जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday 28 December 2010

हॉट विंग्स्

नाताळ तोंडावर आलाय. अमेरिका युरोप सारख दणक्यात नसल तरी इथेही नाताळाची हवा जोर धरु लागलीये.
नविन वर्षाच्या पार्ट्यांचे आत्तापासुनच मनसुबे रचले जाताय. नाच गाणी खाणं आणि पिणं नुसता जल्लोश असणारे एका आठवड्या नंतर.
टारुने एका धाग्यात बार्बेक्युसाठी काय पदार्थ करता येतील अस विचारल होत. तेव्हा पासुन डोक्यात चिकन विंग्स् फडफडत होते.अनायसे काही मित्र जमायचेहोते काल, तर म्हटल करुन पाहु. जमलेच बरे तर तुम्हाला नव वर्षाच्या स्वागतासाठी अजुन एका पदार्थाची सोबत.

तसे हे विंग्स् वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. काहींना डीप-फ्राय केलेले आवडतात, तर काहींना कोळश्याच्या शेगडीवर खरपुस भाजुन. वेग वेगळ्या सॉसच्या सोबतीने चवीत थोडाफार बदलही करता येतो. सगळ्यात सोप्पे आणि झटपट होणारे विंग्स् म्हणजे डीप-फ्राय केलेले. पण सेंचुरीकडे झेपावणार्‍या वजनाच्या काट्याच्या धाकाने मी हल्ली त्या दिशेला पहायच पण टाळतो.
आणि एका डिशसाठी आख्खी कोळश्याची शेगडी, ते कोळसे घ्यायचे म्हणजे चारानेकी मुर्गी नी बाराणेका मसाला अशी गत व्हायची. तसाही मागे एकदा या कोळश्याच्या शेगडीने दणका दिला होता. दुबईला असताना एकादा बीच आम्ही सहलीसाठी गेलो होतो. तिथे दुपारी मस्त समुद्रात पोहुन आल्यावर बार्बेक्युचा बेत केला होता. पण त्या हट्टी शेगडीने अंत पाहिला आमचा. दुपारी १ वाजता पेटवायला घेतलेली शेगडी दोन वाजुन गेले तरी पेटेच ना. पाउण डबा रॉकेल पीउन गेली. शेवटी शेजारच्या एका कुटुंबाला आमची दया आली आणि (त्यांच काम आटोपल्यावर) त्यांचे निखारे आम्हाला सप्रेम भेट दिले. तेव्हा पासुन आपण तर बाबा त्या कोळश्याच्या शेगडीचा धसकाच घेतलाय.

उरता उरला तिसरा मार्ग. थोडा वेळखाउ पण फारसा त्रास नाही. आणि म्हणुन मग ओव्हन मध्ये बेक करायच ठरवल.
पुर्व तयारी आणि सॉस बनवल्या नंतरच्या स्टेप्स सारख्याच आहेत त्यामुळे तुम्हाला जे माध्यम योग्य/सोईस्कर असेल ते वापरा.
बेकींगची साहित्य आणि कृती पुढे देत आहे.

साहित्य:
सगळ साहित्य अंदाज-पंचे घेतलय.

चिकन विंग्स् .
एका विंगचे सांध्यात कापल्यावर तीन तुकडे होतात. त्यातला सगळ्यात बाहेरचा (छोटा) भाग ज्यात मांस जवळ जवळ नसते तो घेउ नये. म्हणजे एका विंगचे २ तुकडे उरतील. आता माणशी किमान ३-४ या हिशोबाने किती मंडळी आहेत हे पाहुन विंग्स् घ्यावे.



पाव ते आर्धी वाटी मैदा.
थोड लाल तिखट.
मीठ चवी नुसार.



बाजारात वेग-वेगळे बार्बेक्यु सॉस मिळतात. (मी घरात असलेलेच सॉस वापरले.)
५०-७५ ग्रॅम बटर/लोणी.

कृती:


तुकडे स्वच्छ धूउन पेपर नॅपकिनने एकदम कोरडे करुन घावे. हलकस मीठ भुरभुराव.



एका प्लॅस्टीकच्या पिशवीत (झिप लॉक असेल तर उत्तम) मैदा, मीठ आणि तिखट एकत्र कराव. त्यात हे तुकडे टाकुन व्यवस्थित हलवुन घ्यावे.
पिशवी नसेल तरी हरकत नाही एका ताटात हे मिश्रण घेउन तुकड्यांना नीट लावुन घ्यावं.



मैद्याचा एकदम हलकासा कोट/थर बसला पाहिजे. आता हे तुकडे फ्रिजमध्ये (खालच्या भागात) किमान अर्धा एक तास ठेउन द्यावे.



ओव्हन २०० ते २५० °C वर १५ मिनिटे तापत ठेवावा.
जाळीवर चिकनचे तुकडे ठेवताना ते शक्यतो एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्या.
जर जाळी नसेल तर ट्रेला बटरचा ब्रश फिरवुन मग त्यावर ठेवलेत तरी चालेल.



१५-२० मिनिटां नंतर सगळ्या तुकड्या उलथवुन परत १५ मिनिटं बेक करा. (जमल्यास वरुन एकदा बटरचा ब्रश फिरवा.)



एकीकडे चिकन बेक होत असतानाच, एका भांड्यात सगळे सॉस एकत्र करा, तुम्हाला आवडणार्‍या तिखटाच्या प्रमाणात तिखट सॉस वापरा. अन्यथा अफसॉस करायची पाळी यायची. Wink
त्यातच बटर/लोणी विरघळुन टाका.


शिजलेले चिकनचे विंग्स् या सॉस मध्ये यथेच्छ घोळवुन ते परत बेकींग ट्रेमध्ये ठेवुन अजुन १० मिनिटे बेक करावे.

जो काही सॉस उरलेला असेल तो वाढताना परत थोडा थोडा वरुन ओतावा.

याच्या जोडीला जर गार्लीक सॉस वा ब्ल्यु चीज डीप असेल तर लज्जत नक्कीच दुप्पट होईल.
तुर्तास इथेच थांबतो. लोभ आहेच. तो वाढावा हीच इच्छा. Smile

1 comment:

  1. I just love this.Its looks absolutely tempting and divine..Keep giving such amazing recipes.Please can you show how u made rice and wheat bhakri

    ReplyDelete