जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.
Showing posts with label चिकन. Show all posts
Showing posts with label चिकन. Show all posts

Thursday, 23 January 2014

कुंग पाऊ चिकन





सध्या मिपाचे धुरंधर बल्लव आणि अन्नपुर्णा एकदम फुल्टू जोमात आले आहेत. त्यांचा दांडगा उत्साह पाहुन मृतवत असलेल्या आमच्या उत्साहाला पालवी न फुटती तर नवलंच.
त्यामुळे तो उत्साह मावळायच्या आत, घरात जे काही पदार्थ सापडले त्यांचा उपयोग करुन हे कडबोळं केलेलं आहे. वर पाककृतीचं नाव 'कुंग पाऊ चिकन' असलं तरी मुळ पाककृती अगदी १००% अश्शीच असते असा माझा बिल्कुल दावा नाही. काही पदार्थ कमी जास्त झाले असतील तर तो अपराध उदार मनानं पोटात घ्याल अशी खात्री आहे.
चला तर घरात काय काय कच्चा माल सापडला ते पाहू....




श्वेत वारुणी (व्हाईट वाईन), तिळाचं तेल, सोया सॉस, व्हिनेगर, (प्रत्येकी २-३ मोठे चमचे)
प्रत्येकी एक कांदा, भोपळी मिरची मोठे कापलेले.
पातीचा कांदा, लसुण, आलं, भाजलेले शेंगदाणे (मुठभर)
२ लाल सुक्या मिरच्या. तीळ, साखर, कॉर्न स्टार्च.
चवी नुसार मीठ.
हो आणि मुख्य म्हणजे (बोनलेस) चिकन साधारण १/२ किलो.
(एकवेळ एखाद्या इमामाच्या घरात कुराणाची प्रत नाही सापडायची पण या गणाच्या घरात चिकन सापडणार नाही, ये कदापी हो नही सकता.
-इति. आमचे मित्रगण.)
असो.



सगळ्यात आधी चिकनचे मध्यम आकारेच तुकडे करुन ते स्वच्छा धुवून, निथळवून घेतले. त्यात प्रत्येकी १ मोठा चमचा तिळाचं तेल, सोयासॉस, व्हिनेगर, वाईन, कॉर्न स्टार्च, किंचीत मीठ हे सगळे जिन्नस मिसळुन, चिकन झाकून फ्रीजमध्ये २०-३० मिनीटं मुरत ठेवलं.



दुसर्‍या एका बाऊलमध्ये उरलेलं तिळाचं तेल, सोयासॉस, व्हिनेगर, वाईन, कॉर्न स्टार्च, कोल्हापुरी ठेचा (हा आयत्यावेळी घातला) हे सगळं एकत्र करुन घेतलं.



एका नॉन्स्टीकच्या भांड्यात चमचा भर तेलात थोडं आलं-लसुण परतुन, मुरवलेलं चिकन मध्यम आचेवर शीजवून घेतलं.




चिकन शिजल्यावर ते एका दुसर्‍या भांड्यात काढुन त्याच कढईत, बारीक चिरलेलं आलं लसुण, लाल मिरची परतुन घेतली.
आलं लसणाचा खमंग वास आल्यावर मग त्यात कांदा आणि भोपळी मिरची टाकुन परतुन घेतलं. कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात वर तयार केलेलं मिश्रण टाकून आच मंद करुन परतलं. अगदीच सुकं सुकं झाल्याने खाली लागेल की काय या भितीनं किंचीत पाणी घातलं.



साधारण एक हलकीशी उकळी आल्यावर मग त्यात चिकन आणि कांद्याचीं पातं घातली. हलक्या हाताने सगळं एकत्र केलं.
वरुन भाजलेले शेंगदाणे, तिळ टाकाले.

 .




गरमागरम न्युड्लस सोबत ओरपायला घेतलं.
वाटल्यास फ्राईड राईस सोबतही वाढता येईल.

Saturday, 13 July 2013

पेरी-पेरी (बटरफ्लाय) चिकन


ईथे बाहेर मस्त धो धो पाऊस कोसळतोय. काही तरी झणझणीत चापायची इच्छा होतेय.
आज फार दिवसांनी मुड ही लागलाय. (त्यात आम्ही वार पाळत नसल्याने आम्हाला एक संकष्टी सोडली तर सगळे दिवस सारखेच.) त्यामुळे आमचा शनीवार वैगरे काही नाही.

काय मग करायची का सुरवात?

पेरी पेरी सॉस
साहित्यः



लाल मिरच्या (मिरच्यांची संख्या त्यांच्या तिखटपणाच्या तीव्रतेवर अवलंबून.)
मी habanero peppers वापरल्यात.
एक लहान कांदा.
एक गड्डा लसुण.
एका लिंबाचा रस.
२ लहान चमचे काळीमीरी पुड
३ मोठे चमचे पेपरीका (नसल्यास काश्मीरी लालतिखट) याने रंग चांगला येतो.
१/२ कप व्हिनेगर.
१/२ लहान चमचा साखर (ऑप्शनल. व्हिनेगरचा उग्रपणा कमी करण्यासाठी.)
१/२ कप तेल. (ऑलिव्हच असल्यास उत्तम)
चवी नुसार मीठ.

कृती :



मी वापरलेल्या मिरच्या अतीजहाल असल्यामुळे त्यांचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी व एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी या मिरच्या शेगडीवर भाजुन आणि नंतर सोलून घेतल्या.

..

(कांद्याचा कच्चटपणा घालण्यासाठी कांदा थोडा परतुन घेतला होता.)
सॉससाठी म्हणुन लागणारे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये वाटुन घेतले.

.

तयार सॉस बाटलीत बंद करुन फ्रीजमध्ये ठेवल्यास ४-५ आठवडे सहज टिकतो.
शक्य असल्यास हा सॉस आदल्या दिवशी करुन ठेवावा. मुरल्यावर याची चव अधीक खुलते.
कोंबडी स्वच्छ धुवून घेतली. तिच्या पाठीच्या कण्याकडचा भाग खालील चित्रफितीमध्ये दाखवल्या प्रमाणे कापून टाकला. (सुपसाठी स्टॉक बनवायचा असल्यास याचा काढुन टाकलेल्या भागाचा वापर करता येईल.)


चिकन ब्रेस्टमध्ये असणारं हाड/कुर्चा काढुन टाकल्यास चिकन एकदम फ्लॅट होतं.


..



कोंबडीला चरे देऊन चवी नुसार मीठ भुरभुरलं. तयार असलेला पेरी-पेरी सॉस लावून किमान ३-४ तास मुरत ठेवलं.

..

ओव्हन १० मिनिटं २००°C वर प्रीहिट करुन घेतला. आणि नंतर मुरवलेली कोंबडी आत अंदाजे ६०-८० मिनीटं शिजत ठेवली. (कोंबडीच्या आकारावर शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त करावा.)

.

चियर्स.

Wednesday, 7 November 2012

चिकन शवर्मा


गेल्या आठवड्यात व्हेजींसाठी फलाफील आणि व्हेज-शवर्मा झाला. एक आठवडा कोंबडीलाही विश्रांती मिळाली असेल. म्हणुन पुन्हा सामिश प्रेमींसाठी चिकनकृती. हास्य

साहित्य :

.

चिकन थाईज. (हाडं काढुन टाकलेली.)
२ चमचे तंदुर मसाला.
२ चमचे आलं वाटण.
१ चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा काळीमिरी पुड.
१ चमचा लसुण पुड. / वाटण.
एका लिंबाचा रस.
चवीनुसार मीठ.

कृती :

.

शक्यतो हाडं काढुन चिकनच्या मांड्यांकडचा भाग घ्यावा. कट कट कमी करायची असल्यास सरळ चिकन ब्रेस्ट वापरावे.
चिकनचे दोन भाग करुन घ्यावे. (एक मसालेदार तर एक कमी तिखट बनवण्यासाठी.)
एका भागात तंदुर मसाला, आलं वाटण, लाल तिखट, लसुण पुड, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करावं.
तर दुसर्‍या भागात मीठ, काळिमिरी पुड, आल वाटण, लसुण पुड आणि लिंबाचा रस टाकुन एकत्र करावं.
चिकनला चरबी नसेल तर १-२ चमचे तेल टाकावं.
दोन्ही चिकन फ्रीजमध्ये किमान २ तास तरी मुरत ठेवावं.

.

चिकन मी ओव्हनमध्ये भाजायचं ठरवलं होतं. काही ओव्हन मध्ये ग्रिल करण्यासाठी गोल फिरणारी खास सोय असते जी माझ्या ओव्ह्नमध्ये नाही. म्हणुन घरच्या घरीच तारेचे २ स्टँड बनवले. जे फिरते नव्हते पण बराचसा तसाच इफेक्ट मिळाला जसा मला हवा होता.
त्या स्टँडमध्ये चिकनचे तुकडे ओवून घेतले. वरून एक लिंबाची फोड ठेवली.

.

ओव्हन २००°C वर १० मिनिटं तापवुन घेतल्या नंतर हे दोन्ही स्टँड आत ठेऊन ३० मिनिटं भाजुन घेतलं.

.

चिकन तयार झाल्यावर त्याचे लहान तुकडे करून घ्यावे. सोबत लेट्युस, टॉमेटो, ताहिनी सॉस, फ्रेंच फाईज यांची ही जुळवा जुळव करुन ठेवावी.

.

पिटा ब्रेड/ खुबुस अर्धा उघडुन त्यात वरील मिश्रण भरुन घ्यावं.
रोल करुन गरम-गरमच सर्व्ह करावं.

.

Sunday, 28 October 2012

मुर्ग माखनी (बटर चिकन)

.

साहित्य :
मॅरिनेशन :

.

२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
२ चमचे आलं लसुण वाटण.
१ चमचा टॉमेटो पेस्ट.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ लहान चमचा लाल काश्मिरी तिखट.
एका लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.

.

१/२ ते ३/४ किलो चिकन.

ग्रेव्हीसाठी :

.

दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले.
१०-१२ काजू आणि बदाम भिजवून सोललेले.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा आलं-लसुण वाटण.
बटर / लोणी.
क्रिम.

कृती :



. .



चिकनचे एक-दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे. स्वच्छ धुऊन मग त्यात मॅरिनेशनचे पदार्थ टाकुन किमान २ तास फ्रीज मध्ये मुरत ठेवावं.


. .

एका कढईत थोड्या बटर वर कांदा आलं लसुण परतुन घ्यावं. कांदा परतल्यावर त्यात गरम मसाला लाल तिखट आणि चवी नुसार मीठ घालुन बाजुने तेल सुटे पर्यंत लहान आचेवर परतुन घ्यावं.

.

मसाला गार झाल्यावर तो बदाम आणि काजू सोबत मिक्सरमध्ये वाटुन घ्यावा.


. .

चिकनचे काही तुकडे स्क्युअरमध्ये ओवून तव्यावर/ग्रीलवर वा ओव्हनमध्ये शि़जवून घ्यावे.

.

उरलेले चिकनचे तुकडे कढईत थोड्या बटरवर (मध्यम आचेवर) शिजवून घ्यावे.

. .


अंदाजे १०-१५ मिनीटांनी चिकन शिजले की त्यात वर वाटलेला मसाला टाकुन गरज लागल्यास थोडं पाणी टाकावं. झाकण ठेऊन मध्यम आचेवर एक वाफ काढावी.


.

गरमा-गरम नान / रोटी / पराठ्यासोबत वाढताना वरून थोडं क्रिम टाकुन बटरचा छोटा गोळा सोडावा.
आणि हा तोंडी लावायला चि़कन टीक्का. हास्य (3D फोटुचा उलुसा प्रयत्न.)


.