जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Saturday, 7 January 2012

नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन

आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच.
या भाताच्या जोडीला येते ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी).

थोडक्यात सांगायच तर जेलोफ राईस म्हणजे आपला टॉमेटो राईसच पण किंचीत बदल.
चला तर मग लागुया तयारीला.

साहित्य : 



२ वाट्या तांदुळ १/२ तास भिजत ठेवलेला. (इथे उकडा तांदुळ वापरला जातो. मी बासमती वापरलाय.)
२ मोठे कांदे.
२ मोठे टोमॅटो.
२-३ मोठे चमचे टोमॅटो पेस्ट.
२ लहान गाजरं.
१ वाटी मटार दाणे.
४-५ पाकळ्या लसुण.
१/२ इंच आले.
२-३ लहान लाल बेल पेपर्स. (ज्या भुतलावरील काही अती जहाल मिरच्यां मध्ये मोडतात. पण त्यांचा एक भनाट गंध असतो.)
३-४ लहान सिझनिंग क्युब्स.
१ डाव तेल.


कृती :



टॉमेटोला वर चित्रात दाखवल्या प्रमाणे सुरीने चरे पाडुन घ्यावे. मिरच्या स्क्युअर स्टिक मध्ये ओवून घ्याव्या.



एका भांड्यात पाण्याला उकळी आणुन मग यात हे टॉमेटो ब्लांच करुन घ्यावे.



टॉमेटो शिजतायत तोवर मिरच्या मधम आचेवर भाजुन घ्याव्या. भाजुन नंतर थंड झाल्यावर आतल्या बीया काढून टाकाव्या.



मिक्सरमध्ये १/२ कांदा, २ लसुण पाकळ्या, आलं, ब्लांच केलेले टॉमेटो (सालं काढूण टाकावी.) आणि भाजलेल्या मिरच्या टाकुन पातळ वाटुन घ्यावं.



एका भांड्यात १ डाव तेल तापवून त्यात २ पाकळ्या बारील चिरलेला लसुण आणि उभा/आडवा कापलेला कांदा टाकुन परतुन घ्यावं.



कांदा गुलाबी पारदर्शक झाला की त्या वर वाटलेले टॉमेटो आणि टॉमेटो पेस्टं टाकुन ५-१० मिनीटे परतुन घ्यावं.




सिझनिंग क्युब टाकाव्या. नसल्यास चवी नुसार मीठ, २ चमचे संडे मसाला (बाजारात रेडिमेड मिळतो) टाकावा.




भिजत ठेवलेला तांदुळ (पाण्या शिवाय) टाकुन हलक्या हाताने परतुन घ्यावा. जास्त ढवळा ढवळ केली तर भाताची कणी मोडेल.



अंदाजे तांदळाच्या १/२ इंच वर येईल इतपत गरम पाणी टाकावं आणि झाकण ठेवून मंद आचेवर १५-२० मिनीटे शिजू द्यावं. मध्ये मध्ये थोडा पाण्याचा अंदाज घ्यावा. अगदीच गरज भासली तर थोडं गरम पाणी वाढवावं.
भात शिजतोय तोवर आपण पेप्पे चिकनची तयारी करु.



चिकनचा लेग पीस स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्यावा. त्याला सुरीने २-३ ठिकाणी चरे द्यावे.



१ चमचा तेल + १ चमचा कायेन पेपर (ही तिखट नसते पण रंग बरा येतो. नसल्यास काश्मिरी लाल तिखटं) चवी नुसार मीठ + चिली फ्लेक्स् + सुकवलेली थाईमची पानं (चित्रात दिसत नाहीयेत, ति मी नंतर टाकली.) एकत्र करुन घ्यावी.



वरील मिश्रण चिकनला लावून ५ मिनीटे मुरू द्यावं. तोवर ओव्हन २००° C वर ५ मिनिटं तापत ठेवावा.



ओव्हन तापल्यावर त्यात चिकन ठेवून २५-३० मिनेटे शिजवून घ्यावं. शेवटची ३ मिनीटे. ग्रील मोड वर ठेवावं.

चिकन शिजतय तोवर आपल्या भाताचं काय झालय?



ह्म्मम्म पाणी बहुतेक आटत आलय भातही बर्‍या पैकी शिजत आलाय. आता त्यात गाजराचे तुकडे आणि मटार टाकुन हलक्या हाताने ढवळुन वरून झाकण लावून (सील बंद करुन) परत १५ ते २० मिनीटे आतल्या आत वाफेवर शिजू द्यावं.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~



इथला जेलोफ राईस आणि चिकन पेप्पे कसं दिसतं याची कल्पना यावी म्हणुन इथल्या 'टँटेलायझर'या फुड चेन मधुन मागवलेली ही डीश.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

आणि ही आहे आपण तयार केलेली.


दिसतेय की नाही हाटीलातल्या सारखी?
Smile





Sunday, 1 January 2012

बाबा गनुश

सर्व रसिक खवय्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


२०१२ ची सुरवात एका शाकाहारी पाककृतीने करत आहे. आशा करतो आपल्याला आवडेल.
मध्यपुर्वेत रहाताना तिथल्या पदार्थांनी भुरळ घातली होती. शवरमा (शोरमा), फलाफल, वेगवेगळ्या प्रकारचे  कबाब, हमस आदी माझ्या काही आवडत्या डिश.
आज त्या पैकी बाबा गनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे.
खुबुस वा पिट्टा ब्रेड डीप करण्यासाठी बाबागनुश हे एक प्रकारच डीपिंग आहे.

साहित्य : 




एक मोठं किंवा २ माध्यम वांगी.
३ मोठे चमचे ताहिनी. (भाजलेल्या तिळाची तेलात वाटलेली पेस्ट.)
२ लिंबांचा रस.
२-३ पाकळ्या लसूण
चवी नुसार मीठ.
२-३ चमचे ताजं घट्ट दही (ऑपश्नल)
सजावटीसाठी : ओलीव्हचं तेल, ऑलीव्ह, लाल तिखट, कोथिंबीर.

कृती :





वांग्याला काट्याने टोचे मारून वरून तेलाचं बोट फिरवावं.
निखारे असल्यास उत्तम पण नसल्यास शेगडीवर वांगं भाजून घ्यावं.
(ओव्हन मध्येही भाजता येईल पण त्याला खूप वेळ लागतो साधारण ४५-५० मिनिटे.)





भाजलेलं वांगं गार झाल्यावर वरच साल काढून टाकावं आणि काट्या/चमच्याने वांग्याचा गर मोडून घ्यावा.





एका बाऊलमध्ये ताहिनी आणि लिंबाचा रस फेटून घ्यावा. सुरवातीस फेटताना मिश्रण एकदम घट्ट जाणवेल, पण नंतर हलकेपणा जाणवायला लागेल.





नंतर त्यात आवडी नुसार ताजं दही घालून फेटावं.





वांग्याच्या मोडलेल्या गरावर वरील मिश्रण, लसणाच्या पाकळ्या आणि चवी नुसार मीठ, लाल तिखट टाकून फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून घ्यावं.





साधारण श्रीखंडाची घनता येईल. वाढताना थोडं ओलीव्ह्च तेल टाकून वरून लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. ऑलीव्ह लावून सजवावं.





खबुस किंवा पिटा ब्रेड सोबत डीपिंग म्हणून सर्व्ह करावं.

Monday, 26 December 2011

तिरामिसु

आज खा रे खा चा पहिला वाढदिवस. त्या निमित्ते आज काही गोड धोड करावं असा विचार केला. आजवर तुम्ही सर्वांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलतं, हा लोभ असाच रहावा हीच मनोकामना.

साहित्यः





२५० ग्रॅम मस्कार्पोन चीज.
लेडी फिंगर्स बिस्किटे. (न मिळाल्यास 'मारी'ची)
साखर ३ मोठे चमचे. (अंदाजे ५० ग्रॅम)
२ अंडी.
कॉफी.
२ ते ३ मोठे चमचे कोको पावडर.
२ चमचे रम (ऑप्शनल).


कृती :


अंडी फोडुन त्यातील बलक आणि पांढरा भाग वेगवेगळे करावे.



बलकात साखर टा़उन फेटुन घ्यावे. इतके फेटावे की त्याचा पिवळा धम्मक रंग ऑफ व्हाईट झाला पाहिजे.



चमचा चमचा मस्कार्पोन चीज टाकत सगळ चीज संपे पर्यं फेटत रहावं. शेवटी आंड्यातला पांढरा भाग (तोही फेटुन घ्यावा) टाकून फेटुन घ्यावं, साधारण केकच्या मिश्रणाची घनता आली पाहिजे.
आवडी नुसार दुध किंवा रम टाकुन कॉफी पाण्यात विरघळून घ्यावी.



लेडी फिंगर्स बिस्कीटांचा एक थर भांड्याच्या बुडाशी लावावा.



बिस्कीटांवर चमच्या- चमच्याने कॉफी ओतावी.



कॉफीत भिजलेल्या बिस्किटांवर चीज अंड्याचं मिश्रणाचा थर द्यावा.



पुन्हा एकदा बिस्किटांचा थर लावून आणि कॉफी ओतुन चीज अंड्याचं मिश्रणाचा थर द्यावा.
अ‍ॅल्युमिनीयन फॉईल लावून भांडेफ्रिजमध्ये कमीत कमी ६-७ तास थंड करत ठेवावं.












हॅप्पी बर्थडे खा रे खा :)

मनातलं जनांत

गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात Wink ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही. माझा ब्लॉग?
हौसे खातर थातुर मातुर पाककृत्या करणार्‍या मला आंतरजाला वरील काही स्नेह्यांनी पाककृतींचाच ब्लॉग काढायचं सुचवलं. आज करु-उद्या करू असं करत मी टाळत होतो. कारण मी अनेक ब्लॉग पाहिले होते की जिथे मंडळी उत्साहात सुरवात तर करतात पण मग महिनोंन महिने / वर्षे काही लिहितच नाहीत. माझं ही तसचं काहिस होईल अशी भिती मनात होती.
एके दिवशी राजे स्वतःच मला म्हणाला हवं तर मी तुला ब्लॉग बनवून देतो. तु फक्त हो म्हण. त्याचा हा माझ्या वरचा विश्वास माझा मलाच हुरुप देउन गेला. आणि बरोब्बर गेल्या वर्षी याच दिवशी खा रे खा चा जन्म झाला.
राजेने लागेल तशी मदत केलीच. प्राजू ताई आणि माझ्या ताईने मला या ब्लॉगसाठी एकदम समर्पक नाव सुचवलं. नाताळची सुट्टी होतीच हाताशी धडाधड सगळ्या जुन्या पाककृत्या टाकण्याचा सपाटा लावला.
मित्रं मंडळींना ब्लॉगचं रुप रंग आवडलं. त्यांनी त्यांच्या मित्रांकडे चार कौतुकाचे शब्द काढले. खवय्या तात्याने तर चक्क त्यावर एक लेखच लिहून प्रकाशित केला. एका दिवसात जवळ जवळ ५०० हिट्स् मिळाल्या. एकदम खुश झलो. अहो सामान्य माणुस मी. आपल्या कामाचं कौतुक झालेलं कुणाला नको असतं. Smile १०००, १०,०००, २०,००० असे टप्पे पार होत होते. दरम्यान नवीन पाककृती येतच होत्या. आज एका वर्षा नंतर जवळ पास ८० पाककृत्या झाल्या आहेत. आणि तब्बल ४२,६०० हिट्स. यात सर्व मिपाकर, मीमकर, बझकार, अन्य ब्लॉगर्स आणि मायबोलीकरांचा मोलाचा वाटा आहेच. तुम्हा सर्वांचे आभार मानून मला तुमच्या ऋणांतुन मुक्त व्हायचं नाही कारण तुमचा हा लोभ मला असाच हवाय. Smile
माझ्यासाठी तेच उत्तेजक आहे.
नतमस्तक




Tuesday, 20 December 2011

एगप्लांट + मोझ्झेरेला चीज (उर्फ वांग्याचे काप फ्राय)




आज जवळ जवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता नावातच एग असल्याने अंड्याचा वापर अपरिहार्य आहे. Wink पण तुम्ही अंड खात नसाल तर त्यावरही उपाय आहे.
नेहमीसारखे वांग्याचे काप करण्या ऐवजी आज पाकृमें थोडा टिव्स्ट्.

साहित्यः




एक मोठं वांगं.
एक मोठा कांदा (जीतका शक्य असेल तितका बारीक चिरलेला.)
२ मध्यम टोमॅटो  (                        .-॥-                              .)
२-३ चमचे टोमॅटोची पेस्ट.
चिमुटभर साखर (ऑप्शनल.)




१ चमचा लाल तिखटं / मसाला.
१/४ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
२-३ चमचे तेल.
१/४ वाटी ब्रेड क्रम्स्
१/४ वाटी मैदा + चवीनुसार मीठ.
१ अंडे.(फेटलेले.)
अंड्याला पर्याय हवा असल्यास २ चमचे मैदा + १ चमचा बेसन एकत्रं करुन थोडं पाणी टाकुन भजीच्या पीठा पेक्षा किंचीत पातळ भिजवावं.

कृती:

या पाककृतीसाठी आपल्याला थोडा सॉस / रस्सा लागणार आहे. तर सर्व प्रथम आपण तो बनवून घेऊ.
सॉस




एका कढईत ३-४ चमचे तेल कडकडीत तापवून घ्यावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. चिमुट्भर मीठ टाकावं म्हणजे कांद्याला पाणी सुटुन तो लवकर शिजेल.
मग त्यात लाल तिखट / मसाला टाकून चांगलं परतुन घ्यावं.





मसाल्याचा कच्चा वास निघुन गेल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. मध्यम ते मंद आचेवर सतत परतत रहावं. चवी नुसार मीठ टाकावं. २-३ चमचे टोमॅटोची पेस्ट टाकून चांगल ढवळुन घ्यावं. चीमुटभर साखर टाकावी.





वरून झाकण ठेउन पेस्टचा कच्चट वास जाई पर्यंत आणि कांद्या टोमॅटोचा पार लगदा होई पर्यंत शिजवावे. हा सॉस बनवताना शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. (झाकण ठेवल्यावर आतल्या बाष्पाचं जितकं पाणी पडेल तितक पुरेसे आहे.)

वांग्याचे काप 







एका बशीत ब्रेड क्रम्स, दुसर्‍यात मैदा + मीठ आणि तिसर्‍यात फेटललं अंडे ठेवुन हाताशी ठेवावं.
(ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी २ चमचे मैदा + १ चमचा बेसन + पाणी एकत्र करुन भजी पेक्षा थोडं पातळ पीठ भिजवून घ्यावं.)





वांग्याचे साधारण १ ते दिड सेंमी जाड काप करुन घ्यावे.
लाल तिखट / मसाला + तेल + मीठ एकत्र करुन ते वांग्याच्या कापाना लावून किमान २० मिनीटे मुरत ठेवावं.
मुरवलेल कापांना पाणी सुटलेल असल्याने ते सर्वप्रथम मैद्यात घोळवून घ्यावे. मग ते फेटलेल्या अंड्यात घोळवून शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.





तव्यावर २ चमचे तेल सोडून ते कडकडीत तापल्यावर त्यात हे वांग्याचे काप खरपूस तळून घ्यावे.
हे तळलेल काप एखाद्या जाळी वर ठेवावे म्हणजे खालून वाफ धरुन ते मऊ पडणार नाहीत.

(इथले २-३ फोटो माझ्या धांदरट पणामुळे डिलीट झाले. Sad )

एका बेकिंग पेल्ट मध्ये खाली थोसा सॉस पसरवून घ्यावा त्यावर एक वांग्याचा काप ठेवावा. वरून परत थोडा सॉस लावून त्यावर अजुन एक काप असा थर रचावा. वर परत थोडा सॉस लावुन बचका भर तुमच्या आवडीचं चीज ठेवावं. (मी मोझ्झेरेला चीज वापरलय.)
नंतर ही बशी ओव्हनमध्ये ग्रील मोड वर चीज वितळे पर्यंत ठेवावी (अंदाजे १ ते दीड मिनीट.)
ओव्हन नसल्यास मायक्रॉवेव्हमध्येही चालेल.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*




स्टार्टर म्हणुन वाढायला हरकत नाही.





पण हा पदार्थ गरम असतानाच खाण्यात मजा आहे. तेव्हा ताबडतोब लुत्फ घ्यावा.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*





वाटल्यास थोडासा पुलाव/ जीरा राईस सोबत साईड डिश म्हणुनही वाढू शकता.