जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Wednesday, 27 July 2011

अंडा करीसाहित्य :४ अंडी. (उकडलेली वा कच्चीच आवडीनुसार.)१ लहान चमचा हळद.
१ मोठा चमचा लाल तिखट.
१ मोठा चमचा भाजलेली जीरेपुड.
१ मोठा चमचा गरम मसाला.
दीड ते दोन चमचे आलं-लसुण पेस्ट.दोन मध्यम कांदे उभे चिरुन.
दोन मध्यम बटाटे गोल फोडी करुन. (आवडत असल्यास.)
२-३ टॉमेटो बारीक चिरुन.
तेल, मीठ चवीनुसार.

कृती:बटाट्याचे काप किंचीत मीठ लावुन थोड्याश्या तेलावर शिजवुन घ्यावे.दुसर्‍या एका भांड्यात थोड्या तेलावर कांदा, आल लसुण पेस्ट टाकुन गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.
नंतर त्यात सगळे मसाले टाकुन तेल सुटे पर्यंत चांगल परताव. त्याच दरम्यान टॉमेटो टाकावा. मसाला खाली भांड्याला लागत असल्याच किंचीत पाणी घालावं.टॉमेटो शिजल्यावर त्यात बटाट्याचे काप घालुन पुन्हा एकदा परताव.
ज्या प्रमाणात रस्सा हवा त्या नुसार पाणी टाकव. चवीनुसार अंदाज घेत मीठ टाकाव. झाकण ठेवुन एक वाफ काढावी.
ज्यांना उकडलेली अंडी आवडतात त्यांनी अंडी सोलुन त्याला सुरीने टोचे मारुन रश्यात टाकावी.
कच्ची अंडी आवडत असल्यास थोड्या थोड्या अंतरावर अंडी फोडुन टाकावी. (पण त्यानंतर बिल्कुल ढवळु नये.) परत वरुन झाकण ठेवुन १० मध्यम आचेवर शीजु द्यावे.गरमागरम भाकरी सोबत लुत्फ घ्यावा.
SmileSunday, 24 July 2011

मुर्ग अचारी.

        येत्या शनिवारी गटारी अमावस्या. म्हणजेच रविवार पासुन श्रावण लागणार. माझ्या सारख्या वार न पाळणार्‍याला काय ३६५ दिवस गटारीच. पण त्यामुळे माझ्यासाठी गटारीचं महत्व कमी झालय अस नाही.
मी लहान असताना आमच्या घरी गटारीला खुप मजा असायची. बरेच नातेवाईक जमायचे आमच्या घरी. खाटकाकडे बरीच मोठी रांग असायची. म्हणुन बाबा पहाटेच जाउन मटण /चिकन घेउन यायचे. तोपर्यंत आम्हा चिल्ल्या पिल्यांकडे लसुण सोलणे, खोबरं किसणे अशी काम लागलेली असायची. आई दिदिची एकीकडे चहा-न्याहारीची धावपळ चालु असे. माम्या मावश्या वाटणं घाटणं आदी जेवणाच्या पुर्व तयारीला लागलेल्या असायच्या.
           पुरुषमंडळींची थोडीफार आचमनं चालायची. साधारण अकरा बाराच्या सुमारास आमची स्वारी एक कापडाची धोकटी सायकलच्या हँडलला टांगुन त्यात सोड्याच्या रिकाम्या बाटल्या घेउन खडखडाट करत निघायची. आतल्या खोलीत मामा, काका, बाबांची बैठक बसायची. आम्हा पोरा टोरांची मध्ये मध्ये उकडलेली अंडी, मक्याचा चिवडा, वेफर्स, फरसाण, सुक चिकन आदी चखण्यावर हात मारण्यासाठी लुडबुड चालु असायची. बैठकीला चढत्या अंगाने रंग भरायचा. अनेक गहन विषयांवर चर्चा चालु असायची. पण राजकारण आणि क्रिकेटया दोघांना मरण नसायचं.
          साधारण एक दिड च्या सुमारास होममिनिस्टर पहिली घंटा द्यायच्या. शेवटी दोन अडीच वाजता पानं मांडायला घेतली जात. नाईलाजाने पुरुषमंडळी बैठक आवरती घेत. आईच्या हातचं सुग्रास जेवण, त्या नुसत्या घमघमाटानेच भुक अधिकच चाळवली जायची. मटणाचा लालेलाल रस्सा, कोंबडीच सुकं, सोबतीला गरमा गरम भाकर्‍या, वाफाळता भात, कोशिंबीर. मुलांसाठी खास भेजा / कलेजी फ्राय, जिरावण म्हणुन सोलकढी किंवा चींचकढी असा जंगी बेत असायचा.
           आज ८-९ वर्ष जास्त झाली अशी एकत्र गटारी साजरी करुन. आजही सगळे जमतात एकत्र पण फक्त मी त्यांच्यात नसतो. Sad पण त्यादिवशी फोन वरुन सगळ्यांची गप्पा टप्पा होतात. आणि पुढल्या वर्षी नक्की येण्याच मी आश्वासन देतो.

छ्या साला उगाच नॉस्टॅल्जीक का काय म्हणतात ते झालो. तुमचाही बहुमुल्य वेळ घेतला.
आता जास्त चर्‍हाट न लावता मुळ विषयाकडे वळु. तर मंडळी येत्या शनिवारी गटारी अमावस्या. जे शनिवार पाळतात ते शुक्रवारीच गटारी साजरी करणार. तर त्यासाठी तयारी करता यावी म्हणुन आजच ही पाककृती देत आहे. आवडल्यास बदल म्हणुन करुन पहा.

मुर्ग अचारी :
 


साहित्य :२ लहान चमचे जीरं.
२ लहान चमचे मेथी दाणे.
२ लहान चमचे राई.
२ लहान चमचे बडिशेप.
२ लहान चमचे काळीमिरी.
एक ते दिड इंच दालचीनी.
२ लाल मिरच्या. (ऑप्शनल)२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२-३ टॉमेटो बारीक चिरलेले.
कढीपत्याची पाने.२-३ हिरव्या मिरच्या + लिंबाचा रस.
२ चमचे दही
१ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे आलं-लसुण पेस्ट.
तेल, मीठ, लाल तिखट चवी नुसार.
अर्धा ते पाउण किलो चिकन.

कृती :

राई + जीर + बडीशेप + काळीमिरी + दालचीनी + मेथी दाणे कोरडे भाजुन घ्यावे. थंड झाल्यावर थोडे वाटुन भरकट पुड करुन घ्यावी.चिकन स्वच्छ धुवुन त्यातलं पाणी पुर्ण पणे काढुन टाकाव. (पेपेर नॅपकिनने पाणी टिपुन घेतलं तर उत्तम.) त्यात वरिल वाटलेली पुड, दही, मीठ, आणि हळद लावुन एकत्र कराव. आणि किमान अर्धातास तरी मुरत ठेवाव.एका कढईत अर्धा डाव तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. नंतर त्यात आल लसणाच वाटण टाकुन चांगल परताव. तेल सुटल्यावर त्यात प्रत्येकी १/२ चमचा मेथी दाणे, बडिशेप, जीर घालुन परताव.१/२ चमचा हळद आणि २ चमचे लाल तिखट टाकुन सतत परत रहाव. परत तेल सुटु लागल की त्यात बारीक चिरलेला टॉमेटो टाकुन चांगल एकत्र कराव.टॉमेटो पुर्ण गळुन गेल्यावर आणि बाजुने तेल सुटु लागल की मग त्यात मुरवलेल चिकन टाकुन चांगल ढवळुन घ्याव. वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजवत ठेवाव. १५ मिनिटांनी झाकण काढुन मंद आचेवर आतल पाणी आटे पर्यंत शिजवावं.
वरुन १-२ चमचे तेलात मोहरी कढीपत्ता आणि लिंबाच्या रसात बुडवलेल्या मिरच्या टाकुन फोडणी करावी. ही फोडणी तयार चिकन वर टाकावी.

समस्त जालीय स्नेह्यांना हॅप्पी गटारीच्या शुभेच्छा.  Wink

Wednesday, 20 July 2011

मेदुवडा

हल्ली किचन मध्ये जाउन काही खास बनवण्याचा उत्साह नसतो. पण दुपारी एका मित्राने फोन केला. फोनवर माझ्या ब्लॉगच बरच कौतुक केल. (आमच विमान लगेच हवेत.) मग त्याने हळुच पिल्लु सोडलं की तो संध्याकाळी घरी येतोय. (हवेतल्या विमानाच क्रॅश लँडिंग..)
आता आयत्या वेळी काय करावं बरं? थोडा वेळ डोक खाजवल्यावर संध्याकाळच्या खादाडीसाठी मेदुवडे करायच ठरवलं.
लंच टाईम मध्ये घरी जाउन डाळ भिजत घातली. बाकी कस काय ते पुढे .....

साहित्य :२ वाट्या उडदाची डाळ.१ वाटी बारीक चिरलेला कोबी.
१ मध्यम कांदा (बारीक चिरलेला).
२-३ मिरच्या (बारीक चिरलेल्या).
१ इंच आलं (लहान तुकडे करुन).
थोडीशी कोथिंबीर.
२ कडिपत्त्याची पाने.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.

कृती :

२-४ तास भिजत ठेवलेली उडदाची डाळ पाणी काढुन टाकुन थोडी भरड वाटुन घेतली.वाटलेल्या पिठात कांदा, कोबी, आलं, मिरची, कडिपत्ता, कोथिंबीर आणि मीठ टाकुन एकत्र करुन घेतले.एकीकडे कढईत तळण्यासाठी तेल तापत ठेवल.
एका स्वछ झिपलॉक /प्लॅस्टिकच्या पिशवीवर पीठाचा गोळा घेउन, हलक्या हाताने दाब देत वडा थापला. मधोमध एक छोटस भोक पाडल.
वडा अलगद हाताने उचलुन तेलात सोडला. (हे सगळं लिहायला/वाचायला कित्ती सोप्पय नाही? Wink )
पण शेवटी पोपट झालाच. पिशवी वरुन उचलत वडा तेलात सोडतानाच त्याने असा काही आकार घेतला की ज्याच नाव ते. मित्राला आणि मलाही भुक सपाटुन लागली होती. शेवटी मेदुवड्याच्या आकाराचा नाद सोडुन सरळ गोळाभजीच्या आकाराचे वडे केले.चार पाच भज्या सदृश्य वडे पोटातल्या कावळ्यांना अर्पण केले. ते शांत झाल्यावर माझ्यातला 'कलाकार'(?) हट्ट सोडायला तयार होईना.
म्हणुन यावेळी हातावरच मेदुवड्याचा आकार देउन वडे सरळ तेलात सोडले.
वेडे वाकडे का होईनात पण या वेळेस मेदुवड्या सदृश्य लुक आला खरा. Smile
नारळाच्या चटणी सोबत कुरकुरीत मेदुवडे.

Monday, 4 July 2011

मराठमोळी मिसळ

साहित्य :


३-४ मध्यम आकाराचे कांदे.
२ मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले.
१/४ किलो हिरवे उकडलेले वाटाणे.
५-६ पाकळ्या लसुण.
१ ते १.५ इंच आलं.
१ ते १.५ वाट्या लाल तिखट.
२ मोठे चमचे गरम मसाला.
१.५ वाट्या तेल.
चवी नुसार मीठ.
फरसाण. (फरसाण घेताना त्यात शक्यतो मनुका, चिवडा घेण्याच टाळावं.)

कृती :
आल-लसुण एकत्र वाटुन घ्याव.
दोन कांदे वाटुन घ्यावे.अर्ध्या वाटी तेलात वाटलेला कांदा चांगला परतुन घ्यावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात आल लसणाची पेस्ट टाकुन परत परतुन घ्याव.त्यात १/२ वाटी लाल तिखट टाकुन बाजुने तेल सुटे पर्यंत परतत रहाव.कांदा बाजुने तेल सोडु लागला की मग त्यात गरम मसाला टाकावा.मग त्यात उकडलेले वाटाणे टाकुन चांगल ढवळुन घ्याव.पाणी आणि चवीनुसार मीठ टाकुन एक उकळी आणावी.

कट:कटासाठी दुसर्‍या एका जाड बुडाच्या पातेल्यात एक वाटी तेल तापवाव. त्यात एक लहान कांदा बारीक चीरुन टाकावा. एक वाटी लाल तिखट टाकुन चांगल परतुन घ्याव.चवीनुसार मीठ टाकाव. खाली लागत असल्यास किंचीत पाणी टाकाव.

वाढणी :एका पसरट भांड्यात सर्वात खाली फरसाण ठेवाव.उकडलेल्या बटाट्याचे लहान तुकडे करुन वरुन वाढावे.त्यावर वाटाण्याचा रस्सा घालावा.वरुन बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू पेरुन सजवाव.या मिसळीसोबत दुसर्‍या एका वाटीत नुसता कट, आणि पावा सोबत गरमा गरम वाढाव.


विसु. : ब्रंम्हांड आठवल्यास हव तर सोबत थंडगार मठ्ठा वा ताकाचा उतारा घ्यावा. पण यात दही टाकुन मिसळीचा अपमान करु नये. :)