जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 26 December 2011

तिरामिसु

आज खा रे खा चा पहिला वाढदिवस. त्या निमित्ते आज काही गोड धोड करावं असा विचार केला. आजवर तुम्ही सर्वांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलतं, हा लोभ असाच रहावा हीच मनोकामना.

साहित्यः

२५० ग्रॅम मस्कार्पोन चीज.
लेडी फिंगर्स बिस्किटे. (न मिळाल्यास 'मारी'ची)
साखर ३ मोठे चमचे. (अंदाजे ५० ग्रॅम)
२ अंडी.
कॉफी.
२ ते ३ मोठे चमचे कोको पावडर.
२ चमचे रम (ऑप्शनल).


कृती :


अंडी फोडुन त्यातील बलक आणि पांढरा भाग वेगवेगळे करावे.बलकात साखर टा़उन फेटुन घ्यावे. इतके फेटावे की त्याचा पिवळा धम्मक रंग ऑफ व्हाईट झाला पाहिजे.चमचा चमचा मस्कार्पोन चीज टाकत सगळ चीज संपे पर्यं फेटत रहावं. शेवटी आंड्यातला पांढरा भाग (तोही फेटुन घ्यावा) टाकून फेटुन घ्यावं, साधारण केकच्या मिश्रणाची घनता आली पाहिजे.
आवडी नुसार दुध किंवा रम टाकुन कॉफी पाण्यात विरघळून घ्यावी.लेडी फिंगर्स बिस्कीटांचा एक थर भांड्याच्या बुडाशी लावावा.बिस्कीटांवर चमच्या- चमच्याने कॉफी ओतावी.कॉफीत भिजलेल्या बिस्किटांवर चीज अंड्याचं मिश्रणाचा थर द्यावा.पुन्हा एकदा बिस्किटांचा थर लावून आणि कॉफी ओतुन चीज अंड्याचं मिश्रणाचा थर द्यावा.
अ‍ॅल्युमिनीयन फॉईल लावून भांडेफ्रिजमध्ये कमीत कमी ६-७ तास थंड करत ठेवावं.
हॅप्पी बर्थडे खा रे खा :)

मनातलं जनांत

गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात Wink ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही. माझा ब्लॉग?
हौसे खातर थातुर मातुर पाककृत्या करणार्‍या मला आंतरजाला वरील काही स्नेह्यांनी पाककृतींचाच ब्लॉग काढायचं सुचवलं. आज करु-उद्या करू असं करत मी टाळत होतो. कारण मी अनेक ब्लॉग पाहिले होते की जिथे मंडळी उत्साहात सुरवात तर करतात पण मग महिनोंन महिने / वर्षे काही लिहितच नाहीत. माझं ही तसचं काहिस होईल अशी भिती मनात होती.
एके दिवशी राजे स्वतःच मला म्हणाला हवं तर मी तुला ब्लॉग बनवून देतो. तु फक्त हो म्हण. त्याचा हा माझ्या वरचा विश्वास माझा मलाच हुरुप देउन गेला. आणि बरोब्बर गेल्या वर्षी याच दिवशी खा रे खा चा जन्म झाला.
राजेने लागेल तशी मदत केलीच. प्राजू ताई आणि माझ्या ताईने मला या ब्लॉगसाठी एकदम समर्पक नाव सुचवलं. नाताळची सुट्टी होतीच हाताशी धडाधड सगळ्या जुन्या पाककृत्या टाकण्याचा सपाटा लावला.
मित्रं मंडळींना ब्लॉगचं रुप रंग आवडलं. त्यांनी त्यांच्या मित्रांकडे चार कौतुकाचे शब्द काढले. खवय्या तात्याने तर चक्क त्यावर एक लेखच लिहून प्रकाशित केला. एका दिवसात जवळ जवळ ५०० हिट्स् मिळाल्या. एकदम खुश झलो. अहो सामान्य माणुस मी. आपल्या कामाचं कौतुक झालेलं कुणाला नको असतं. Smile १०००, १०,०००, २०,००० असे टप्पे पार होत होते. दरम्यान नवीन पाककृती येतच होत्या. आज एका वर्षा नंतर जवळ पास ८० पाककृत्या झाल्या आहेत. आणि तब्बल ४२,६०० हिट्स. यात सर्व मिपाकर, मीमकर, बझकार, अन्य ब्लॉगर्स आणि मायबोलीकरांचा मोलाचा वाटा आहेच. तुम्हा सर्वांचे आभार मानून मला तुमच्या ऋणांतुन मुक्त व्हायचं नाही कारण तुमचा हा लोभ मला असाच हवाय. Smile
माझ्यासाठी तेच उत्तेजक आहे.
नतमस्तक
Tuesday 20 December 2011

एगप्लांट + मोझ्झेरेला चीज (उर्फ वांग्याचे काप फ्राय)
आज जवळ जवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता नावातच एग असल्याने अंड्याचा वापर अपरिहार्य आहे. Wink पण तुम्ही अंड खात नसाल तर त्यावरही उपाय आहे.
नेहमीसारखे वांग्याचे काप करण्या ऐवजी आज पाकृमें थोडा टिव्स्ट्.

साहित्यः
एक मोठं वांगं.
एक मोठा कांदा (जीतका शक्य असेल तितका बारीक चिरलेला.)
२ मध्यम टोमॅटो  (                        .-॥-                              .)
२-३ चमचे टोमॅटोची पेस्ट.
चिमुटभर साखर (ऑप्शनल.)
१ चमचा लाल तिखटं / मसाला.
१/४ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
२-३ चमचे तेल.
१/४ वाटी ब्रेड क्रम्स्
१/४ वाटी मैदा + चवीनुसार मीठ.
१ अंडे.(फेटलेले.)
अंड्याला पर्याय हवा असल्यास २ चमचे मैदा + १ चमचा बेसन एकत्रं करुन थोडं पाणी टाकुन भजीच्या पीठा पेक्षा किंचीत पातळ भिजवावं.

कृती:

या पाककृतीसाठी आपल्याला थोडा सॉस / रस्सा लागणार आहे. तर सर्व प्रथम आपण तो बनवून घेऊ.
सॉस
एका कढईत ३-४ चमचे तेल कडकडीत तापवून घ्यावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. चिमुट्भर मीठ टाकावं म्हणजे कांद्याला पाणी सुटुन तो लवकर शिजेल.
मग त्यात लाल तिखट / मसाला टाकून चांगलं परतुन घ्यावं.

मसाल्याचा कच्चा वास निघुन गेल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. मध्यम ते मंद आचेवर सतत परतत रहावं. चवी नुसार मीठ टाकावं. २-३ चमचे टोमॅटोची पेस्ट टाकून चांगल ढवळुन घ्यावं. चीमुटभर साखर टाकावी.

वरून झाकण ठेउन पेस्टचा कच्चट वास जाई पर्यंत आणि कांद्या टोमॅटोचा पार लगदा होई पर्यंत शिजवावे. हा सॉस बनवताना शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. (झाकण ठेवल्यावर आतल्या बाष्पाचं जितकं पाणी पडेल तितक पुरेसे आहे.)

वांग्याचे काप एका बशीत ब्रेड क्रम्स, दुसर्‍यात मैदा + मीठ आणि तिसर्‍यात फेटललं अंडे ठेवुन हाताशी ठेवावं.
(ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी २ चमचे मैदा + १ चमचा बेसन + पाणी एकत्र करुन भजी पेक्षा थोडं पातळ पीठ भिजवून घ्यावं.)

वांग्याचे साधारण १ ते दिड सेंमी जाड काप करुन घ्यावे.
लाल तिखट / मसाला + तेल + मीठ एकत्र करुन ते वांग्याच्या कापाना लावून किमान २० मिनीटे मुरत ठेवावं.
मुरवलेल कापांना पाणी सुटलेल असल्याने ते सर्वप्रथम मैद्यात घोळवून घ्यावे. मग ते फेटलेल्या अंड्यात घोळवून शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.

तव्यावर २ चमचे तेल सोडून ते कडकडीत तापल्यावर त्यात हे वांग्याचे काप खरपूस तळून घ्यावे.
हे तळलेल काप एखाद्या जाळी वर ठेवावे म्हणजे खालून वाफ धरुन ते मऊ पडणार नाहीत.

(इथले २-३ फोटो माझ्या धांदरट पणामुळे डिलीट झाले. Sad )

एका बेकिंग पेल्ट मध्ये खाली थोसा सॉस पसरवून घ्यावा त्यावर एक वांग्याचा काप ठेवावा. वरून परत थोडा सॉस लावून त्यावर अजुन एक काप असा थर रचावा. वर परत थोडा सॉस लावुन बचका भर तुमच्या आवडीचं चीज ठेवावं. (मी मोझ्झेरेला चीज वापरलय.)
नंतर ही बशी ओव्हनमध्ये ग्रील मोड वर चीज वितळे पर्यंत ठेवावी (अंदाजे १ ते दीड मिनीट.)
ओव्हन नसल्यास मायक्रॉवेव्हमध्येही चालेल.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
स्टार्टर म्हणुन वाढायला हरकत नाही.

पण हा पदार्थ गरम असतानाच खाण्यात मजा आहे. तेव्हा ताबडतोब लुत्फ घ्यावा.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

वाटल्यास थोडासा पुलाव/ जीरा राईस सोबत साईड डिश म्हणुनही वाढू शकता.


Saturday 10 December 2011

तंदूरी खेकडे / क्रॅब्स्

काय, तोंडाला पाणी सुटलं की नाही नाव वाचुनच? Smile
माझंही असच होतं खेकड्याचं नाव काढलं की. काल मस्त मोठ्ठे खेकडे मिळाले. म्हटल नेहमीच्या कालवणापेक्षा आज काही वेगळं करुन पहावं. मागे एका जालीय मैत्रीणीच्या जालनीशीवर तंदूर खेकड्याचे फोटो पाहिले होते. म्हटलं चला हेच करुन पहावं.
मंडळी तस ही पाककृती करायला एकदम सोप्पी कमी वेळ काढू आहे. पण तरी तुमच्याकडे वेळ मुबलक हवा. अहो चवीने खायचं तर तेवढी फुरसत हवीच. Wink
चला तर लागुया तयारीला......

साहित्यः मोठे खेकडे. जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात.४ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
३ मोठे चमचे तंदूर मसाला.
२ मोठे चमचे काश्मीरी लाल तिखटं. (वस्त्रगाळ केलं असल्यास उत्तम रंग येतो.)
मीठ चवीनुसार. (खेकडे गोडुस असतात त्या प्रमाणे कमी जास्त प्रमाण ठरवावे.)
२ चमचे तेल. (ऑलिव्हचं त्यातल्या त्यात हृदयासाठी बरं.)

कृती: खेकड्याचं कवच काढुन त्याचे कल्ले (गिल्स्) काढुन टाकावे.वहात्या पाण्याखाली स्वछ धुवून घ्यावे.फांगडे / नांग्या तोडून वेगळ्या कराव्या. खेकडे मोठे असतील तर मधो मध कापून २ तुकडे करावे.
खलबत्त्याच्या दांड्याने फांगडे किंचींत ठेचावे म्हणजे मीठ मसाला आत शिरू शकेल.
दही, मीठ, तेल, मसाला, लाल तीखट एकत्र करुन घ्यावं.
खेकड्याच्या प्रेत्येक तुकड्याला त्यात घोळवून नंतर फ्रीज (फ्रीजर्मध्ये नाही) मध्ये ३० मिनीटे  मुरत ठेवावं.
अर्ध्या तासानंतर बेकिंग ट्रेला अ‍ॅल्युमिनियमची फॉईल लावुन त्यावर सर्व तुकडे पसरवून ठेवावे.
ओव्हन १८०° C वर तापमान ठेवून खेकडे अ‍ॅल्युमिनियमच्या फॉईलने झाकून १०-१५ मिनीटे शिजवावे.
१०-१५ मिनीटांनंतर वरुन ठेवलेली अ‍ॅल्युमिनियम फॉईल काढुन टाकावी. आणि अजुन १०-१५ मिनीटे शिजवावे. मध्येच एकदा तुकडे वर खाली करुन बाजू बदलावी.
वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबाच्या फोडींनी सजवून गरमा-गरम सर्व्ह करावं.


Sunday 4 December 2011

पाया

आमचा बा पाया बनीवन्यात यकदम येक्ष्पर्ट. आम्ही तेच्या पास्नचं धडं गिरवलं ल्हान आसताना. आज लै दिसानं बकर्‍याचं पाय दिसलं दुकानात, तवा बाची आठवन आली. लगेच बकयाचं पाय घेतलं आन बाला फोन लावला. थोडी उजलनी केली. आन खुशीत घरला निघालू. आवं आवं जरा दम खावा. सांगतु की सम्द बैजवार. पर दोस्तहो तुमचाकडं मोप टैम आसान तरच जा जी याच्या वाटेन. रांधल वाढलं खाल्लं आसं शिंपळ नस्तय ह्ये. वाईच टैम खानारी रेशीपी हाय ही.
पन ते म्हंत्यात नंव्हका सब्र का फल चवदार व्हताय. ते आक्षी खरं बगा.


सगल्यात पैल घ्या बकर्‍याचं चार पाय. खाटका कडनच यवस्थीत साफ करुन घ्या.
(आता ह्यो फटु मुद्दाम टाकत न्हाई. उगा कुनाच्या प्वटात कालव कालव हुयाची. Wink )
योक मोठा कांदा.
३ तांबोटी/टमाटी.
३-४ मोठं चमचं आल लस्नाच वाटन.थोडं सुक मसालं.
यात योक योक चमचा हळद , धनं पुड , जीरं पुड , लाल तिखटं , घरचा मसाला / पाया मसाला.थोडा खडा मसाला घ्या. जीर, लवंग, दालचीनी, काळीमीरी, तमालपत्र, चक्रीफुल, येल्ची.
थोडी कोथमीरी, आल्याचं बारीक लांब तुकडं, लिंबू.
१/२ वाटी ताज दही नाय तर नारलाचं दाट दुध.
तेल, मीट तुमच्या मर्जी वानी.सर्वात पैले बकर्‍याचं पाय स्वछ धूउन घ्या. (तुकडं खाटकाकडनच करुन घ्या.)
आन बाजुला ठिउन द्या.

कांदा आन तांबोटी जित्की बारीक कापता येतीन तित्की बारीक कापून घ्या. तुमच्या कडं ते फूड प्रोफेसर असान तर त्याले कामाला लावा.
आम्ही गरीबं आपलं सुरीनच कापतू.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकुन मंग तेच्यात कांदा टाका. कांद्याच्या गालावं गुलाबी
आली की मंग त्यात आल-लस्नाचं वाटान टाकुन त्येचा कच्चा वास जाई पर्यंत परतत र्‍हा.

नंतर त्यात बारीक चिरलेली तांबोटी टाका. आन कांद्या तांबोट्याचा पार लगदा हुईस्तव शिजवून घ्या.

नंतर त्यात सम्दे मसाले (पावडर वाले) टाका. आवडी परमान मीट टाका आन बसा ढवळत.
ह्यो मसाला यकदम नीट शिजाया होवा. बाजून तेल सुटाया लागलं की कळनच तुमास्नी.

नंतर पायाचे तुकडे टाकुन, यवस्थित ढवळुन घ्या. मसाला सगळी कडुन बसला पायजे. जरा २ -४ मींट मोठ्या धगीवर परतत र्‍हा.

आता यात बर्‍यापैकी म्हंजे निदान ३/४ लिटर पाणी टाका. यवस्थित ढवळा.
वर जो खडा मसाला सांगीटलाय नव्ह, तो येका तलम कापडात गुंडाळुन त्याची पुरचुंडी बांधा, आन द्या सोडुन यात.
वरन झाकन ठेउन ३-४ तास लहान धगीवर शिजाया ठेवा.
आता तुमच्याकडं तेवढा टैम नसन ( त्यातच ते बेणं ग्यासच पण पैसं बी वाढल्याल) तर मंग कुरला झाकन लावून तेच्या ७-८ शिट्या घ्या. पटापट न्हाई बरका. शेगडी मध्यम धगीवरच ठेवा.
(आता शिट्या घ्या म्हनलं की आमचे काही मित्र लगेच येनार आन सांगनार शिट्या घेयाची गरज न्हाई. ठिक है बाबा तुमाना शिट्या घेतल्या बिगर जमत आसन तर तुम्ही शिट्या नका घीउ.)
कोळश्याची शेगडी आसन तर लैच ब्येष्ट.
कुकर बंद केला की गप गुमान झोपी जायाच. कुकर उघडाचा ते डायरेक्ट दुसर्‍या दिवशीच.
आता कळ्ळ म्या वर का म्हन्लो की तुमचाकडं मोप टैम आसान तरच जा जी याच्या वाटेन.


Winkदुसर्‍या दिवशी झाकंन काडल्यावर हे आसं दिसन. ती खडा मसालावाली पुरचुंडी काडुन फेकुन द्या.
आत्ता टेस्ट घ्याया हरकत नाय.


Smileआसच थोडं गरम करुन खाल्लं तरी चालल की.
पर थोडं चवीत बदल कराचा आसन. रस्सा थोडा दाट पायजे आसन तर त्यात १/२ वाटी ताज दही किंवा नारलाचं दाट दुध टाका. चांगलं ढवळा आन मंग थोडं गरम करा.

वरनं थोडं लिंबू मारुन, आलं, कोथमीरी टाकुन सजवा.
येच्या सोबतीला कर तंदुर मधली, नै तर आपली ज्वारी बाजरीची रोटी आसन तर आजुन काय पायजे राव.
पर मी येच्या संगटीनं अप्पम बनवलं तेबी एकदम भन्नाट लागल बगा.
तर मंग कवा बुलाविताय आमास्नी 'पाया' खाया?


अप्पमचा इडो :


अप्पमसाठी २ कप तांदुळ भिजत ठिवलेला, १ कप भात, ३ कप नारलाचा चव आन चवी परमान मीट ह्य सम्द एकत्र वाटुन रातभर आंबाया ठेवा.