्षांच्या जन्मात वर्षानुवर्षे वाया जाण्यापेक्षा, पशुपक्ष्यांना त्यातून मुक्त करून त्यांचा मनुष्ययोनीकडेचा प्रवास वेगवान करण्याचे पुण्यकर्म मांसाहारी लोक करत असतात*

    *तेव्हा मांसाहाराला पाप समजण्याची चूक चुकूनही करू नका. मटण खा, पुण्य कमवा!*

    रस्सा वाढा थोडा...
    ��������������
    आणी महत्त्वाच .....

    *बोलवा कधी रविवार पाहून��*

    आणि हा लेखक मी नाही मला आवडलं म्हणून पाठवल.��

    ReplyDelete