२५-३० वर्षांमागचे ते दिवस आजही तसेच आठवतात. सुट्टी लागली की दुसर्या दिवशी गावी पळायचो, मग ती दिवाळीची असो, गणपतीची वा मे महिन्याची. सुदैवाने आजोळ पण याच गावात, अगदी चार उंबर्या पल्याड आईच माहेर. आईच्या माहेरचा गोतावळा मोठ्ठा. आईला पाच सख्खे काका आणि एक आत्या. त्यासगळ्यांना किमान ४ मुलं. आता इतक्या मावश्या आणि मामांची मुलं सगळी जमलो की नुसता कल्ला व्हायचा. काही जणांची आजोळं वेगळ्या गावी असल्याने त्यांची सुट्टी विभागली जायची. पण मी आणि बहिण या बाबतित भाग्यवान. प्रत्येक सुट्टीच अस वेगवेगळ वैशिष्ठ्य आसायच. निसर्गाने पण मुक्तहस्ताने उधळण केली आहे माझ्या गावावर. सुरुच्या बना मागे रम्य सागरतीर आहे. नारळी-पोफळी -चिकूच्या बागा आहेत. एक छानसा तलाव पण आहे. अरे हो गावाच नव सांगायच राहीलच. नरपड. मला मोठा अचंबा वाटायचा की हे कसल विचित्र नाव.
गावच घर तस ऐसपैस कौलारु. मागे गाई-गुरांनी भरलेला गोठा. पुढे अंगण. त्यात तुळशी वृंदावन. अंगणाला ठेवाच (निवडुंगाच) कुंपण. शेणाने नियमीत सारवलेल घर, ओसरी, पडवी . घरातच एका कोपर्यात लाकडी जिना, वर माळ्यावर जायला. माळ्यावर भाताची २ भली मोठी कणगी. ४-५ मोठ्ठाले रांजण. त्यात चींच , आंबोशी, खारातले आंबे,भोकर आवळे, लोणचीं असा खाऊ. बाकी बरिचशी अडगळ. मे महिन्यात अडगळ साफ करुन तिथे पेंडा पसरला जायचा आणि त्यात आंबे पिकायला ठेवले जायचे. मग मनाला येइल तेव्हा माळ्यावर जाउन आंबे घेउन यायचो आणि मग ते चोखत चोखत गावभर भटकायचो. द्रौपदीच्या थाळी सारख म्हाणा वा अर्जुनाच्या अक्षय भात्यासारख वरदान त्या माळ्याला होतं.
गावात बर्याच जणांच्या वाड्या आहेत. आमचाही छोटी वाडी आहे, पण त्यात आजी- आजोबांनी नंदनवन उभ केल होतं. काय न्हवत त्या वाडीत? चीकु,नारळी-पोफळी-ताड, खाजरी (खजुराची झाड),आंबे,काजू,फणस,पेरु, काळी जांभळ, सफेद जाम, केळी. वाडितच एक मोठी विहिर होती आणि अवाडी (छोटा हौद. साधरण ६ x ६ x ४ चा असेल.) विहिरीतल पाणी या अवाडीत सो डल जायचं. आणि मग अवाडितुन ते पाणी पाटात सोडल जाई. मग त्या मुख्य पाटाला फाटे पाडुन आख्या वाडीत सिंचन केल जायच. पावसाळ्यात भाताच मुख्य पीक आणि इतर वेळी वेगवेगळ्या भाज्यांच उत्पादन घेतल जायच.

फेब्रुवारी-मार्च मध्ये तेव्हा गावाला बर्यापैकी थंडी आसायची. सक्काळी जाग यायची ती कोंबड्याच्या आरवण्याने किंवा वासराच्या हंबरण्याने. गडी गाईची धार काढत आसायचा. चरवीत धार पडताना होणारा चुर्रर्रर्रर्रर्र... आवाज. खुप मज्जा वाटायची पहाताना. धार काढुन झाली की मग आम्ही वासराला सोडायचो. कसला जोर आसायचा त्या वासरात आम्हालाच ताणकटत न्यायच ते. बाबांनी एकदा आईची गम्मत सांगीतली होती. आई नविनच लग्न होउन घरी आली होती. तेव्हा एक पांढरी गाय होती, ती शेतातुन चरुन आली की आज्जी तिला नेहमी कहिना काही खायला घालायची. एक दिवस आज्जी घरात न्हवती. ही बया शेतातुन आली आणि वाट बघत राहिली कि आत्ता काही तरी मिळेल म्हणुन. आई घर कामात मग्न होती, इतक्यात मागुन कसलासा थंड खरखरीत स्पर्श झाला, आईने दचकुन मगे पाहिल आणि मोठ्ठी किंकाळी फोडत हातातल काम टाकुन बाहेर पळाली. गाय पण बिचारी आईच्या मागे माजघर, स्वयंपाकघर, दिवाणखाना पार करत करत पार अंगणात आली. तिला तीथे पाहुन आईने मागच्या रस्त्याने परत घरात प्रवेश केला तर ही बया पण मागे मागे आली. अश्या तीन प्रदक्षिण झाल्या. या दोघींची पकडा पकडी अशीच चालली असती पण तेवढ्यात आज्जी आली आणि तिने आईला या प्रसंगातुन सोडवल.
गाईच दुध काढुन झाल की मग हातात राखुंडी घेउन दात घासण्याचा कार्यक्रम व्हायचा. तोंड धुवायला नी चुळ भरायला परसातल्या विहिरीवर जाव लागायच. कसल थंड पाणीते सर्रर्र करुन अंगावर काटा यायचा. मग नुसत ओठांना आणि पापण्यांना पाणी लावल की झाल तोंड धुवुन
. हे सगळा आटपेस्तो आज्जी आणि आईने न्याहारी करुन ठेवलेली असे. शहरातल्या सारखे पोहे, उपमा नाही. शक्यतो तांदळाच्या भाकरी बरोबर, कधी कांदा कवट (कांदा+अंड भुर्जी), चुलीत भाजलेला पापड किंवा सुका बोंबील + मुठीने फोडलेला कच्चा कांदा, रात्रीच मुद्दाम उरवलेल ओल्या बोंबलाच कालवण. जोडिला भाताची कांजी (पेज.) शेतातल्या गड्यांसाठी आज्जीचा सगळा स्वयंपाक सकाळी साडेसातलाच तयार आसायचा. त्यामुळे पेज मिळायची कधी केळीच्या बोंडाची भाकरी, कधी ओले बोंबिल घालुन बनवलेली तर कधी माडाच्या ताडीत भिजवुन केलेली भाकरी (पॅन केक्स).
सकाळी असा भारी नाश्ता झाला की १० चाकी लिमोझीन वाट पहात दारात उभी असे. आज्जी गड्यांच जेवण बांधुन द्यायची. आमच्या सुट्टीत गाडीवानाला सुट्टी मिळायची. आम्हीच हाकायचो गाडी. बैलांना रस्ता तोंडपाठ असल्याने काही अडचण यायची नाही. गाडी पुढे गाई करवल्यांसारख्या डुलत डुलत चालायच्या आणि आमची वरात निघायची वाडीत. तिथे बरेच खेळ चालायचे. लपंडाव, बेचक्या घेउन नेमबाजी, नारळीचे थोपे कापुन त्याचे बैल बनवायचो. चीकण मातीची चाक बनवुन २-३ दिवस सुकवायचो नी मग त्याच्या खेळण्यातल्या बैल गाड्या बनवुन थोप्याचे बैल जुंपुन उनाडत बसायचो. कधी छत्रीच्या काड्यांच धनुष्यबाण बनवुन एक शहाळ उतारावरुन गडगडत सोडायचो आणि बाण मारुन ते अडवायचो. एकदा विहिरीजवळच आजोबांनी थोडी जागा साफसुफ करुन दिली. त्या जागेत त्यांनी लहान रोप लावुन आम्हाला वाडी करायला शिकवल. मग रोज त्या झाडांना डबर्यारुन पाणी घालायचा कार्यक्रम व्हायचा. कुणाच झाड किती वाढतय यात पण चुरस लागायची. अशी अंगमेहेनत करुन घामाने निथळलो की पटापट अवाडीत उड्या टाकुन तास दोन तास पाण्यात खेळ चाले. मग कोण किती वेळ पाण्यात बुडुन राहातो किंवा हातपाय न हलवता कसा तरंगतो यावर शर्यती लागत. डुंबुन डुंबुन भुका लागायच्या की मग आमचा मोर्चा रानमेव्या कडे वळायचा. त्या त्या सिझन प्रमाणे मग आंबे-कैर्या, सफेद जाम, जांभळ, पेरु, काजु, खाजरं, राजनं, करवंद, आवळे ,बोरं अश्या फळांचा फन्ना उडायचा. आणि अर्थात तहान लागल्यावर शहाळ्याच गार पाणी नी जोडीला साई सारख मऊ खोबर. उन्ह डोक्यावर आली की घरुन गडीमाणसा सोबत जेवण यायच. कधी लहर आली तर सकाळी येतानाच बरोबर शिधा आणला जायचा आणि मग तीन दगडांची चुल मांडुन वनभोजनाचा कार्यक्रम व्हायचा. जेवुन तृप्त झाल्यावर एखाद्या झाडा खाली झावळी विणुन केलेल्या चटईवर ताणुन द्यायची कीवा मग झाडाच्या फांदीला दोर टांगुन तात्पुरता झोका बांधुन त्यावर झुलत बसायच. कुण्या मोठ्याच लक्ष नाही अस बघुन हळुच आपट्याची पान वाळुन मस्त झुरका मरायचा 

सावल्या लांबायला लागल्या की गाई-गुर हंबरुन घराकडे निघायची वेळ झाल्याची सुचना द्यायची . मग गाडीजुंपुन आमची नावऴ निघायची. पण जाताना रिकाम्या हातने कधीच नाही. टोपल्यांत बराच रानमेवा गोळा केलेला आसायचा. घरी आल्या त्याच्या वाटण्या व्हायच्या. मग ओटीवर बाकडं टाकुन प्रत्येक जण आपापल दुकान मांडायचा. मग गावातली - जवळच्या पाड्यावरची आदिवासी मुल हा मेवा विकत घ्यायला यायची. प्रत्येक फळामागे ५ -१० पैसे मिळायचे. आरामत ४-५ रुपये सुटायचे. हा आमचा पॉकेट्मनी. मग संध्याकाळी समुद्रावर रपेट व्हायची. मामा मावश्या सगळे एकत्र जायचो. मामाच्या मागे हट्ट करुन समुद्रावरच्या पोलिसमामाच्या दुकानातले वडे, उसळ आणली जायची. मग वाळुत किल्ले बनवण, पकडापकडी, रिंगण गाण्याच्या भेंड्या असे खेळ व्हायचे. कधी खेळायचा कंटाळा आला तर मुली शंख शिंपले गोळा करत बसायच्या आम्ही खेकडे पकडायला खडकात जायचो.
तेव्हा टी.व्ही. च खुळ गावात पोहोचल न्हवत. ओटीवर आजोबांची आराम खुर्ची होती (या खुर्ची वर बसण्यासाठी आम्हा बहीण भावंडात काय चुरस आसायची) . अंगणात खाट टाकली जायची , जेवण आटोपली की घरातले सगळे पुरुष अंगणात जमायचे. बायका मंडळीपण स्वयंपाक घरातल आवरुन यायच्या. हवेत मस्त गारठा आसायचा. मोठ्यांच्या गप्पा गोष्टींना हळु हळु पुनवेच्या समिंदरासारखी भरती यायची. एखाद्या विनोदावर फेसाळलेल्या लाटेसारखे हसु फसफसायच.
आम्हा लिंबु-टींबु लोकांचा तोवर वेगळाच उद्योग चालायचा. आम्ही लाकाडं-काटक्या, वर्तमानपत्राचे कपटे गोळा करायचो. अंगणातल्या खाटे समोर हा ढिग रचुन शेकोटी पेटवली जायची. आमचा मेहताना म्हणुन आज्जी आम्हाला गोष्टी सांगायची, त्या राजा-राणी तल्या गोष्टींत आम्हाला मुळीच रस नसायचा, भुता-खेताच्या, चमत्कारी गोष्टींसाठी गलका व्हायचा.
गावाच्या मध्यावर एक पिंपळाचा पार आहे. १५०-२०० वर्षांच झाड असेल. झोटींग त्याच नाव. ग्राम देवता आहे ती. तर या झोटींगातुन म्हणे अमावस्येला रात्री १२ वाजता एक काटकी बाहेर येते आणि तिच एका पांढर्या शुभ्र घोड्यात रुपांतर होत. मग तो घोडा आख्या गावाला प्रदक्षिणा घालत पहारा देतो. ही गोष्ट अगणित वेळा ऐकुनही, दर वेळी तेव्हडीच उत्सुकता आसायची. आज्जी तिच्या सासर्यांची गोष्ट सांगायची. त्यांच्या अंगात म्हणे हा झोटींग यायचा. गावकरी त्याची पुजाकरायचे, नीट पाउस पाणी पडुदे म्हणुन नवस बोलायचे. मग हळु हळु गाडी चमत्कारी गोष्टींवरुन भुताच्या गोष्टींवर यायच्या की मग आमची पांगा पांग. मग कुणी आईच्या कुशीत दडलय, कुणी आज्जीच्या तर कुणी बाबांच्या मागे. गोष्टीं ऐकत ...आकाशातले तारे मोजत तिथेच डोळा लागायचा.

ऐन दिवाळीच्या दिवसात तर खुप धामधुम आसायची. अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे पहाटेच उठाव लागायच . त्यात मी मी म्हणणारी बोचरी थंडी. अंथरूणातुन बाहेरच यावस वाटायच नाही. मग बाबा कान धरुन उठवायचे ते तडक विहिरीवर. चुलीवर पाणी तापत ठेवलेल आसायच. मग आई किंवा बाबा उटण चोळुन आंघोळ घालायचे. पाणी तापलेल आसायच पण ते उटण बर्फा सारख गारे गार. अस्सा काटा यायचा की ज्याच नाव ते. मग पंचा गुंडाळुन दातावर दात वाजवत विहिरी पासुन घारा पर्यंत धुम ठोकायची. त्या नादात नक्की कुठे तरी ठेच लागायची आणि त्या थंडीत पाय अजुनच ठणकायचा. नविन कपडे घालुन घरताल्या सगळ्या वडिलधार्यांना , देवाला नमस्कार करुन पहीला फटाका फोडायला एकच धावपळ व्हायची. ओटी शेणाने सारवलेलि आसायची. घराघरातुन दिवाळीच्या फराळाचा मस्त सुगंध दरवळत आसायचा. नटलेल्या बायका मंडळी रांगोळी काधण्यात मग्न आसायच्या. गावच्या शाळेतर्फे रांगोळीच्या स्पर्धा आयोजीत केल्या जायच्या. मुलही मुलीं इतक्याच इर्षेने भाग घ्यायची. कबड्डीचे सामने आयोजीत केले जायचे. क्रिडा मोहोत्सवाचे आयोजन केले जायचे. रोज गावच्या शाळेच्या पटांगणात करमणुकीची कार्यक्रम व्हायचे. यात गावातल्या हौशी मंडळींना आपली कला सादर कारायचा पुरेपुर वाव मिळायचा. नाटकं बसवली जात. गाण्याचे नाचाचे कार्यक्रम व्हायचे. शेवटच्या दिवशी स्नेहवर्धक मंडळाची सभा व्हायची त्यात सामाजीक शैक्षणीक क्रिडा क्षेत्रातल्या विजेत्यांचा सत्कार केला जायचा.
मी तिसरी चौथी असतानाच्या दिवाळितली आठवण आहे. तेव्हा विजेच्या तोरणांच फॅड न्हवत. मातीच्या नाही तर ठेवाच्या(निवडूंगाच्या) पणत्या आसायच्या. आम्ही सगळे संध्याकळी फटाके उडवत होतो. सुरसुरी पेटवली की तीची हाताकडची तार वाकडी करुन हुक बनवायचा आणि मगे ती पेटती सुरसुरी झाडावर उडवायची. मग ती कुठेतरी फांदीला अडकायची. अश्या ४-५ सुरसुर्या अडकल्या की मग ते झाड मस्त चमचमताना दिसायच. तर हा खेळ चालु असताना तायडीने असा नेम धरलाकी ती सुरसुरी झाडा ऐवजी थेट गोठ्यात जाउन पडली. कापणी होउन गेलेली त्यामुळे गोठ्यात पेंडा ठासुन भरलेला. बर इरका प्रकार झालाय तर ही कुणाला सांगेल तर ते पण नाही. पेंडाच तो ...तो का पेटायचा राहतोय? आग वाढली तस कुणाच तरी लक्ष गेल नी मग जी धावपळ उडली की काय वर्णाव. कळशी, हांडे, बादल्या, भांडी, पेले, जे मिळेल त्याने पाण्याचा मारा केला नी काही मोठी हानी व्हायच्या आत सगळ प्रकरण आटोक्यात आणल. मग आजोबांनी आणि बाबानी सगळयांना अस झापल की विचारता सोय नाही. पण म्हणुन काय आम्ही फटाके फोडायचे राहीलो नाही. २-३ दिवसा नंतरचीच गोष्ट. या वेळी मी पराक्रम केला. सुरसुर्या वाकड्या करण्यावर बंदी आली होती. त्यामुळे जगमान्य रीती प्रमाणे त्या उडवत होतो. माझ्या हातातली सुरसुरी जरा जास्तच तडतडत होती, एक दोन ठिणग्या हातावर उडाल्या तशी मी घाबरुन हात झटकला. त्या सुरसुरीने जे उड्डाण केल ते थेट आजोबांच्या धोतरावर. दांडी वरल्या न्हवे त्यांनी घातलेल्या. हे राम, आजोबांची पळताभुई थोडी झाली. बाबांकडुन सडकुन मार मिळणार होता, पण आजोबांनीच वाचवल. तेव्हा पासुन मोठा होईपर्यंत फुलबाज्या, अनार, भुईचक्र, अॅट्म बाँब असल्या डेंजरस फटाक्यांकडे पाहिलपण नाही. बंदुकीने, दगडाने नाही तर हतोडीने टिकल्या फोडणे, सापाच्या गोळ्या पेटवणे असले प्रकार करायचो.
होळीच्या सुमरास बर्यापैकी भाजीपाला आसयचा वाडीत. आणि तेव्हा आज्जीची उकडहंडी ची भाजी हि ठरलेलीच. बाबा परसातल कोनफळ खणुन काढायचे. एका मोठ्या हांडीत ही भाजी केली जायची. वाडीतुन कडवा वाल, पापडी, वांगी, पाती कांदे, रताळी हा कच्चा माल यायचा. सगळ्या भाज्यांची एक मिश्र भाजी केली जायची. त्या भाजीची चव अजुन जिभेवर आहे.
आज गाव बदललय. घरं नीट नेटकी झाली. शेणाने सारवलेल्या जमिनी जाउन लाद्या, मार्बल आले. कौलं उडुन स्लॅब पडलेत. गोठा गाई-गुरांशिवाय ओस पडलाय.
सहावर्षांपुर्वी आजोबा गेले. त्यांना साथ देत दुसर्याच वर्षी आज्जी आम्हाला पोरक करुन गेली.
आताशी कुणी अंगणात जमत नाहीत. माणसच हरवली आहेत तिथे खाटांच काय.
काल इथे बाजारात कोनफळ दिसलं. आज्जीच्या उकडहंडीची आठवण झाली. भाग्य माझ आज्जीची ती रेसीपी आई शिकली, आणि तिच्या कडुन आमच्या पर्यंत पोहोचलीये. उद्या माझ्या लेकीला ही शिकवेन. वारसा आसाच चालवतात ना 
