जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Thursday 12 April 2012

बाठोणी (सासव)

एप्रिल अर्धा संपत आलाय. काही दिवसातच घरा घरांतुन आंब्यांचा सुगंध दरवळु लागेल. तस बाजारात आंब्यांच्या राजाच आगमन झालेल आहेच. पण सध्या त्यांचे नगा-गणीक भाव पहाता महागाईने आधीच फाटलेल्या खिशाला ठिगळं लावायची पाळी यायची. त्यामुळे तुर्तास अजुन काही दिवस वाट पहाण्या शिवाय गत्यंतर नाही.
माझं घर आणि आजोळ कोकणात (दोन्ही एकाच गावात समोरा समोर) असल्याने 'एप्रिल-मे'मध्ये घरी कधी आंब्यांचा दुष्काळ जाणवला नाही. एप्रिल महिन्याच्या मध्यावर मामा आंब्याची करंडी घेउन मुंबईतल्या घरी हजर असायचाच. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली की मग गावी आंब्यांचा फडशा पाडण्याच्या कामगीरीवर जातीने रुजु व्हायचो. आम्हा भावंडांमध्ये आंबे, ताडगोळे, शहाळी रिचवायच्या शर्यती लागायच्या. एप्रिलमध्ये लोणची, पन्हं, मुरांबे आदींच्या तावडीतुन वाचलेल्या कैर्‍या, आजी- मामाने माळ्यावर पेंड्यांमध्ये पिकायला ठेवलेल्या असायच्या. आम्ही गेलो की त्याचा फन्ना तर उडायचाच पण स्वतःच्या हाताने (दगड मारुन वा बेचकीने) वाडीतल्या झाडांवरचे आंबे पाडुन खाण्यात जी मजा असायची ती वेगळीच. असो तर सांगायचा मुद्दा काय तर बालपणी आम के आम आणि गुठलीयोंके दाम पण नाही.
मे महिन्यात हटकुन घरी होणारा पदार्थ म्हणजे बाठोणी (बाठ्यांच साकव.) इथे आफ्रिकेत तस पाहिल तर बारा महिने झाडांवर कैर्‍या लागलेल्याच असतात, पण आंब्यांचा खरा मौसम हाच, एप्रिल-मे. सध्या बाजारात सर्वत्र रायवळ आंबे दिसु लागलेत. काल आईच्या हातच्या बाठोणीची आठवण झाली. म्हटल मौका हे दस्तुर भी है. होउन जाउदे.
तसा हा पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने काही फार पेश्शल नाही. मुळात रायवळ आंब्यांची आंबट गोड चव आणि त्यात थोडी मॉडिफिकेशन केलं की झालं.Smile

साहित्य :माणशी किमान दोन ते तीन बाठे येतील या हिशोबाने रायवळ (चोखायचे) आंबे घ्यावे. एक कुणाच्या दाढेलाहील लागणार नाही. Wink
मी सहा घेतले.


Smileफोडणीसाठी :
१ मोठा चमचा जीरं.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमिरी पुड (भरड)
मीठ चवी नुसार.
२ मोठे चमचे साजुक तुप.

कृती :आंबे, सालं सुटी होतील इतपत हलक्या हाताने दाबुन घ्यावे.
सालं काढुन बाठे गरा सकट बाजुला काढावे. सालीत उरलेला गर चमच्याने काढुन घ्यावा. वाटल्यास दोन आंब्यांचा पुर्ण रस काढावा.कढईत तुपावर जीर, काळीमिरी, लाल तिखट आणि मीठाची फोडणी करावी.बाठे आणि रस अलगद फोडणीत सोडावे. चमच्याने हलकेच एकत्र करावे.
लहान आचेवर ५ मिनिटं शिजवावे.शक्यतो गरमा-गरमच वाढावे. (वाटल्यास सोबतीला चपाती-पुरी-भाकरी. नाहीतर नुसतेच.)
आंब्याच्या आंबट गोड चवीला किंचित तिखट आणि मीठाची अफलातुन जोड.
बघता काय सामिल व्हा.

Smile