जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday 1 January 2013

पेठा

समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवंवर्षाच्या शुभेच्छा !!!


साहित्य :


  
१/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड)
१/२ किलो साखर.
१-२ चमचे खायचा चुना.
तुरटी.
गुलाब/केवडा वॉटर. 

कृती :


 

कोहळं सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे.
या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे.



चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे. 
कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी.

दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे.


  

एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे.     
कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे.




एका भांड्यात मंद आचेवर साखर भीजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.




मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. 
आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं.
 एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे.  
(झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. :) ) 
पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे. 

दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तायार असेल........
हे असं.