जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.
Showing posts with label गोड-धोड. Show all posts
Showing posts with label गोड-धोड. Show all posts

Tuesday, 4 October 2016

चॉकलेट मूस.






    चॉकलेट मूस हा पदार्थ जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता तेव्ह तो दिसायला केकसारखा वाटला होता. गोडाचा फारसा चाहता नसल्याने खावं की न खावं या विचारात होतो. मनाचा हिय्या करुन एकदाचा चमचा उपसला आणि त्या पदार्थावर ठेवला तर एकदम लोण्याच्या गोळ्यावरुन वर तापलेली सुरी फिरवावी तद्वत तो आत शिरला. इतकं सॉफ्ट... क्षणभर वाटलं अरे हे आईस्क्रिम तर नाही ना?
    पहिला चमचा तोंडात गेला तो एकदम लख्ख स्वच्छ होऊनच बाहेर आला. त्या क्षणापासुन आस्मदिक या डेझर्ट्चे दिवाने झालो. पदार्थ चवीला येवढा भारी म्हणजे त्याची बनवण्याची कृती तेवढीच क्लिष्ट असणार असं समजून आजवर याच्या वाटे गेलो नव्हतो. परवा सहज म्हटलं पाहू तरी काय कौशल्य पणाला लावावं लागतं या आवडत्य पदर्थासाठी आणि म्हणून रेसीपी शोढून काढली. मग मनात विचार आला अरेच्चा इतका सोप्पा पदार्थ आपण या पुर्वी का बरं नाही ट्राय केला? खोटं वाटतय ना? चला तर मग दाखवतोच तुम्हाला किती सोप्पा आहे हा पदर्थ.

साहित्यः


३०० ग्रॅम चॉकलेट
२०० ग्रॅम क्रिम
२ अंड्यांचा पांढरा भाग
डार्क चॉकलेट (मर्जीनुसार आवडत असल्यास - सजावटीसाठी)
१५-२० चॉकलेट बिस्कीट
थोडी पीठी साखर
(जिलेटीन वापरल्यास मुस केक सारखा उभा राहू शकतो, कप मधेच सर्व्ह करणार असाल तर हा पदार्थ वगळला तरी चालेल)

कृती :



बिस्कीटं मिक्सरमध्ये फिरवून त्याचा चुरा करुन घ्यावा.



हा बिस्किटांचा चुरा ज्यात मूस सर्व्ह करायचय त्यात भांड्यात खाली दाबून भारावा. फार जाड थर नको १/२ सेंटीमिटर पुरे.



चॉकलेट ओव्हनमधे दिड ते दोन मिनीटं गरम करुन घ्यावं. (प्रत्येक ओव्हनचं हिटींग वेग वेगळ असल्याने एखाद मिनीटानंतर उघडून बघावं.) जर ओव्हन नसेल तर सरळ एका खोलगट भांड्यात पाणी उकळवावे त्यावर दुसरं भांडं ठेऊन त्यात चॉकलेट वितळवून घावं. चॉकलेटच्या भांड्याच स्पर्श खालच्या भांड्यातल्या उकळत्या पाण्याला होणार नाही याची दक्षता घ्या.


क्रिम फेटून घ्यावं. त्यात चवीनुसार थोडी पीठी साखर टाकावी.
फेटलेलं क्रिम वितळलेल्या चॉकलेटमधे टाकून ते ही फेटून घावं. गुठळ्या रहाणार नाही याची काळजी घ्या.
(जिलेटीन वापरायचं झाल्यास चमचा भर जिलेटीन २-३ चमचे पाण्यात विरघळवून ते क्रिमसोबत चॉकलेट्मध्ये फेटुन घ्यावं.)


अंड्यांतला बलक वेगळा काढुन उरलेला भाग तो आगदी हलका होईस्त्व फेटून घ्यावा.



फेटलेलं अंड अलगदपणे चॉकलेटमधे चमच्याने एकजीव करुन घ्यावं. शक्यतो हातानेच करावं. बीटर/ब्लेंडर वापरु नये.



तयार झालेलं मिश्रण डावाने/चमच्याने सर्व्हिंग भांड्यात सोडावं.



आवडत असल्यास डार्क चॉकलेट वितळवून वरून त्याचा पातळसा थर द्यावा.
त्यार सर्व्हिंग्स फ्रिजमध्ये २-४ तास सेट करायला ठेवावं.

Tuesday, 1 January 2013

पेठा

समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवंवर्षाच्या शुभेच्छा !!!


साहित्य :


  
१/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड)
१/२ किलो साखर.
१-२ चमचे खायचा चुना.
तुरटी.
गुलाब/केवडा वॉटर. 

कृती :


 

कोहळं सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे.
या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे.



चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे. 
कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी.

दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे.


  

एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे.     
कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे.




एका भांड्यात मंद आचेवर साखर भीजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.




मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. 
आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं.
 एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे.  
(झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. :) ) 
पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे. 

दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तायार असेल........
हे असं.


 

 

Thursday, 12 April 2012

बाठोणी (सासव)

एप्रिल अर्धा संपत आलाय. काही दिवसातच घरा घरांतुन आंब्यांचा सुगंध दरवळु लागेल. तस बाजारात आंब्यांच्या राजाच आगमन झालेल आहेच. पण सध्या त्यांचे नगा-गणीक भाव पहाता महागाईने आधीच फाटलेल्या खिशाला ठिगळं लावायची पाळी यायची. त्यामुळे तुर्तास अजुन काही दिवस वाट पहाण्या शिवाय गत्यंतर नाही.
माझं घर आणि आजोळ कोकणात (दोन्ही एकाच गावात समोरा समोर) असल्याने 'एप्रिल-मे'मध्ये घरी कधी आंब्यांचा दुष्काळ जाणवला नाही. एप्रिल महिन्याच्या मध्यावर मामा आंब्याची करंडी घेउन मुंबईतल्या घरी हजर असायचाच. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली की मग गावी आंब्यांचा फडशा पाडण्याच्या कामगीरीवर जातीने रुजु व्हायचो. आम्हा भावंडांमध्ये आंबे, ताडगोळे, शहाळी रिचवायच्या शर्यती लागायच्या. एप्रिलमध्ये लोणची, पन्हं, मुरांबे आदींच्या तावडीतुन वाचलेल्या कैर्‍या, आजी- मामाने माळ्यावर पेंड्यांमध्ये पिकायला ठेवलेल्या असायच्या. आम्ही गेलो की त्याचा फन्ना तर उडायचाच पण स्वतःच्या हाताने (दगड मारुन वा बेचकीने) वाडीतल्या झाडांवरचे आंबे पाडुन खाण्यात जी मजा असायची ती वेगळीच. असो तर सांगायचा मुद्दा काय तर बालपणी आम के आम आणि गुठलीयोंके दाम पण नाही.
मे महिन्यात हटकुन घरी होणारा पदार्थ म्हणजे बाठोणी (बाठ्यांच साकव.) इथे आफ्रिकेत तस पाहिल तर बारा महिने झाडांवर कैर्‍या लागलेल्याच असतात, पण आंब्यांचा खरा मौसम हाच, एप्रिल-मे. सध्या बाजारात सर्वत्र रायवळ आंबे दिसु लागलेत. काल आईच्या हातच्या बाठोणीची आठवण झाली. म्हटल मौका हे दस्तुर भी है. होउन जाउदे.
तसा हा पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने काही फार पेश्शल नाही. मुळात रायवळ आंब्यांची आंबट गोड चव आणि त्यात थोडी मॉडिफिकेशन केलं की झालं.Smile

साहित्य :



माणशी किमान दोन ते तीन बाठे येतील या हिशोबाने रायवळ (चोखायचे) आंबे घ्यावे. एक कुणाच्या दाढेलाहील लागणार नाही. Wink
मी सहा घेतले.


Smile



फोडणीसाठी :
१ मोठा चमचा जीरं.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमिरी पुड (भरड)
मीठ चवी नुसार.
२ मोठे चमचे साजुक तुप.

कृती :



आंबे, सालं सुटी होतील इतपत हलक्या हाताने दाबुन घ्यावे.
सालं काढुन बाठे गरा सकट बाजुला काढावे. सालीत उरलेला गर चमच्याने काढुन घ्यावा. वाटल्यास दोन आंब्यांचा पुर्ण रस काढावा.



कढईत तुपावर जीर, काळीमिरी, लाल तिखट आणि मीठाची फोडणी करावी.



बाठे आणि रस अलगद फोडणीत सोडावे. चमच्याने हलकेच एकत्र करावे.
लहान आचेवर ५ मिनिटं शिजवावे.



शक्यतो गरमा-गरमच वाढावे. (वाटल्यास सोबतीला चपाती-पुरी-भाकरी. नाहीतर नुसतेच.)
आंब्याच्या आंबट गोड चवीला किंचित तिखट आणि मीठाची अफलातुन जोड.
बघता काय सामिल व्हा.

Smile

Monday, 26 December 2011

तिरामिसु

आज खा रे खा चा पहिला वाढदिवस. त्या निमित्ते आज काही गोड धोड करावं असा विचार केला. आजवर तुम्ही सर्वांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलतं, हा लोभ असाच रहावा हीच मनोकामना.

साहित्यः





२५० ग्रॅम मस्कार्पोन चीज.
लेडी फिंगर्स बिस्किटे. (न मिळाल्यास 'मारी'ची)
साखर ३ मोठे चमचे. (अंदाजे ५० ग्रॅम)
२ अंडी.
कॉफी.
२ ते ३ मोठे चमचे कोको पावडर.
२ चमचे रम (ऑप्शनल).


कृती :


अंडी फोडुन त्यातील बलक आणि पांढरा भाग वेगवेगळे करावे.



बलकात साखर टा़उन फेटुन घ्यावे. इतके फेटावे की त्याचा पिवळा धम्मक रंग ऑफ व्हाईट झाला पाहिजे.



चमचा चमचा मस्कार्पोन चीज टाकत सगळ चीज संपे पर्यं फेटत रहावं. शेवटी आंड्यातला पांढरा भाग (तोही फेटुन घ्यावा) टाकून फेटुन घ्यावं, साधारण केकच्या मिश्रणाची घनता आली पाहिजे.
आवडी नुसार दुध किंवा रम टाकुन कॉफी पाण्यात विरघळून घ्यावी.



लेडी फिंगर्स बिस्कीटांचा एक थर भांड्याच्या बुडाशी लावावा.



बिस्कीटांवर चमच्या- चमच्याने कॉफी ओतावी.



कॉफीत भिजलेल्या बिस्किटांवर चीज अंड्याचं मिश्रणाचा थर द्यावा.



पुन्हा एकदा बिस्किटांचा थर लावून आणि कॉफी ओतुन चीज अंड्याचं मिश्रणाचा थर द्यावा.
अ‍ॅल्युमिनीयन फॉईल लावून भांडेफ्रिजमध्ये कमीत कमी ६-७ तास थंड करत ठेवावं.












हॅप्पी बर्थडे खा रे खा :)

Thursday, 27 October 2011

दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू

नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!!
दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू.
तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.

साहित्य :



२ वाट्या बेसन.
३/४ वाटी वितळलेल तुप.
१/४ वाटी चण्याची डाळ.
३/४ वाटी बारीक साखर / पिठी साखर
२-४ चमचे दुध.



१ लहान चमचा वेलची पुड
आणि आवडी नुसार काजु तुकडा , बेदाणे, चारोळ्या आदी सुका मेवा.

कृती :

बेसनाचे लाडु खाताना बरेच वेळा टाळ्याला चिटकुन बसतात आणि माझा विचका करतात. त्यामुळे माझी आई निव्वळ बेसन वापरण्या पेक्षा चण्याची डाळच भाजुन ती गीरणीवाल्या कडुन थोडी भरड वाटुन आणत असे. भारतात असेल तर ठिक आहे पण परदेशात असण्यार्‍यांनी आता पीठाची गिरणी कुठे शोधायची. त्यावर तोडगा म्हणुन मग मी थोडी चण्याची डाळ वापरतो.



चण्याची डाळ कोरडी भाजुन घ्यावी. थोडीशी डागाळायला लागली बाजुला काढुन ठेवावी.
गार झाल्यावर मिक्सर मध्ये थोडी भरड(रवाळ) वाटुन घ्यावी.



नॉनस्टीकच्या कढईत वितळवलेले तुप घेउन त्यात बेसन आणि डाळीच रवाळ पीठ टाकुन मध्यम आचेवर किमान २५-३० मिनिटं चांगल खरपुस भाजाव. सुरवातीला घट्ट दिसणार मिश्रण नंतर तुप सोडु लागल की थुलथुलीत दिसायला लागेल.



कढई गॅसवरुन उतरवुन मग त्या मिश्रणावर दुधाचा हबकारा मारावा. दुधामुळे मिश्रण लगेच फसफसुन येईल. ते चांगल ढवळुन घ्याव. आणि लागलीच एका वेगळ्या भांड्यात काढुन घ्याव.



साधारण १५-२० मिनिटां नंतर जेव्हा मिश्रण थोड गार होईल तेव्हा त्यात वेलची पुड आणि सुकामेवा टाकावा.
बरेच वेळा लाडू वाळुन झाले की मग वरुन एखादा बेदाणा, काजु लावुन तो सजवतात मला तो प्रकार आवडत नाही. हे म्हणजे काय की आमच्या लाडुत सुकामेवा आहे बरका अशी जाहिरात केल्या सारख झाल. Wink
सुकामेवा कसा लाडूखाताना मध्येच दाता खाली येउन सरप्राईज मिळायला हवं. जर एखादा जास्त पुण्यवान असेल त्याला मिळतील २-३ सुक्यामेव्याचे तुकडे. Wink असो हे झाल माझं मत.
तर सुकामेवा टाकुन झाल्यावर त्यात बारीक साखर नाहीतर सरळ पिठीसाखर टाकावी आणि मिश्रण एकत्र करावे. साखरेचे कण जेव्हा दाताखाली येतात तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा रवाळपणा लाडुत येतो जो मला खुप आवडतो.

नंतर लगेच आवडत्या आकारात लाडू वाळुन घ्यावे.



ही आमची वाढीव स्टेप.
चित्र फितीत दाखवल्या प्रमाणे एका बाऊल मध्ये दिड चमचा बारीक साखर घ्यावी. त्यात एका वेळी एक करत लाडू घोळवून घ्यावा. थोडासा हातात फिरवुन जास्तीची लागलेली साखर काढुन टाकावी.
आणि हे आहेत तयार बेसनचे लाडू.



Smile


~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

दुसरे जे लाडू करणार आहोत ते फारच सोप्पे आणि अगदी १५-२० मिनिटात होण्यासारखे आहेत.
मुख्य म्हणजे जेवढे करायला सोप्पे तेवढे चवीत अफलातुन Smile
चला तर सामान गोळा करु या.
खोबर्‍याचे लाडू.

साहित्य :



२ वाट्या डेसिकेटेट नारळ.+ १/४ वाटी बाजुला काढुन ठेवावा
१/२ वाटी पेक्षा थोड कमी क्रिम.
१/२ वाटी कंडेन्स्ड दुध.
१ चमचा वेलची पुड.
चीमुट्भर मीठ (ऑप्श्नल.)
बेदाणे

कृती :



नॉनस्टीक कढईत खोबर मध्यम आचेवर गुलाबी-सोनेरी रंगावर भाजुन घ्याव.



आच मंद करुन खोबर्‍यात क्रिम आणि कंडेंन्स्ड दुध टाकुन मिश्रण चांगले एकत्र करुन घ्याव.



५-१० मिनिटांनी आच बंद करुन वरुन वेलची पुड आणि बेदाणे मिश्रणात टाकावे.



मिश्रण गरम असतानाच पटापट लाडू वाळुन घावे आणि खोबर्‍याच्या चुर्‍यात घोळवुन घ्यावे.
हे आहेत तयार खोबर्‍याचे लाडू.



Smile







शुभ दिपावली.