जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Friday, 23 November 2012

_/\_

पुढल्या महिन्या अखेरीस 'खा रे खा' दोन वर्षे पूर्ण करेल. या दोन वर्षांत तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद माझ्या उत्साहाला खत-पाणी घालत आला आहे. आज 'खा रे खा'नं लाखाची वेस ओलांडली ती ही निव्वळ तुमच्यामुळेच. तुमच्या या कौतुक आणि पाठबळाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानून हात झाडण्याचा कृतघ्नपणा करणार नाही. 

हा ब्लॉग सुरु करताना मनात धाक धुक होती.  मुळात लिहिणे हा माझा पिंड नाही, त्यात  धरसोड वृत्ती यांमुळे मला हा ब्लॉग चालवणे कितपत जमेल? ही शंका होतीच.  परंतु प्रत्येक पोस्टला मिळणारे 'लाईक्स', 'पेज व्हिजीट्स्'नी  माझ्यातला उत्साह टिकवून ठेवला आहे.   

जास्त काय बोलू? लोभ आहेच, तो असाच वृद्धिंगत होत राहो, हीच मागणी.


विनम्र - गणपा (उर्फ प्रतिक ठाकूर.)

Wednesday, 7 November 2012

चिकन शवर्मा


गेल्या आठवड्यात व्हेजींसाठी फलाफील आणि व्हेज-शवर्मा झाला. एक आठवडा कोंबडीलाही विश्रांती मिळाली असेल. म्हणुन पुन्हा सामिश प्रेमींसाठी चिकनकृती. हास्य

साहित्य :

.

चिकन थाईज. (हाडं काढुन टाकलेली.)
२ चमचे तंदुर मसाला.
२ चमचे आलं वाटण.
१ चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा काळीमिरी पुड.
१ चमचा लसुण पुड. / वाटण.
एका लिंबाचा रस.
चवीनुसार मीठ.

कृती :

.

शक्यतो हाडं काढुन चिकनच्या मांड्यांकडचा भाग घ्यावा. कट कट कमी करायची असल्यास सरळ चिकन ब्रेस्ट वापरावे.
चिकनचे दोन भाग करुन घ्यावे. (एक मसालेदार तर एक कमी तिखट बनवण्यासाठी.)
एका भागात तंदुर मसाला, आलं वाटण, लाल तिखट, लसुण पुड, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करावं.
तर दुसर्‍या भागात मीठ, काळिमिरी पुड, आल वाटण, लसुण पुड आणि लिंबाचा रस टाकुन एकत्र करावं.
चिकनला चरबी नसेल तर १-२ चमचे तेल टाकावं.
दोन्ही चिकन फ्रीजमध्ये किमान २ तास तरी मुरत ठेवावं.

.

चिकन मी ओव्हनमध्ये भाजायचं ठरवलं होतं. काही ओव्हन मध्ये ग्रिल करण्यासाठी गोल फिरणारी खास सोय असते जी माझ्या ओव्ह्नमध्ये नाही. म्हणुन घरच्या घरीच तारेचे २ स्टँड बनवले. जे फिरते नव्हते पण बराचसा तसाच इफेक्ट मिळाला जसा मला हवा होता.
त्या स्टँडमध्ये चिकनचे तुकडे ओवून घेतले. वरून एक लिंबाची फोड ठेवली.

.

ओव्हन २००°C वर १० मिनिटं तापवुन घेतल्या नंतर हे दोन्ही स्टँड आत ठेऊन ३० मिनिटं भाजुन घेतलं.

.

चिकन तयार झाल्यावर त्याचे लहान तुकडे करून घ्यावे. सोबत लेट्युस, टॉमेटो, ताहिनी सॉस, फ्रेंच फाईज यांची ही जुळवा जुळव करुन ठेवावी.

.

पिटा ब्रेड/ खुबुस अर्धा उघडुन त्यात वरील मिश्रण भरुन घ्यावं.
रोल करुन गरम-गरमच सर्व्ह करावं.

.

Thursday, 1 November 2012

फलाफील - शवर्मा

मध्यपुर्वेत असताना (तेव्हाच्या)आम्हा बॅचलर लोकांच मधल्या वेळेतलं खाणं म्हणजे शवर्मा(शोरमा). स्वस्त आणि मस्त. तेव्हा व्हेज शवर्माच्या वाटेला जरी फारसा जात नसलो तरी मला फलाफील फार आवडायचे. नुसते फलाफील आणि सोबतीला डीप म्हनुन हमुस बस, एका बैठकीत ७-८ रिचवले की पोटभरू काम व्हायचं.

साहित्य : 

ताहिनी सॉससाठी.

.

अर्धी वाटी ताहिनी.(तिळाची पेस्ट)
लिंबाचा रस.
३-४ लसणाच्या पाकळ्या.
थोडीशी पार्सली.
मीठ चवी नुसार.

फलाफीलसाठी.

.

१ वाडगा काबुली चणे (रात्रभर भिजवलेले.)
१ मोठा कांदा.
२ हिरव्या मिरच्या.
बचकाभर पार्सली.
२ मोठे चमचे मैदा.
१ मोठा चमचा भाजलेल्या जीर्‍याची पुड.
१ मोठा चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.

कृती :

.

एका भांड्यात ताहिनी आणि लिंबाचा रस फेटुन घ्यावा. प्रवाहीपणासाठी गरजे नुसार पाणी घालावे.
लसुण आणि पार्सली बारीक चिरुन टाकावे. चवी प्रमाणे मीठ घालावं
हा झाला सॉस तयार.

फलाफील.

.

काबुली चणे, कांदा, मिरच्या, पार्सली सगळं फुडप्रोसेसरमध्ये घालुन भरड वाटावं. (फुडप्रोसेसर नसल्यास मिक्सर ही चालेल पण अगदिच पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.)
नंतर त्यात मैदा, जीरे-काळिमीरी पुड आणि मीठ टाकुन एकत्र करावं.

.

तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळुन घ्यावे.

.

हे फलाफील नुसतेच हमूस सोबत चापता येतील.
जर घरात खूबूस/पीटा ब्रेड असेल तर व्हेज शवर्मा बनवायला वेळ नाही लागायचा.

शवर्मा :

.

खूबूस / पीटा ब्रेड.
फलाफील.
लेट्युस, टॉमेटो चिरलेले.
ताहिनी सॉस.
फ्रेंच फ्राईज.

.

खूबूस / पीटा ब्रेड अर्धवट उघडुन घ्यावा. २-३ फलाफील कुस्करुन घ्यावे. टॉमेटो, लेट्युस फ्रेंच फ्राईजचे तुकडे करुन ते घालावे. वरुन ताहिनी सॉस घालावा आणि त्याचा रोल करुन सर्व्ह करावा.

हे गरम गरम असताना खाण्यातच मजा.

.