जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Friday, 22 April 2011

चिकन क्रिस्पी

साहित्यः१ मध्यम कांदा आडवा चिरलेला.
१ मध्यम भोपळी मिरची लांबट उभी चिरलेली. (ज्युलियन्स.)
१ लहान गाजर लांबट उभे चिरलेले. (ज्युलियन्स.)
पातीचा कांदा सजावटीसाठी.
१ इंच आल्याचे ज्युलियन्स.
४-५ लसुण पाकळ्या बारीक चिरलेल्या.१/२ वाटी कणिक.
१/२ वाटी मैदा.
२ अंड्यांतला पांढरा भाग.
१/२ वाटी ताक.
लाल तिखटं. मीठ चवी नुसार.
ब्रेडचा चुरा.१/२ किलो चिकन (शक्यतो बोनलेस) लहान तुकडे करुन.
१ चमचा आलं-लसुण पेस्ट.

कृती:


चिकनला आलं-लसणाची पेस्ट, मीठ, आणि लाल तिखटं लावुन १० मिनिटे मुरत ठेवावं.


एका झिप लॉकच्या पिशवीत कणिक, मैदा, लाल तिखट एकत्र करुन त्यात चिकनचे वर मुरवलेले तुकडे टाकुन नीट एकत्र कराव.ताक आणि अंडी फेटुन एका बशीत काढुन घ्यावं. दुसर्‍या बशीत ब्रेडचा चुरा ठेवावा.
ओव्हन २५० °C वर तापत ठेवावा. ट्रेला अ‍ॅल्युमिनियम फॉइल लावुन वरुन तेलाचा स्प्रे मारावा.
चिकनचा एक एक तुकडा आधी अंड्यात बुडवुन मग ब्रेडच्या चुर्‍यात घोळवुन ट्रे मध्ये ठावावा.
१५-२० मिनिटे. बेक करावं.
(ओव्हन नसेल तर तेलात तळुन घेतले तरी चालतील.)एका कढईत थोड्या तेलावर आल लसुण आणि मिरची परतुन घ्यावी.त्यात कांदा आणि भोपळी मिरची टाकुन १ मिनिट नीट परतुन घ्यावं.मग त्यात पाती कांदा, गाजर, चीली सॉस्/ केचप टाकुन मोठ्या आचेवर १ मिनिट परतावे.
भाज्या पुर्ण शिजवु नयेत. करकरीतपणा राहिला पाहिजे.नंतर त्यात चिकनचे तुकडे टाकुन परत १ मिनिटं मोठ्या आचेवर परतावे.
वरुन पाती कांद्याने सजवुन गरमागरमच वाढावं.

Wednesday, 20 April 2011

खिमा-पाव

परवा प्रभ्याशी गप्पा हाणताना खिम्याचा विषय निघाला. तसा तो खुप आधी पासुन माझ्या मागे लागला होता की खिम्याची पाकृ दे एकदा. पण योग जुळुन आला नव्हता. असो तर ही पाकृ खास आपल्या प्रभ्याच्या आग्रहा खातर.

साहित्यः१ लहान चमचा हळद.
१ मोठा चमचा मसाला (मालवणी/वाढवळ)
१ लहान चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा शाहीजीरे/जीरे.
१ मोठा चमचा धणे पुड.
१ मोठा चमचा जीरे पुड. (भाजलेले.)
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखटं.
२ चमचे आलं-लसुण पेस्ट.
दालचीनी १ इंच.
२ वेलच्या.
१०-१५ काळीमिरे.
जवित्री (असल्यास)
तमाल पत्रं (असल्यास)३-४ मध्यम कांदे (जितेके बारीक कापता येतील तेवढे बारीक कापुन.)
२ मध्यम टॉमेटो. (-------"------)
१ वाटी मटार दाणे.
२-३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. (ऐपती नुसार प्रमाण कमी जास्त करता येईल.)
कोथिंबिर.
एका लिंबाचा रस.
तेल, मीठ चवीनुसार.१/२ किलो खिमा.

कृती:एका कढईत १ डाव तेल तापवुन त्यात खडा मसाला आणि हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्याव.
नंतर त्यात कांदा टाकुन तो गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.नंतर त्यात बाकिचे मसाले (गरम मसाला वगळुन) टाकावे. लाल तिखट पाण्यात घोळवुन टाकावं.मसाला नीट परतल्या नंतर त्यात टॉमेटो टाकुन तो पुर्ण गळे पर्यंत परतत रहावं.वरील मिश्रण बाजुने तेल सोडु लागल की आच मोठी करुन त्यात खिमा टाकावा. आणि परतुन घावं.
(खिमा टाकताना आधी तो थोड पाणी टाकुन खिमा मोडुन घ्यावा. अन्यथा खिमा टाकल्यावर लगेच गुठळ्या होतात.)
नंतर आच मध्यम ते लहान करुन वर झाकण ठेवुन १५-२० मिनीटे शिजु द्यावं.मटार टाकुन परत एकदा ५ मिनिटे झाकण ठेवुन शिजवुन घावं.
(जर मटार डिफ्रिज मधले असतील वा कॅन मधले शिजवलेले नसतील तर टॉमेटो टाकायच्या आधीच मटार टाकावे. )
लिंबाचा रस टाकुन वरुन गरम मसाला भुर भुरावा.
ताज्या पावा सोबत वा चपाती/भाकरी/पराठे जे उपलब्ध असेल त्याच्या सोबत ताव मारा. Smile

Sunday, 17 April 2011

तंदूर कोलंबी आणि फ्लर्टीनी

नमस्कार मंडळी,
मागच्या वेळेच्या गणनाट्याच्या अंका प्रमाणेच या विकांतालही आम्ही हजर आहोत!! या खेपेला गणपाशेट बनवणार आहेत तंदूर कोलंबी आणि मी बनवले आहे फ्लर्टीनी. गणपाशेटची पाककृती बघीतल्यावर, खरं सांगतो, अक्षरशः लाळ गळायला लागली. आधीच कोलंबी माझा वीक-पॉईंट आणि त्यात साक्षात तंदूरभट्टीवर..अक्षरशः त्या तंदूरमध्ये जळून कोळसा झाला आमचा. आता इथे उन्हाळा सुरू झाला की पहिली बार्बेक्यू पार्टी गणपाशेटच्या नावाने.
तर अशी आहे तंदूर कोलंबीची पाकृ:

साहित्य:

ताजी कोळंबी.२ चमचे ताजं घट्ट दही.
१ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट.
१ मोठा चमचा तंदुर मसाला.
१ चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ लहान चमचा हळद.
तेल/बटर
मीठ स्वादानुसार.
लिंबाचा रस.

कृती:

कोळंबी मधला काळा दोरा काढुन टाकावा आणि कोळंबी स्वच्छ धुवून घ्यावी. थोडी हळद,मीठ आणि लिंबाचा रस लावुन ठेवावी.
वरील सर्व मसाले एकत्र करुन कोळंबी त्या मिश्रणात घोळवून घावी. फ्रिज मध्ये ३०-४० मिनिटे मुरत ठेवावी. नंतर बांबुच्या शिगा घेउन त्यात (आकारा नुसार) ३-४ कोळंब्या ओवुन घ्याव्या.ग्रिल असल्यास ग्रिल वर, नसल्यास नॉन्स्टिक तव्यावर थोड बटर सोडुन त्यात या कोळंब्या दोन्ही बाजुंनी तळुन घ्याव्या.

मग वाट कसली पहाताय करा हात लांब उचला काडी आणि तो खालचा ग्लास चियर्स.Wink


 टिप : ग्रीलचा इफेक्ट देण्यासाठी मी सुरी तापवुन वरुन डाग दिले आहेत. त्याने चवीत काही फरक पडत नाही. पदार्थाची चव घेण्यापुर्वी  जर डोळ्यांच्या पसंतीची पावती मिळाली की अर्धा किल्ला तिथेच सर होतो म्हणतात ना म्हणुन हा खटाटोप. ;)


गणपा शेटने कळवले की या वेळेला तो तंदूर प्रॉन्स करणार आहे. प्रॉन्स म्हटले की आपल्याला बुवा समुद्र किनारा आठवतो. मस्त पैकी समुद्रकिनारी सुर्यास्त बघतबघत पापलेट फ्राय, प्रॉन्स फ्राय, प्रॉन्सची भजी इ. इ. चा आस्वाद घेताना सोबत तरूणी आणि वारूणी असावी.. आहाहा!! (अशी आमची तरूणपणातली इच्छा होती.. आता काय.. असो!! तुका म्हणे "ठेवीले अनंते तैसेची रहावे..").
अर्थात वारूणी (आणि तरूणी सुध्दा) अशी हवी की तिने साथीदाराच्या रंगात नुसतेच रंगून जावू नये तर रंग अजून खुलवावेत (त्या बाबतीत बाकी आम्ही भलतेच सुदैवी). त्यामुळे यावेळेस कॉकटेल करताना मला बराच विचार करावा लागला. या समुद्र किनार्यावरच्या तरूणी आणि वारूणी यांच्याशी एकाच वेळेस प्रियाराधन करायचे असेल्यामुळे मी यावेळेस एक नवीन कॉकटेल बनवले आहे. थोडक्यात काय एकाच वेळेस एक डोळा भटीणीला आणि एक डोळा भावीणीला घालता आला पाहीजे. या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "फ्लर्टीनी". आहे की नाही प्रसंगाला योग्य!! चला तर हिच्याशी फ्लर्ट कसे करायचे ते बघूया:
- १ औंस कॉईनट्रू
- २ औंस व्होडका
- २ औंस अननसाचा रस
- ५ औंस शँपेन
- २ अननसाचे तुकडे
- १ अननसाचा काप आणि १ चेरी सजावटीसाठी
- बर्फ
शेकरमध्ये अननसाचे तुकडे आणि कॉईनट्रू टाकून लाकडी दांड्याने (लाकडी लाटणे वापरणे उत्तम) थोडेसे चेचा. नंतर त्यात बर्फाचे तुकडे, अननसाचा रस आणि व्होडका टाकून एक मिनीटभर शेक करा. आता हे मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये गाळून घ्या. त्यावर कडेकडेने शँपेन ओता आणि सजावटीसाठी ठेवलेला अननसाचा काप आणि चेरीने सजवा.
आता भिडवा ओठांना !!!!मागच्या अंकाच्या वेळेस मला बर्याच जणांनी (आणि जणींनी पण) कळवले होते की नॉन-अल्कॉहोलीक कॉकटेल्स (मॉकटेल्स) पण करा. तर या सर्वांचा मान ठेवून या वेळेस तो उपाय सुध्दा सुचवत आहे. कॉइनट्रूच्या ऐवजी संत्र्याचा रस आणि व्होडकाच्या ऐवजी अर्ध्या लिंबाचा रस वापरा. तसेच शँपेनच्या जागी अ‍ॅपल सायडर (किंवा सफरचंदाचा रस) वापरा. झाले की तुमचे मॉकटेल.. मी दोन्हींची चव घेवून पाहीली तर कॉकटेल व्होडकामुळे किंचीतसे कडवट लागत होते.. बाकी सर्व शेम-टू-शेम!!डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.

शब्दांकन : नाटक्या Friday, 15 April 2011

मलबारी एग रोस्ट.

दुबईला लग्ना आधी आम्ही ऑफिस मधले ४ बॅचलर मित्र, पेइंगेस्ट म्हणुन एकत्र रहायचो. ४ खोल्यां पैकी २ खोल्या घरमालकाने भाड्याने दिल्या होत्या. त्या आम्ही चार मित्रांनी पटकावल्या होत्या. किचन वापरायची मुभा होती. पण शक्यतो ते जुम्मे के जुम्मेच वापरल जायचं. (नाही म्हणायला घर मालक जेव्हा सुट्टीत महिनाभर गोव्याला जायचा तेव्हा आमची चंगळ असायची.) त्यामुळे रोजच्या जेवणासाठी आम्ही मलबारी, पंजाबी, नेपाळी,पाकिस्तानी,मद्राशी अश्या वेग वेगळ्या होटेल्समध्ये वार लावले होते. (गोवन हॉटेल फक्त विकांतासाठी फिक्स असायच. Wink)
दुबईत मलबार्‍यांची टपरीवजा हॉटेल पावसाळ्यात कोपर्‍या कोर्‍यात उगवणार्‍या कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी पसरलेली आहेत. आमच्या पैकी कुणी बाजीरावाची औलाद नसल्याने रोज चांगल्या हॉतेलात जाउन दुप्पट दाम मोजणे शक्य नव्हतं. त्यामुळेच कोपर्‍यावरचा स्वस्तातला 'तारुफ' मलबारी आम्हा गरीबांचा अन्नदाता होता. सकाळी २.५ दिर्हम मध्ये आमचा चहा नाश्ता आटोपायचा. ५० पैशांचा (फिल्स्) चहा, लच्छा पराठा सोबत चणा/मुगाची भाजी/खिमा/ऑमलेट/हाफ फ्राय/एग रोस्ट या पैकी काही तरी एक. किंवा मग कुठल्याही दक्षिण भारतीय हॉटेलात मिळणारे डोसा/इडली/वडा सांबर, अप्पम आदी पदार्थ. दुपारी जेवणात ४-५ दिर्हम मध्ये अनलिमिटेड (४ ला मोटा राईस आणि ५ ला बारीक राईस) थाळी मिळायची. तारुफ मलबार्‍याकडची बिर्याणी मस्त असायची. मी नेहमी तीच हाणायचो.

तर ह्या जुन्या आठवणी काढायच कारण असं की काल घरातला बहुतेक सगळा भाजीपाला खल्लास झाला होता. अगदी अडी नडीला साथ देण्यार्‍या बटाट्यांनी ही पाठ फिरवली होती. मोजुन ३ कांदे आणि २ टमाटि तेवढी बाकी होती. डिफ्रिजर उघडला तर तो पण 'आ'वासुन माझ्याकडेच पहायला लागला. दरवाज्यात ३ अंडी उरली होती. काल परवाच भुर्जी करुन झाली होती म्हणुन तो ऑप्शन पण बाद. आणि अचानक मलबार्‍याचा एग रोस्ट आठवला. नेहमीच्या बैदाकरी आणि अंडा भुर्जी खाउन कंटाळलेल्या माझ्या अंडेखाऊ बॅचलर मित्रांसाठी हा झटपट तयार होणारा मलबारी एग रोस्ट.

साहित्यः
 
२-३ उकडलेली अंडी.
४-५ पाकळ्या लसुण बारीक चिरलेला.
१/२ इंच आलं बारीक चिरलेल.
१ लहान चमचा जिरेपुड.
१ लहान चमचा धणेपुड.
१ लहान चमचा गरम मसाला.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमीरीपुड.
१/२ लहान चमचा हळद.
१ लहान चमचा मोहरी.३ मध्यम कांदे उभे चिरलेले.
२ टॉमेटो एकदम बारीक चिरलेले.
कढीपत्ता.
३-४ मिरच्या (ऐपती नुसार.)

कृती:थोड्या तेलावर मोहरी, आलं, लसुण, मिरची, कढी पत्त्याची फोडणी करावीकांद्यासोबत मीठ टाकुन चांगला परतुन घ्यावं.कांदा गुलाबी झाला की मग त्यात टॉमेटो टाकुन तो पार गळे पर्यंत शिजवुन घ्यावं.नंतर त्यात वरील सर्व मासाले टाकुन चांगल परतुन घ्याव. मसाला खाली लागत असल्यास किंचीत पाणी टाकावं.बाजुने तेल सुटायला लागल की उकडलेली अंडी अर्धी कापुन त्यात टाकावी.
चपात्या/पराठ्यांच्या सोबतीसाठी गरमागरम एगरोस्ट तयार आहे.

Sunday, 10 April 2011

फ्लॉवर इन चीज सॉस आणि वेंग वेंग

मराठी अंतर्जाल विश्वाने मला बरेच नवे मित्र दिले. त्या पैकीच एक म्हणजे आमचे मिपाकर नाटक्याशेठ. नाटक्याशेठहे स्वतः उत्तम शेफ आहेत. कॉकटेल्स् / मॉलटेल्स् हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्याच पुढाकाराने आम्ही दोघांनी मिळुन मिपावर एक नवा उपक्रम चालु केलाय. ज्यात त्यांच्या एखाद्या कॉकटेल / मॉलटेल सोबत मी एखाद स्टार्टर (आपल्या भाषेत चखणा. ;)) देणार आहे.
या उपक्रमाची सुरवात "फ्लॉवर इन चीज सॉस" आणि "वेंग वेंग" ने करीत आहे. आशा करतो तुम्हालाही हे आवडेल.साहित्यः
फ्लॉवर १/२ किलो.
चीज.
२ मोठे चमचे मैदा.
१ लहान चमचा मस्टर्ड सॉस.
१ कप दुध.
लाल तिखटं, काळीमीरी पुड.
सजावटीसाठी : काळे ऑलिव्ह मोठे आणि छोटे, गाजराच्या चकत्या, क्रिम चीज.कृती:फ्लॉवरचे छोटे (बाईट साइझ) तुकडे करुन घ्यावे.
१/४ कप दुधात पाणी टाकुन त्यात हे तुकडे शिजवुन घ्यावे. नंतर वरुन मीठ भुरभुरुन बाजुला ठेवुन द्या.

चीज सॉस.पॅनमध्ये २ चमचे ऑलिव्हच्या तेलात मैदा खरपुस परतुन घ्यावा.आच बंद करुन वरुन थोडं थोडं दुध टाकुन मिश्रण एकजीव करावं. गुठळ्या होउ देउ नयेत.नंतर त्यात चीज टाकुन परत ढवळावं.चीज वितळलं की मग त्यात चवी नुसार मीठ, लाल तिखटं, काळीमीरी पुड,मस्टर्ड सॉस टाकुन मंद आचेवर २-३ मीनिटं ढवळावं.फ्लॉवरचे तुकडे या सॉस मध्ये घोळवुन वरुन थोडं लाल तिखट भुरभुरुन, ओव्हन मध्ये ग्रील मोडवर (फक्त वरुन झळ लागेल असं) ५-१० मीनिटं ठेवा.
या सोबत पिणेकरांची (पुणेकरांची नाही याची नोंद घ्यावी, उगाच पंचाईत व्हायची आणि धाग्याचा खरडफळा व्हायचा) सोय म्हणून माझे या वेळेचे कॉकटेल आहे "वेंग वेंग" (Weng Weng).

साहित्य:

- १/२ औंस स्कॉच व्हिस्की
- १/२ औंस व्होडका
- १/२ औंस ब्रँडी
- १/२ औंस बर्बॉन (Bourbon)
- १/२ औंस टकिला
- २ औंस अननसाचा रस
- २ औंस संत्र्याचा रस
- चमचाभर लिंबाचा रस
- १ चमचा ग्रॅनडाइन
- बर्फ
- सजावटी साठी लिंबाचे काप, चेरी, स्ट्रॉ इ. इ. इ.

कृती:

शेकर मध्ये बर्फाचे खडे घ्या. त्यात अननसाचा आणि संत्र्याचा रस घाला त्यावर सगळी मद्ये ओता आणि चांगले एक मिनीटभर शेक करा. तयार झालेले मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये ओतून घ्या. त्यात ग्रॅनडाइन अलगद सोडा. असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.
आता या कॉकटेलला सजवण्यासाठी लिंबाचा/संत्र्याचा काप ग्लासच्या कडेला अडकवा. त्यावर टूथपिकने चेरी लावा (मी छोटी छत्री वापरली आहे). जर एखाददुसरे फॅन्सी स्ट्रॉ असतील तर त्या ग्लासमध्ये ठेवा.तर लोकहो लज्जतदार "फ्लॉवर इन चीज सॉस" आणि त्या सोबत "वेंग वेंग" कॉकटेल तयार आहे. हो जाओ शूरू!!!
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...