जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Saturday 2 April 2011

चिकन भुजिंग

नमस्कार मंडळी थोड्याश्या विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी हजर आहे. आज मी आपल्यासाठी खास वसई-विरार आणि आमच्या गावाकडला पेश्शल पदार्थ घेउन आलोय. भुजिंग.  वसई ते डहाणु पट्ट्यातला भुजिंग न चाखलेला खवय्या विरळाच असावा.

निखार्‍यावर पदार्थ भाजण्याच्या प्रक्रियेला आमच्या वाढवळ भाषेत भुजणे म्हणतात. आणि या भुजण्याला इंग्रजीची (.....ing) जोड देउन जी क्रिया होते ते हे भुजिंग. थोडक्यात मराठीतच सांगायच झाल तर बार्बेक्यु. माझ्या गावा जवळच मुंबई अहमदाबाद महामार्गावर (चारोटी नाक्याच्या थोडस पुढे) आई महालक्ष्मीच मोठ्ठ आणि प्रसिद्ध मंदिर आहे. दर वर्षी हनुमान जयंतीला इथे १५ दिवस आईची यात्रा भरते. लहान असताना नेहमी जाणं व्हायच. तेव्हाच एकदा या यात्रेत पहिल्यांदा हा प्रकार खाल्ला होता. निखार्‍यावर खरपुस भाजलेल कोंबडी वा बोकडाच मांस, धुराचा दर्प आणि वरुन फक्त लिंबु आणि मीठ. बास बाकी दुसर काही नाही. नुसत्या आठवणीनेच तोंडात त्सुनामी उठली आहे.
या भुजलेल्या कोंबडी मटणावर थोडेसे अजुन आगाशीतले संस्कार केले की जे होते ते हे भुजिंग. असो नमनालाच घडाभर तेल घातल्यावर, आता तुमचा अमुल्य वेळ अधिक वाया न घालवता लगेच मुख्य कार्यक्रमाला सुरवात करतो.

साहित्य / कच्चा माल :

१ किलो चिकन.
१ बाउल जाड पोहे.
३-४ मध्यम ते लहान बटाटे.
३ मध्यम कांदे (बारीक चौकोनी कापुन.)
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा हळद.
खडा मसाला किंचितसा कोरडा (तेल न टाकता) भाजुन आणि थंड झाल्यावर वाटुन घ्यावा.
(खडा मसाल्यात १ लहान चमचा जीरं, धणे, काळीमीरी, १/२" दालचीनी, ३-४ लवंगा घ्याव्या.)
१ मोठा चमचा आलं+लसुण+ मिरची पेस्ट.
४-५ पाकळ्या लसुण ठेचलेला.
२-३ हिरव्या मिरच्या भरड ठेचुन. (आपापल्या ऐपती नुसार)
१ वाटी सुकं खोबरं.
३-४ कडिपत्त्याची पानं.
लिंबु.
स्वादानुसार मीठ.
तेल.


कृती:



चिकन स्वच्छ धुवुन मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या. त्याला मीठ, हळद, लाल तिखट, आल+लसुण+मिरचीचं वाटण आणि २ चमचे तेल लावुन १५-२० मिनिटं मुरत ठेवा.



बटटाट्याचे अंदाजे १ सें.मी जाड काप करुन घ्या. किंचीत मीठ भुरभुरा.



लोखंडाची शीग घेउन त्यात चिकन आणी बटाट्याचे काप ओवुन घ्यावे.
शेगडीत कोळसे पेटवुन घ्या. इथे थोडे पेशंस लागतात. कोळसे चांगले असतील तर वेळ लागत नाही. मला ते सुपरमार्केट मध्ये मिळणारे गोल गोल कोळसे मुळीच आवडत नाहीत, धग लागे पर्यंत अर्धा उत्साह मरुन जातो. मागे एकदा केरोसीनची आख्खी बाटली पिउनही हे बेटे काळे कुळकुळीतच राहीले होते. यावेळी आपल्या भारतात मिळतात तसले साधे कोळसे मिळाले. एकदा का थोडीशी धग पकडली की हात पंख्याने / पुठ्ठ्याने वारा घालत रहाव लागतं.






निखारे फुलले की, वर तयार केलेल्या शीगा ठेवुन एका हाताने शेगडीला वारा घालत बसावं. पुरुष मंडळींनी आपापल्या आवडी नुसार दुसर्‍या हातात मद्याचा पेला/ चिल्ड बियरचा कॅन / चैतन्यकांडी घ्यावी. सरळ मार्गी असाल तर बायकोचा/प्रेयसीचा हात घ्या.

१०-१५ मिनिटांनी एकदा शीगा फिरवुन घ्या. (वेळेच प्रमाण निखार्‍यांत किती धग आहे त्यावर अवलंबुन आहे. मटण असल्यास ५-१० मिनिटं जास्त लागतील.)



चिकन शिजलय की नाही म्हणुन बघताना, चाखता चाखता १-२ शीगा अश्याच संपुन जातात. तेव्हा त्या हिशोबानेच चिकनच प्रमाण ठरवा.

चिकन भुजुन झाले की. दुसर्‍या टप्प्यातल्या तयारी कडे वळावे.




मोठ्या कढाईत थोड्या तेलावर कढिपत्त्याची फोडणी करावी.
कढिपत्त्याचा सुगंध सगळ्या घरात दरवळल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकुन तो गुलाबी होईस्तव परतुन घ्यावा.



आवडीनुसार भरड वाटलेल्या मिरच्या, ठेचलेला लसुण, वर वाटलेला गरम मसाला, हळद, लाल तिखट टाकुन परतुन घ्यावं.



सुक खोबरं भुरभुरुन २-४ मिनिटं परतावं.



मग त्यात भुजलेल चिकन आणि बटाटे टाकुन एकत्र कराव. ५ मिनिटं परतत रहावं.




पोहे चाळणीत घेउन त्यावर पाण्याचे ४-५ हबके मारावे. (पुर्ण भिजवुन घेउ नका.) कोरडेच घेतेले तरी चालतील. हे पोहे चिकन मध्ये टाकुन सगळ नीट एकत्र करुन घ्यावं. वरुन लिंबु पीळावं. आणि चांगलं ढवळुन घ्यावं.
गरमागरम भुजिंग वाट पहातय.





कोळश्याची शेगडी नसल्यास ओव्हन मध्ये भाजुन घेतलं तरी चालेल. आणि ओव्हनही नसेल तर फ्राइंगपॅन मध्ये थोड्या तेलावर शिजवुन घ्यावं. पण कोळश्याचा धुरावर आणि निखार्‍यावर भाजलेल्या चिकनची तोड त्याला कधीच येणार नाही. ठाण्या/मुंबईत असाल तर एखाद्या विकांताला संध्याकाळी आगाशीला चक्कर टाका. मस्त अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वाळुत अनवाणी फेरी मारा. जवळच कुठेतरी मस्त भाजलेल्या चिकन्/मटणाचा सुटलेला सुगंध अपोआप तुम्हाला एखाद्या भुजिंग सेंटर जवळ आणुन सोडेल. तिथे आपल्या जीभेचे चोचले पुर्ण करा.

नाही तर असं करा ना सरळ या की माझ्याकडे. घर आपलंच तर आहे.  :)

विसु : माझ्या शाकाहारी स्नेह्यांनो एक डाव माफी द्या. या रेशिपीत चिकन/मटणाला पर्याय नाही. (निदान मी तरी व्हेज व्हर्शन चाखलेलं नाही. कुण्या निधड्या छातीच्या व्यक्तीने हे आव्हान यशस्वी पेललच तर मला जरुर कळवा. :) )

4 comments:

  1. Zakkas! Welcome back, Ganpasheth :)

    ReplyDelete
  2. अगाशीला माझा एक मामा राहतो. त्यांच्याकडे खाल्ले होते हे भुजिंग. खरंच प्रेमात पडलो. पण ज्याने ही डिश वसई परिसरात प्रथम आणली तो आता म्हातारा माणूस आहे आणि ओरिजिनल भुजिंगमध्ये म्हणे एक् सिक्रेट मसाला टाकतात. आणि मी तेच भुजिंग खाल्ले होते. परत ती टेस्ट कधी मिळाली नाही.

    ReplyDelete
  3. व्हेज व्हर्जनमधे मशरूम किंवा पनीर टाकतील बापडे... पण अर्थात चिकन मटणाची चव नाहीच! :)

    alhadmahabal.wordpress.com

    ReplyDelete