जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 17 June 2012

चीज मश्रुम्सराम राम मंडळी, एका  छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. :)

साहित्य : 
अळंबी (मश्रुम्स) ,
सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(अंड न आवडणार्‍यांना अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात मिसळुन ते दाट मिश्रण वापरता येईल.)तळण्यासाठी तेल.

कृती : फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.
ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.
तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.


चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.


.

.