जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday, 28 December 2010

आलु पराठा

गृहिणींचा आणि बॅचलर मंडळींचा अगदी अडी-नडीला धावुन येणारा किचन मधला दोस्त म्हणजे बटाटा. घरात दुसरी कसलीच भाजी नसली तरी कांदे /बटाटे असतातच. अश्या वेळी नुसत्या बटाट्याच्या काचर्‍या करुन वेळ मारुन नेता येते.

थोडी फुरसत असेल आणि कणिक तिंबता येत असेल तर हा पदार्थ करुन पहायला हरकत नाही.

साहित्यः

२-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
१/२ चमचा हळद.
१ चमचा जीरे पुड.
१ चमचा लाल तिखट.
२" आलं बारील तुकडे करुन वा किसुन.
७-८ पाकळ्या लसुण बारील तुकडे करुन वा किसुन.
३-४ मिरच्या ठेचुन.
मीठ चवी नुसार.कणकेचा गोळा चांगला तिंबुन.


कृती:


सर्वप्रथम बटाटे मॅश करुन घावे.

त्यात सगळे मसाल्याचे पदार्थ टाकुन चांगल एक जीव करुन घ्यावं. चवीचा अंदाज घेउन मीठ टाकावं.कणकेचा गोळा परत एकदा मळुन, लहान सफरचंदाच्या आकाराचा गोळा वेगळा करुन त्याची छोटी पुरी लाटावी.
हातानेच केली तरी चालेल पण कडा शक्यतो पातळ ठेवाव्या.


लिंबाच्या आकाराचा सारणाचा गोळा या तयार पुरी मध्ये ठेवुन तिच्या कडा मोदका प्रमाणे वाळुन घ्याव्या.
शक्यतो मध्ये हवा रहाणार नाही याची दक्षता घ्या. हलक्या हातानेच हा सारण भरलेला दाबुन त्याला पेढ्याचा आकार द्या.हलक्या हाताने, हळु हळु फिरवत चपाती प्रमाणे लाटुन घ्या. हे खर कौशल्याच काम.
पुरण पोळीतल पुरण असो आलु पराठल्यातला बटाटा, ज्याला ते सारण आतच कोंडुन पोळी लाटता येत तोच खरा बल्लव/ सुगरण.

आमचे हात हलके नसल्याचे पुरावे वरील कलाकृती दाखवतेच आहे. Wink असो मीच करणार, नी मीच गिळणार असल्याने जीथे जमेल तिथे थोडी ठिगळं लावली. पराठ्याचा आकार एखाद्या देशाच्या भौगोलीक नकाश्या सारखा आला नाही या वरच समाधान मानुन आम्ही स्वत:चीच पाठ थोपटुन घेतली.


पराठा अलगद उचलुन तव्यावर टाकुन, मध्यम आचेवर थोड लोणी सोडुन पराठा खमंग भाजुनघ्यावा.

ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का Wink


1 comment:

  1. सह्ही.. पोरांना डब्यात काय देऊ म्हणून पेच पडलेला.. आता हेच करते

    ReplyDelete