जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Saturday, 7 January 2012

नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन

आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच.
या भाताच्या जोडीला येते ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी).

थोडक्यात सांगायच तर जेलोफ राईस म्हणजे आपला टॉमेटो राईसच पण किंचीत बदल.
चला तर मग लागुया तयारीला.

साहित्य : २ वाट्या तांदुळ १/२ तास भिजत ठेवलेला. (इथे उकडा तांदुळ वापरला जातो. मी बासमती वापरलाय.)
२ मोठे कांदे.
२ मोठे टोमॅटो.
२-३ मोठे चमचे टोमॅटो पेस्ट.
२ लहान गाजरं.
१ वाटी मटार दाणे.
४-५ पाकळ्या लसुण.
१/२ इंच आले.
२-३ लहान लाल बेल पेपर्स. (ज्या भुतलावरील काही अती जहाल मिरच्यां मध्ये मोडतात. पण त्यांचा एक भनाट गंध असतो.)
३-४ लहान सिझनिंग क्युब्स.
१ डाव तेल.


कृती :टॉमेटोला वर चित्रात दाखवल्या प्रमाणे सुरीने चरे पाडुन घ्यावे. मिरच्या स्क्युअर स्टिक मध्ये ओवून घ्याव्या.एका भांड्यात पाण्याला उकळी आणुन मग यात हे टॉमेटो ब्लांच करुन घ्यावे.टॉमेटो शिजतायत तोवर मिरच्या मधम आचेवर भाजुन घ्याव्या. भाजुन नंतर थंड झाल्यावर आतल्या बीया काढून टाकाव्या.मिक्सरमध्ये १/२ कांदा, २ लसुण पाकळ्या, आलं, ब्लांच केलेले टॉमेटो (सालं काढूण टाकावी.) आणि भाजलेल्या मिरच्या टाकुन पातळ वाटुन घ्यावं.एका भांड्यात १ डाव तेल तापवून त्यात २ पाकळ्या बारील चिरलेला लसुण आणि उभा/आडवा कापलेला कांदा टाकुन परतुन घ्यावं.कांदा गुलाबी पारदर्शक झाला की त्या वर वाटलेले टॉमेटो आणि टॉमेटो पेस्टं टाकुन ५-१० मिनीटे परतुन घ्यावं.
सिझनिंग क्युब टाकाव्या. नसल्यास चवी नुसार मीठ, २ चमचे संडे मसाला (बाजारात रेडिमेड मिळतो) टाकावा.
भिजत ठेवलेला तांदुळ (पाण्या शिवाय) टाकुन हलक्या हाताने परतुन घ्यावा. जास्त ढवळा ढवळ केली तर भाताची कणी मोडेल.अंदाजे तांदळाच्या १/२ इंच वर येईल इतपत गरम पाणी टाकावं आणि झाकण ठेवून मंद आचेवर १५-२० मिनीटे शिजू द्यावं. मध्ये मध्ये थोडा पाण्याचा अंदाज घ्यावा. अगदीच गरज भासली तर थोडं गरम पाणी वाढवावं.
भात शिजतोय तोवर आपण पेप्पे चिकनची तयारी करु.चिकनचा लेग पीस स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्यावा. त्याला सुरीने २-३ ठिकाणी चरे द्यावे.१ चमचा तेल + १ चमचा कायेन पेपर (ही तिखट नसते पण रंग बरा येतो. नसल्यास काश्मिरी लाल तिखटं) चवी नुसार मीठ + चिली फ्लेक्स् + सुकवलेली थाईमची पानं (चित्रात दिसत नाहीयेत, ति मी नंतर टाकली.) एकत्र करुन घ्यावी.वरील मिश्रण चिकनला लावून ५ मिनीटे मुरू द्यावं. तोवर ओव्हन २००° C वर ५ मिनिटं तापत ठेवावा.ओव्हन तापल्यावर त्यात चिकन ठेवून २५-३० मिनेटे शिजवून घ्यावं. शेवटची ३ मिनीटे. ग्रील मोड वर ठेवावं.

चिकन शिजतय तोवर आपल्या भाताचं काय झालय?ह्म्मम्म पाणी बहुतेक आटत आलय भातही बर्‍या पैकी शिजत आलाय. आता त्यात गाजराचे तुकडे आणि मटार टाकुन हलक्या हाताने ढवळुन वरून झाकण लावून (सील बंद करुन) परत १५ ते २० मिनीटे आतल्या आत वाफेवर शिजू द्यावं.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~इथला जेलोफ राईस आणि चिकन पेप्पे कसं दिसतं याची कल्पना यावी म्हणुन इथल्या 'टँटेलायझर'या फुड चेन मधुन मागवलेली ही डीश.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

आणि ही आहे आपण तयार केलेली.


दिसतेय की नाही हाटीलातल्या सारखी?
Smile

13 comments:

 1. lai bhari re .
  ekdam bhari krun baghava lagel ekda.aatach maggy khaali re.
  Rakesh

  ReplyDelete
 2. mast delicious disat aahe dish..karun pahave lagel..:)

  ReplyDelete
 3. khup ch bhari distey dish...atta uchlun khavasa vatatay, tya laal mirchya habanero peppers aahet ka?

  ReplyDelete
 4. धन्यवाद पूनम , दिपाली.
  हो दिपाली या habanero peppers आहेत.

  ReplyDelete
 5. pratikji tumachya pak kruti far sopya ani apratim asatat ... tyatlich hi ek dish mhanaje ....wow

  ReplyDelete
 6. ani Pratikji Tumhi jya padhatine Chikan Chilly diliye na ti me nehami banavate ani majhya Purn familykadun majhi Khupach stuti hote ...yache shrey tumhalach jate ... Thanx ... ME tumachi kharach Khup mothi FAN ahe .. :)

  ReplyDelete
 7. पुनश्च धन्यवाद अश्विनी.
  प्लीज 'जी' नका लावू नावा मागं. निव्वळ नावानं संबोधलेले आवडेल.:)

  ReplyDelete
 8. सही आहे रे बाबा हे ! माझ्या लेकीने ठरवलंय की आम्हीं करायचीय ही डिश ! ( 'आम्हीं' हे महत्त्वाचं...म्हणजे मी एकटीने नाही करायचं ! ती मदत करणारेय ! ) :)

  ReplyDelete
 9. वाह! लेकीला ही कुकिंगची गोडी आहे म्हणायची. ग्रेट.

  ReplyDelete
 10. सुरेखच. आपला पूर्ण ब्लॉगच अप्रतिम आहे. फोटो, त्यातील पदार्थांची मांडणी, रेसिपी लिहिण्याची हातोटी, वाचकाला दडपण न येता करावी वाटेल अशी शैली, सगळेच छान ☺
  आता नेहमी इथे भेट नक्की.
  नवशिकाऊ लोकांना आपल्या ब्लॉगची लिंक नक्की देईन.
  खूप खूप धन्यवाद.

  ReplyDelete
 11. this is OTG oven or can be done in microwave oven-grilled mode?
  BTW, awesome recipes all of them

  ReplyDelete