जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 27 December 2010

बाप्पा आणि मुटके

प्रत्येक सणाच अस एक वैशिष्ठ्य असत. आणि सण म्हटला की तो साजरा करताना विविध पक्वांन्न नसतील तर त्या सणांची मजा ती काय!!!!!
उदाहरण द्यायचच झाल तर नारळी पौर्णिमा आली की नारळाच्या वड्या, नारळी भात हे ठरलेल. गणपतीला उकडीचे मोदक. होळीला पुरणाची पोळी. गुढी पाडवा म्हटल की जिलेबी, श्रिखंड पुरी आठवते तर कोजागीरीला मसाला दुध...आणि सणांची राणी दिवाळी. तिची तर तर्‍हाच न्यारी. लाडु, करंज्या, चकल्या, कडबोळी, शंकरपाळे, चिवडा एक ना दोन..

आमच्या गावी गणपतीला खुप धमाल असते. त्यात बाप्पा म्हणजे सगळ्या देवात लाडका. दिवाळी पेक्षा गावी गणपती उत्सव दणक्यात असतो. पुर्वी गावच्या शाळेत आणि मारुतीच्या देवळात सार्वजनीक गणपती बसायचा. हा सार्वजनीक गणपती पण नवसाचा असतो. जे कोणी नवस बोललेले असतात त्यांनी त्या वर्षीचा गणपती बसवायचा अशी प्रथा. यामुळे सगळ्यांनाच गणपती बसवायचा मान मिळायचा. मग आदल्या दिवशी ढोल ताश्याच्या गजरात बाप्पाच आगमन व्हायच घरी. तोवर गावातली तरुण-लहान मंडळी मखर आणि सजावटीच्या कामात गुंतलेली असायची. रात्रभर जागुन मस्त देखावे बनवले जायचे. प्रत्येकाला वाटायची की आपला पण हातभार लागावा बाप्पाच्या कार्यात.

सकाळी सकाळी उठुन कामाची लगबग सुर व्हायची. स्वारी शाळेच्या / देवळाच्या मंडपात यायची. तिथे विधिवत पुजा होउन गणपती 'बसायचे'. तोवर घरच्या बायकांची नैवेद्याच ताट तयार कराताना बरीच धांदल चालु आसायची. इकडे मंडपात वडिलधारी मंडळी जमलेली आसायची. आरतीची तयारी चालु आसायची, कुणी ढोलकीचा ताबा घ्यायच, काहीजण टाळ घ्यायचे. ज्यांच्या हाती काही लागायच नाही ते नुसतेच टाळ्या वाजवुन साथ द्यायचे. ढोलकीच्या, टाळांच्या नी टाळ्यांच्या गजरात आरती चालु व्हायची. गणपती बसल्या नंतरची पहिली आरती अर्धा पाउण तास तरी चालायची. पण एक वेगळाच जोष असायचा. घालीन लोटांगण चालु झाल की समजायच आता आरती संपत आली. एकदम टाळ ढोलकीचा आवाज बंद व्हायचा आणि धीर गंभीर आवाजात मंत्र पुष्पांजली चालु व्हायची. खुप प्रसन्न वाटायच.......आरती संपता संपता घरुन नैवद्याच ताट आलेल असायचं. बाप्पाला नैवेद्य दाखवुन झाला की बाल गोपाल मंडळी त्यावर तुटुन पडत.Smile


संध्याकाळी परत आरती, नैवेद्य असायचा. बाप्पाला फक्त नावाला नैवेद्य, खरा तो आमच्याच पोटात जायचा. रात्री जागरण आसायच. पुर्वी बाप्पा फक्त दिड दिवसच असायचा. (हल्ली पाच आणि सात दिवसांनी गौरीबरोबर जाणारे पण असतात.) गावातली बाप्ये मंडळी देवळात जमा व्हायची , गावच महिला मंडळ यायच आणि मग टाळ मृदंगाच्य साथीन भजनांचा सुरेख कार्यक्रम व्हायचा. या भजनी मंडळाला ज्यांच्या घरी बाप्पा असायचे त्यांच्या कडुन मानाच आमंत्रण असायच. जागरण करताना मग रात्रभर शाळेच्या हॉल मध्ये आणि देवळात बुद्धी बळाचे पट मांडले जायचे. कॅरमचे पत्त्यांचे (तिन पत्ती ) डाव रंगायचे. सकाळी सूर्यनारायण उगवायच्या आत मग दुसरी फळी (रात्री आराम करुन आलेली) हजर व्हायची आणि जागरण घडलेली मंडळी घरी जाउन ताजी तवानी होउन यायची.

दुपार पासुन मग बाप्पाच्या निघण्याची तयारी चालु व्हायची. आख्खा गाव मिरवणुकीत सामील व्हायचा. जे म्हातारे-कोतारे असायचे आणि ज्यांना चालता येत नसेल त्यांच्या भेटीसाठी बाप्पा स्वतः मिरवत मिरवत संपुर्ण गावातुन फेरी मारायचे. सुरवात एका गणपतीच्या मिरवणुकीने व्हायची पण रस्त्याने जाता जाता त्या त्या घरालले गणपती सामील व्हायचे. तास दोन तास मिरवत शेवटी मिरवणुक समुद्रापाशी यायची. त्या सिंधु-सागराच्या लाटांनाही लाजवेल आसा उत्साह लोकांत सळसळत आसायचा. माझ्या जिवात मात्र कालवा कालव सुरु व्हायची. वाटायच इथुन पुढे सोडुच नये बाप्पाला.

सगळे बाप्पा एका रांगेत बसवले जायचे आणि मग शेवटची आरती चालु व्हायची.

पहिल्या आरतीला टिपेत लागणारा माझा आवाज आता मात्र घोगरा व्हायचा. आरती संपली की बाप्पाच्या नावाचा गजर व्हायचा. पुढच्या वर्षी लवकर येण्याच आमंत्रण दिल जायच. मग एक एक जण बाप्पाला डोक्यावर घेउन लाटांच्या दिशेने निघायचे. हळु हळु पुढे जाणारा पाठमोरा बाप्पा दिसायचा. मनात काहुर माजलेल असायच. गळ्या इतक्या पाण्यात गेल्यावर परत बाप्पा आमच्या दिशेने तोंड करायचा.

एक... दोन....तीन......................

जड पावलाने घरी वळायचो.


गणपतीच्या दिवसांत बाप्पांसाठी जस मोदकाच ताट आसायच ना तस त्याच्या भक्तांसाठी मुटक्यांच ताट हे ठरलेल असायच.
मग हे मुटके सकाळी न्याहारीला ताज्या कैरीच्या आंबट लोणच्या सोबत येवोत, दुपारच्या जेवणात इतर पक्वांन्नांसोबत येवोत किंवा मग संध्याकाळी गवतीचहा आणि आल टाकुन केलेल्या वाफाळत्या चहा सोबत येवोत.... दर वेळची त्यांची लज्जत न्यारीच.

साहित्यः
२ मध्यम कांदे (उभा-आडवा चिरुन)
१ चमचा जीर.
१-१/२ चमचा धणे पुड.
१-१/२ चमचा लाल तिखट.
१-१/२ चमचा जीरे पुड.
१ चमचा हळद.
१-१/२ चमचा आल लसुण पेस्ट (जरा भरड).
२ हिरव्या मिरच्या.
मीठ चवी नुसार.
फोडणी साठी २ चमचे तेलं.

१ बाऊल तांदळाच जाड पीठ. (यात १४-१५ मुटके सहज होतात. अर्थात हाताच्या आकारावर पण अवलंबुन आहे ते.)
(मोदकाची पीठी ते इडलीचा रवा याच्या मधल. रेडिमेड नाही मिळाल तर तांदुळ पटकन मिक्सर मध्ये वाटुन घेतले तरी चालतील.)
१ वाटी खवलेला नारळ.
१ वाटी बिरडं.

कृती

एका जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवुन त्यात जीर्‍याची फोडणी करुन, मिरच्या परतुन घ्याव्या.

कांदा टाकुन आल लसणाची पेस्ट टाकावी. मग मीठ, लाल तिखट, हळद, धेणे-जिरे पुड टाकुन १ मिनीटं परतुन घ्याव.

लगेच बिरडं, आणि नारळ टाकुन १-२ मिनीटं परताव.

१ ते १-१/४ बाउल पाणी टाकुन चांगली ऊकळी आणावी.

गॅस बंद करुन. तांदळाच पीठ टाकुन उकड करावी. उकड एका थाळीत काढुन घ्यावी.

एक पीठाचा एक गोळा घेउन लंबाकृती आकार द्यावा. आणि मग हलकेच मुठ वळवुन आकार द्यावा. साधारण शंखाचा आकार येतो.

एका कुकर मध्ये डबा ठेवुन त्यावर चाळणी ठेवावी आणि त्यात हे मुटके रचावे.
शक्यतो एकावर एक ठेवु नये. कुकर मधल्या पाण्याचा स्पर्ष चाळणीला होणार नाही याची काळजी घ्या.
(माझ्या कडे चाळणीला स्टँड होत त्यामुळे डबा ठेवायची गरज भासली नाही. अशी चाळणी मिळाली तर उत्तमच.)

कुकरची शिट्टी काढुन हे मुटके मोदक/इडली सारखे वाफवुन घ्यावे.

वाढताना वरुन राईची फोडणी दिली तरी चालेल. नारळ आणि कोथिंबीर वरुन भुरभुरावी. चहा लोणच वा पानात कसही केव्हाही मनसोक्त खाव.


3 comments:

  1. किती सुरेख लिहिलय रे.. डोळ्यात पाणी आल.. आजीचे मुटके आठवले.. आता गावी गेले की आईला सांगते करायला..

    ReplyDelete
  2. Aaj parat vachali pa. kru. A p r a t i m! Ganapati utsavachya aaThavaNee parat jagya zalya sagaLya.

    ReplyDelete
  3. चेपुवर गावचा एक ग्रुप तयार झालाय.. त्यातल्या बर्‍याच जणांनी हे वाचल नसेल म्हणुन म्हणुन आज येणार्‍या गणेशोत्सवाच औचित्य साधुन चेपुवर पुनःप्रकाशित केली होती ही लिंक. :)

    ReplyDelete