जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday, 20 December 2011

एगप्लांट + मोझ्झेरेला चीज (उर्फ वांग्याचे काप फ्राय)
आज जवळ जवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता नावातच एग असल्याने अंड्याचा वापर अपरिहार्य आहे. Wink पण तुम्ही अंड खात नसाल तर त्यावरही उपाय आहे.
नेहमीसारखे वांग्याचे काप करण्या ऐवजी आज पाकृमें थोडा टिव्स्ट्.

साहित्यः
एक मोठं वांगं.
एक मोठा कांदा (जीतका शक्य असेल तितका बारीक चिरलेला.)
२ मध्यम टोमॅटो  (                        .-॥-                              .)
२-३ चमचे टोमॅटोची पेस्ट.
चिमुटभर साखर (ऑप्शनल.)
१ चमचा लाल तिखटं / मसाला.
१/४ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
२-३ चमचे तेल.
१/४ वाटी ब्रेड क्रम्स्
१/४ वाटी मैदा + चवीनुसार मीठ.
१ अंडे.(फेटलेले.)
अंड्याला पर्याय हवा असल्यास २ चमचे मैदा + १ चमचा बेसन एकत्रं करुन थोडं पाणी टाकुन भजीच्या पीठा पेक्षा किंचीत पातळ भिजवावं.

कृती:

या पाककृतीसाठी आपल्याला थोडा सॉस / रस्सा लागणार आहे. तर सर्व प्रथम आपण तो बनवून घेऊ.
सॉस
एका कढईत ३-४ चमचे तेल कडकडीत तापवून घ्यावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. चिमुट्भर मीठ टाकावं म्हणजे कांद्याला पाणी सुटुन तो लवकर शिजेल.
मग त्यात लाल तिखट / मसाला टाकून चांगलं परतुन घ्यावं.

मसाल्याचा कच्चा वास निघुन गेल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. मध्यम ते मंद आचेवर सतत परतत रहावं. चवी नुसार मीठ टाकावं. २-३ चमचे टोमॅटोची पेस्ट टाकून चांगल ढवळुन घ्यावं. चीमुटभर साखर टाकावी.

वरून झाकण ठेउन पेस्टचा कच्चट वास जाई पर्यंत आणि कांद्या टोमॅटोचा पार लगदा होई पर्यंत शिजवावे. हा सॉस बनवताना शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. (झाकण ठेवल्यावर आतल्या बाष्पाचं जितकं पाणी पडेल तितक पुरेसे आहे.)

वांग्याचे काप एका बशीत ब्रेड क्रम्स, दुसर्‍यात मैदा + मीठ आणि तिसर्‍यात फेटललं अंडे ठेवुन हाताशी ठेवावं.
(ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी २ चमचे मैदा + १ चमचा बेसन + पाणी एकत्र करुन भजी पेक्षा थोडं पातळ पीठ भिजवून घ्यावं.)

वांग्याचे साधारण १ ते दिड सेंमी जाड काप करुन घ्यावे.
लाल तिखट / मसाला + तेल + मीठ एकत्र करुन ते वांग्याच्या कापाना लावून किमान २० मिनीटे मुरत ठेवावं.
मुरवलेल कापांना पाणी सुटलेल असल्याने ते सर्वप्रथम मैद्यात घोळवून घ्यावे. मग ते फेटलेल्या अंड्यात घोळवून शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.

तव्यावर २ चमचे तेल सोडून ते कडकडीत तापल्यावर त्यात हे वांग्याचे काप खरपूस तळून घ्यावे.
हे तळलेल काप एखाद्या जाळी वर ठेवावे म्हणजे खालून वाफ धरुन ते मऊ पडणार नाहीत.

(इथले २-३ फोटो माझ्या धांदरट पणामुळे डिलीट झाले. Sad )

एका बेकिंग पेल्ट मध्ये खाली थोसा सॉस पसरवून घ्यावा त्यावर एक वांग्याचा काप ठेवावा. वरून परत थोडा सॉस लावून त्यावर अजुन एक काप असा थर रचावा. वर परत थोडा सॉस लावुन बचका भर तुमच्या आवडीचं चीज ठेवावं. (मी मोझ्झेरेला चीज वापरलय.)
नंतर ही बशी ओव्हनमध्ये ग्रील मोड वर चीज वितळे पर्यंत ठेवावी (अंदाजे १ ते दीड मिनीट.)
ओव्हन नसल्यास मायक्रॉवेव्हमध्येही चालेल.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
स्टार्टर म्हणुन वाढायला हरकत नाही.

पण हा पदार्थ गरम असतानाच खाण्यात मजा आहे. तेव्हा ताबडतोब लुत्फ घ्यावा.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

वाटल्यास थोडासा पुलाव/ जीरा राईस सोबत साईड डिश म्हणुनही वाढू शकता.


2 comments: