जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 27 April 2014

फणसाच्या आठ्या आणि सोडे.

ध्यानी मनी नसताना आणि फणसाचा हंगाम नसतानाही या एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच फणस खायला मिळाला. फणसाच्या रसाळ गर्‍यांच्या जोडीने त्यांच्या आठ्या (बीया) ही आमच्या घरात सगळ्यांना प्रिय आहेत. नुसत्या उकडुन आणि वरुन थोडंसं मीठ भुरभुरुन उत्तम लागतातच पण मला त्या नुसत्या उकडुन खाण्यापेक्षा सुकट टाकुन केलेल्या कालवणात जास्त आवडतात. यावेळी येताना आईने आठवणीने सोडे दिले.

साहित्य :फणसाच्या आठ्या सोललेल्या.सोडे, गरम-कोमट पाण्यात १५-२० मिनीटे भिजवलेले.प्रत्येकी २ मध्यम आकाराचे कांदे, बटाटे, टॉमेटो, वांगी.
आवडत असल्यास भिजवलेले वाल (सालां सकट.)
२ मोठे चमचे तेल, १ लहान चमचा हळद, ३ मोठे चमचे मसाला, मीठ चवी नुसार.
चिंचेचा कोळ. १-२ चमचे आलं-लसुण वाटण.
२-३ मोठे चमचे तांदळाची पीठी.

कृती :आठ्या हलकेच ठेचुन, एका शिट्टिवर उकडुन घ्याव्या.तेलावर कांदा परतुन घ्यावा. गुलाबी झाला की त्यात आलं लसुण वाटण, हळद, मसाला, किंचीत मीठ टाकून, मसाल्याचा खमंग वास दरवळे पर्यंत परतत रहावं.मसाला तेल सोडू लागला की त्यात वाल आणि बटाटे टाकुन परतावं. थोडं पाणी टाकून भांड्यावर झाकण ठेऊन मध्यम आचेवर बटाटे आणि वाल शिजू द्यावे.वाल शिजले की मग वांगी आणि टॉमेटो टाकावे. वांगी अर्धवट शिजली की मग भिजवलेले सोडे आणि उकडलेल्या आठ्या टाकाव्या. आच लहान करुन वांगी शिजू द्यावी. वांगी शिजली की मग चिंचेचा कोळ टाकून एक उकळी आणावी. चवी नुसार मीठ घालावं.

तांदळाची पीठी अर्ध्यावाटी पाण्यात मिसळुन टाकावी. परत एक उकळी आणावी आणि आचं बंद करावी.
याच्या जोडीला मसाला फ्राय सुके बोंबील हे हवेच

.
                     

तांदळाच्या भाकरी सोबत वा भाता बरोबर गरमागरम ओरपावे.