जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.
Showing posts with label न्याहारी. Show all posts
Showing posts with label न्याहारी. Show all posts

Sunday, 16 September 2012

निहारी

चुकला फकीर जसा मशिदीतच सापडायचा तसेच भरकटलेले अस्मदिक पुन्हा एकदा सामिष पाककृतीकडे वळतो. Smile
गेल्या आठवड्यात 'मी मराठी'वर न्यहारीच्या पदार्थांवर चर्चा चालली होती. त्यात प्रतिसाद देताना निहारीची आठवण निघाली. दोन्ही शब्दांतल सार्धम्य पण कुतुहलाचा विषय आहे. (थोडंस गुगलल्यावर कळलं की याच मुळ 'Nahar' نهار‎ (मराठी अर्थ : दिवस) या एका अरबी शब्दात आहे. जाणकार मंडळींनी यावर प्रकाश टाकावा.) परत त्यात हा पदार्थ शक्यतो सकाळी न्यहारीच्या वेळीच खाल्ला जातो. अनेक उपहार गृहातही निहारी केवळ न्यहारीच्या वेळीच मिळते. अगदी ११ वाजता गेलात तर संपलेला असतो. (कोण रे तो चितळेऽऽऽ चितळेऽऽऽ ओरडतोय? Wink) भारतातही सर्रास बनवला जात असला वा उपहारगृहांत मिळत असला तरी माझी या पदार्थाशी ओळख मी मध्यपुर्वेत असताना झाली. जुम्मे के जुम्मे भल्या पहाटे आम्ही क्रिकेटच्या सरावासाठी जायचो. पहाटे साडेपाच ते साडेनऊ या वेळेत घामटा काढुन झाल्यावर आमची पाऊलं आओपाप एखाद्या उपहार गृहाकडे वळत. कधी उडप्याच तर कधी अस्सल गुजराथी तर मग कधी पठाणी. अश्याच एका पठाणी उपहार गृहात पहिल्यांदा निहारी चाखली आणि मग तिच्या प्रेमातच पडलो. मध्यपुर्व सुटलं आणि मग कस कुणास ठाऊक पण निहारीही विस्मरणात गेली. पण आता आठवण निघालीच तर मन स्वस्थ बसु देईना.
फार काही कष्टाचं काम नाही पण वेळकाढु आहे. तसं पाहिलं तर आदल्या दिवशी करुन दुसर्‍या दिवशी खाण्याचा हा पदार्थ. उत्तम चवीची खात्री हवी असेल तर तेवढा वेळ द्यायलाच हवा नाही का?
तर मग लागायच ना तयारीला?

साहित्यः

३/४ किलो कोवळं मटण. (हाडां सकट. शक्यतो नळ्या (बोनमॅरो(?)) पण घ्याव्या.)
(ज्यांना मटण आवडत नाही त्यांनी चिकन घेतले तरी चालेल.)



२ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे.
२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.



२ मोठे चमचे आलं लसुण वाटण.
१ लहान चमचा हळद.
१ लहान चमचा सुंठ पुड.
२ मोठे चमचे लाल तिखट.
२ मोठे चमचे धणे पुड.
(लवंग + दालचिनी + काळीमीरी + वेलची (मोठी लहान दोन्ही)+ बडीशेप + शाहजीरं) खडा मसाला कोरडा भाजुन त्याची पुड.
किंवा २ मोठे चमचे गरम मसाला.
४-५ कप गरम पाणी.
२-३ मोठे चमचे मैदा.
१ डाव तेल.
मीठ चवी नुसार.
आल्याचे ज्युलियंस. (लांब उभे काप.)
फोडणीसाठी : २ मोठे चमचे साजुक तुप + हिरव्या मिरच्या.

कृती:



कांदा तेलावर परतुन घ्यावा. त्याचा कच्चट वास निघुन गेल्यावर त्यात आलं-लसणाच वाटण घालुन परतावं.



त्यात सगळे मसाले घालुन तेल सुटे पर्यंत परतुन घ्यावे. नंतर आच लहान करुन त्यात दही घालावं.



मसाला परत तेल सोडू लागल्यावर त्यात मटण टाकुन ढवळावं जेणे करुन सगळा मसाला मटणांच्या तुकड्यांना व्यवस्थित लागेल. चवी नुसार मीठ घालावं.



५-६ मिनिटे मोठ्या आचेवर परतल्या नंतर त्यात गरम पाणी टाकावं. एक उकळी आली की आच लहान करुन वरुन झाकण ठेउन चांगलं ३-४ तास शीजु द्यावं. अधुन मधुन दोन चार वेळा ढवळावं.

(पुर्वीच्याकाळी म्हणे ही शिजवण्याची क्रिया रात्र भर चालायची. हल्ली गॅसच्या चढत्या किंमती पहाता ३-४ तास म्हणजे एखाद्याच्या तोंडाला फेसच यायचा. पण त्यावर तडजोड म्हणुन प्रेशर कुकर आहेच की. पण अट्ट्ल खवय्या मात्र पहिल्या घासात तुमची ही चोरी पकडेल. Wink )



३-४ तासां नंतर मैदा वाटीभर पाण्यात भिजवुन मग तो द्रव रश्यात टाकुन ढवळावं. रस्सा दाट होईल. १०-१५ मिनीटांनी आच बंद करावी.

फोडणीच्या भांड्यात साजुक तुप गरम करुन त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरचीचा तडका तयार करावा आणि तयार निहारीवर सोडावा.

वरुन आल्याचे उभे काप टाकुन, तंदुरी रोटी वा परांठा यांच्या जोडीने गरमा गरम वाढावे.


Wednesday, 29 December 2010

क्रेपे (युरोपीयन डोसा)

परवाच एका मॉल मध्ये फिरताना फुड्कोर्ट्मध्ये एक माणुस डोसा बनवताना दिसला. मुळातच इकडे भारतीय हॉटेलस मोजुन ३-४. एकजात सगळी सारखीच उत्तरेकडची चव असलेली. त्यामुळे तो डोसे काढणारा पाहुन बर वाटलं. पण वर नाव वाचल तर 'ईटालियन क्रेपे'. म्हटलं हा काय प्रकार आहे. त्याच्या काउंटरवर गेलो. एक क्रेपे ऑर्डर केला. थोडास गोडुस लागला. दिसायला तर एकदम डोश्या सारखा होता. मग घरी आल्यावर नेट वर धुंडाळलं. तेव्हा क्रेपे हा न्यहारीसाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी चालुन जाणारा , एक युरोपियन डोश्याचा प्रकार आहे अस कळलं. आणि थोडे फेर फार करत हा प्रयोग कराण्यासाठी हात शीवशीऊ लागले . ;)

साहित्यः


३/४ बाऊल मैदा/गव्हाच पीठ.
१ अंड.
१/२ कप दुध.
सोडा (पिण्याचा. तोच जो मोठी माणस कसल्याश्या रंगीत द्रव्यात टाकुन घेतात तो.)
मीठ चवीनुसार.
१ चमचा साखर्/पीठी साखर
येवढ्या प्रमाणात ५-६ क्रेपे तयार होतात.



नॉन्व्हेज स्ट्फिंगसाठी : चिकन
व्हेज स्ट्फिंगसाठी : मश्रुम (वा तुम्हाला आडतील त्या भाज्या.)
गोड स्ट्फिंगसाठी : फळांचा जॅम, मुरंबा.
बाकी तुमच्या तेब्येतीला मानवत असल्यास चीज् ,बटर.

कृती:


एका भांड्यात अंडे फेटुन घावे. त्यात मैदा, मीठ, साखर घालुन एकजीव करुन घ्यावं.
नंतर त्यात सोडा टाकुन साधारण डोश्याच्या पीठा पेक्षा थोड पातळ मिश्रण तयार करावं.
किमन १०-१५ मिनिटे बाजुला ठेउन द्यावं


ते मिश्रण आराम करतय तो वर स्टफिंगची तयारी करावी.
१ चमचा तेलावर, मश्रुम आणि बोनलेस चिकनचे छोटे तुकडे करुन त्यांना मीठ, मसाला, हळद, हिरव वाटणं लावुन मधम आचेवर १० मिनिटं परतुन घावे.



कडकडीत तापलेल्या तव्यावर एक डाव पीठ ओतुन तवा सगळ्या बाजुंनी फिरवुन घ्यावा जेणे करुन मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरेल. आच मध्यम करुन १-२ मिनिटे शिजु द्यावं




कडा सुटायला लागल्या की उलथण्याने उलटुन दुसरी बाजू पण १-२ मिनिटे शिजु द्यावी.



ज्याच्या त्याच्या आवडी नुसार त्यात हवं ते स्टफिंग टाकुन रोल करावे.
गोड आवडणार्‍यांनी बटर लावुन जॅम, मुरांब्याचा थर द्यावा.
नॉन्व्हेज प्रेमींनी मॅगी चा भुना मसाला / झण्झणीत चटणी चा कोट करुन त्यावर चिकन्/भाज्या टाकुन रोल करावा.



हा पदार्थ गरमागरम खाण्यातच मजा आहे. :)

Tuesday, 28 December 2010

आलु पराठा

गृहिणींचा आणि बॅचलर मंडळींचा अगदी अडी-नडीला धावुन येणारा किचन मधला दोस्त म्हणजे बटाटा. घरात दुसरी कसलीच भाजी नसली तरी कांदे /बटाटे असतातच. अश्या वेळी नुसत्या बटाट्याच्या काचर्‍या करुन वेळ मारुन नेता येते.

थोडी फुरसत असेल आणि कणिक तिंबता येत असेल तर हा पदार्थ करुन पहायला हरकत नाही.

साहित्यः

२-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
१/२ चमचा हळद.
१ चमचा जीरे पुड.
१ चमचा लाल तिखट.
२" आलं बारील तुकडे करुन वा किसुन.
७-८ पाकळ्या लसुण बारील तुकडे करुन वा किसुन.
३-४ मिरच्या ठेचुन.
मीठ चवी नुसार.



कणकेचा गोळा चांगला तिंबुन.


कृती:


सर्वप्रथम बटाटे मॅश करुन घावे.

त्यात सगळे मसाल्याचे पदार्थ टाकुन चांगल एक जीव करुन घ्यावं. चवीचा अंदाज घेउन मीठ टाकावं.



कणकेचा गोळा परत एकदा मळुन, लहान सफरचंदाच्या आकाराचा गोळा वेगळा करुन त्याची छोटी पुरी लाटावी.
हातानेच केली तरी चालेल पण कडा शक्यतो पातळ ठेवाव्या.


लिंबाच्या आकाराचा सारणाचा गोळा या तयार पुरी मध्ये ठेवुन तिच्या कडा मोदका प्रमाणे वाळुन घ्याव्या.
शक्यतो मध्ये हवा रहाणार नाही याची दक्षता घ्या. हलक्या हातानेच हा सारण भरलेला दाबुन त्याला पेढ्याचा आकार द्या.



हलक्या हाताने, हळु हळु फिरवत चपाती प्रमाणे लाटुन घ्या. हे खर कौशल्याच काम.
पुरण पोळीतल पुरण असो आलु पराठल्यातला बटाटा, ज्याला ते सारण आतच कोंडुन पोळी लाटता येत तोच खरा बल्लव/ सुगरण.

आमचे हात हलके नसल्याचे पुरावे वरील कलाकृती दाखवतेच आहे. Wink असो मीच करणार, नी मीच गिळणार असल्याने जीथे जमेल तिथे थोडी ठिगळं लावली. पराठ्याचा आकार एखाद्या देशाच्या भौगोलीक नकाश्या सारखा आला नाही या वरच समाधान मानुन आम्ही स्वत:चीच पाठ थोपटुन घेतली.


पराठा अलगद उचलुन तव्यावर टाकुन, मध्यम आचेवर थोड लोणी सोडुन पराठा खमंग भाजुनघ्यावा.

ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का Wink