जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 2 October 2011

हांडवो (बेक्ड्)

साहित्यः

१ वाटी तांदुळ.
१/४ वाटी चणा डाळ.
१/४ वाटी मुग डाळ.
१/४ वाटी तुर डाळ.
१/२ वाटी उडिद डाळ.
१/२ वाटी दही. (आंबट असल्यास उत्तम.)



दुधी किसलेला. (पाणी काढुन.)
कोबी बारीक चिरुन.
(तुमच्या आवडी नुसार गाजर आणि अन्य भाज्या सुद्धा चालतील.)
१ ते दिड इंच आलं.
२-४ हिरव्या मिरच्या.



१ चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा हळद.
साखर-मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी :
तेल, राई, तिळ, हिंग.

कृती: 



तांदुळ आणि सगळ्या डाळी स्वच्छ धुवून किमान २-३ तास भिजत ठेवाव्या.
आल मिरची, भिजवलेले तांदुळ आणि डाळी थोड्या भरड वाटुन घ्याव्या. (ईडलीच्या पिठापेक्षा किंचीत दाट.)
दही टाकुन मिश्रण ढवळुन घ्याव.
उबदार ठिकाणी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवाव.



मीठ, साखर, हळद, लाल तिखट, किसलेला दुधी आणि कोबी टाकुन मिश्रण चांगल एकत्र करुन घ्याव.



राई, तिळ, हिंग टाकुन फोडणी करावी. आणि त्यातली १/२ ह्या मिश्रणात टाकावी.



बेकिंगच्या भांड्याला तेला/तुपाचा हात लावुन घ्यावा. आणि हे मिश्रण त्यात ओताव. (साधारण १.५ ते २ इंच जाडीचा थर ठेवावा.)
राहिलेल्या फोडणीत १/४ चमचा लाल तिखट टाकुन ती वरुन टाकावी.



ओव्हन १८० ते २०० °C वर ठेवुन त्यात हा हांडवो ३० ते ४० मिनिटे बेक करावा.

ओव्हन नसल्यास नॉन्स्टीकच्या फ्राइंगपॅनमध्ये मंद आचेवर १५ मिनिटे शिजवाव. आणि मग उलटुन परत १५ मिनिटे शिजवाव.
बेक करायचा नसल्यास ढोकळ्या प्रमाणे उकडूनही करता येतो. (पण चवीत फरक पडतो.)





चटणीसोबत वा दुपारच्या वाफाळत्या चहासोबत हांडवोचा आस्वाद घ्यावा.

Saturday, 24 September 2011

ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन

नमस्कार मंडळी.

बाप्पा त्यांच्या गावी परतले. आणि आता काही  दिवसातच दुर्गा माता आपल्या भक्तांच्या भेटीस येतेय.  मग ९-१० दिवस काही उसंत मिळायची नाही तुम्हाला. तेव्हा म्हटल एक विकांत मिळतोय मध्ये तर तो सत्कारणी लावावा.

फार काही कटकटीची पाककृती नाही आज. चला तर लागा कामाला. आधी झटपट कच्चा माल गोळा करु.

साहित्य : 




१ बीयरचा कॅन. (लहान / मोठा / ब्रँड, चॉइस इज युवर्स.)



१ कोंबडी स्वछ धुवुन आणि पेपर नॅपकीनने एकदम कोरडी करुन.



१/२ चमचा साखर.
१ चमचा लसणाची पावडर.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा भाजलेली जीरे पुड.
१ चमचा मीठ.
१ चमचा भरड वाटलेली काळीमीरी पुड.
१ चमचा कांद्याची पुड.
२-४ मोठे चमचे ऑलिव्हच तेल. (ऑलिव्हच नसल्यास दुसर कसलही चालेल. ऑलिव्हच जरा हृदयासाठी बर असत.)
१ लिंबू.

कृती :



सगळे मसाले एकत्र करुन घ्यावे.



कोंबडीला ऑलिव्हच्या तेलने मसाज द्यावा.



जस दिवाळीला आपण उटण खसा खसा चोळुन लावतो, तस तो एकत्र केलला मसाला कोंबडीला चोळावा.




बीयरचा कॅन उघडुन त्यातुन चांगले २-४ मोठ्ठे घोट रिचवावे. पण आवडते म्हणुन सगळी गट्टं करु नये. अर्धी शिल्लक ठेवावी. (थोडीशी सावधानी म्हणुन म्हणुन एक एक्स्ट्रा कॅन बाजुला ठेवलेला आहे हे चणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल Wink ) हा तर काय म्हणत होतो, दोन घोट मारल्या नंतर कॅनला वरुन २-३ भोके पाडुन घ्यावीत.
जो थोडा फार मसाला उरला असेल तर तो त्या कॅनमध्ये रिकामा करावा. एकदम भक्सन टाकुनये. अन्यथ्या ती बीयर, कोण्या अडाण्याने मीठ मसाला टाकला ते पहायला लगेच बाहेर येईल. आणि तुम्हाला नसता त्रास सहन करावा लागेल.



एका ओव्हनप्रुफ भांड्यात कॅन ठेवुन कोंबडीला त्यावर बसवावे. हा आधी ती थोडी कां-कू करेल पण तिकडे दुर्लक्ष करुन तिची त्या कॅनवर प्रतिष्ठापना करा. एका लिंबाला २-३ टोचे मारुन ते (टोचे मारलेली बाजू खाली) कोंबडीच्या डॉक्याच्या जागी फिट्ट बसवावे.
(कधी कधी कोंबडी झिंगण्या आधीच आडवी होते. त्यामुळे तिस कॅन वर बसवताना काळजी घ्यावी. तुमच्या इथे जर कोंबडीसाठी पेश्श्ल बार स्टुल* मिळत असेल तर त्याचा वापर करावा. )
*





ही सगळी आरास उचलुन ओव्हन मध्ये ठेवावी. कोंबडीचे पंख लगेच करपतात म्हणुन त्यांना थोडी अ‍ॅल्युमिनियमची फॉईल लावली तर उत्तम.
ओव्हन* १८० ते २०० °C वर सेट करुन आणि कोंबडीला आत रखवालीस बसवुन तास-दिड तास भगीनी मंडळींनी आपल्या आवडत्या सास बहुंच्या कट-कारस्थ्यानात रममाण होण्यास हरकत नाही. ते नसेल आवडत तर आंजावर फेर फटका मारुन या. कॅलरी काँशस मंडळींनी नंतर वाढवार्‍या कॅलरीच्या प्रमाणात आधीच त्या जाळायला हरकत नाही.

*तुमच्या सोई नुसार, ओव्हन ऐवजी ग्रीलचा वापरही करू शकता.



तासा दिड तासा नंतर झिंगुन टम्म झालेली ही कोंबडी बघा कशी खुणावतेय.
400
600

ओव्हन मधील उष्णतेने कोंबडीतील आर्द्रता कमी होऊन ती वातड होते. बीअर वापरल्याने ही आर्द्रता टिकुन रहाते. शिवाय तिच्यातील मॉल्ट आणि यीस्टच्या रासायनीक प्रक्रियेमुळे कोंबडीची चामडी पातळ आणि क्रिस्पी होते.
तरी ज्यांचे बीयरशी वाकडे आहे त्यांनी फळांचा रस आणि पीण्याचा सोडा वापरला तरी चालेल.


खालील चित्रफितीमध्ये मध्ये कोंबडी आतुन किती मॉईस्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय.


Sunday, 21 August 2011

पालक गोश्त



साहित्यः 



२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ जुड्या पालक बारीक चिरुन घेतलेला.



५०० ग्रॅम. मटण.
२ चमचे दही + १ मोठा चमचा आल-लसुण वाटण + १ लहान चमचा हळद + १ चमचा मसाला एकत्र करुन मटणाला लावुन १-२ तास मुरत ठेवाव.
खडा मसाला : २-३ वेलच्या , ३-४ लवंगा, १०-१२ काळीमीरी, १ इंच दालचीनी, तमाल पत्र.
१ चमचा आल-लसुण वाटण.
१ मोठा चमचा लाल तिखट.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२ मोठे चमचे लिंबाचा रस.
तेल, मीठ चवी नुसार.

कृती :



एका कढईत थोडं तेल तापवुन त्यात खडा मसाला परतुन घ्यावा. मग त्यात कांदा टाकुन तो पारदर्शक होई पर्यंत परतुन घ्यावा. त्यात आल-लसणाच वाटण टाकुन कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा.



नंतर त्यात मुरवलेल मटण टाकुन मोठ्या आचेवर ५-१० मिनिटं झाकण न ठेवता परताव.



मग त्यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकुन मटण चांगल एकत्र कराव. ५ मिनीटांनी त्यात टॉमेटोची पेस्ट टाकावी.



त्यात चिरलेला पालक टाकुन, एकत्र करुन घ्याव. लिंबाचा रस टाकावा. १/२ कप पाणी टाकुन वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजत ठेवाव. अधुन मधुन ढवळावं. पाणी आटल्यास थोडं थोडं गरम पाणी टाकत जाव.




मटण शिजले की चवी नुसार मीठ टाकुन, झाकण काढुन मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजवावे.





नान, तुंदुरी रोटी, भाकरी, वा वाफाळत्या भाता सोबत हाणावे.

Saturday, 6 August 2011

खेकड्याच सुकं (क्रॅब मसाला)

श्रावण लागलाय पण आपण काय तो पाळत नाही. श्रावणात म्हावरं स्वस्त होतं अशी एक दंत कथा आहे. हल्ली म्हणे आपल्याकडे शाकाहार वाढु लागला आहे असं कुठल्याश्या एका सर्वेक्षण करण्यार्‍या कंपनीने शोध लावला. सगळ्या अफवा आहेत.... सालं जर हे खर असतं तर आज बाजार स्वस्त नसता झाला? मटण ३०० रु किलोवर पोहोचल असत?

असो. सध्या भारतात नसल्याने त्याची प्रत्यक्ष झळ बसत नाहीये. त्यातच काल बाजारत खेकडे (स्वस्तात) मिळाल्यावर श्रावण वगैरे काही न पहाता अस्मादिकांनी ते लगेच घेतले.
काल शुक्रवार होता. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचं नव्हत. त्यामुळे निवांत वेळ ही हाताशी होता, म्हणुन खेकड्याचे सुके करायचा बेत केला.

साहित्य :

 



१/२ चमचा हळद.
१ मोठा चमचा (प्रत्येकी) लाल तिखट, भाजलेली जिरे पुड, धणे पुड, गरम मसाला.
अर्धा-पाऊण इंच दालचीनी.
१ लहान चमचा काळीमीरी.
४-५ लवंग.
२ मोठे कांदे बारीक चिरेलेले.
२ मोठे टॉमेटो बारीक चिरलेले.
१ मोठा चमचा आल लसुण पेस्ट.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२-३ हिरव्या मिरच्या.
कढीपत्ता.
तेल, मीठ चवीनुसार .




खेकडे साफ करुन घेतलेल.

कृती :



कडकडीत तापवलेल्या २ मोठे चमचे तेलात लवंग, काळिमिरे आणि दालचीनी परतुन घ्यावे.
नंतर मिरची , कडीपत्ता आणि कांदा टाकुन, कांदा पारदर्शक गुलाबी होई पर्यंत परतावा.
मग त्यात आल लसुण पेस्ट टाकुन कांदा चांगला परतवुन घ्यावा.
उरलेले सगळे मसाले टाकुन चांगल परताव. वाटल्यास किंचीत पाणी टाकाव. मसाला कलथ्याने सतत परतत रहाव.
  




मसाल्याला बाजुने तेल सुटु लागलं की मग टॉमेटो टाकुन चांगल मिक्स करावं.
टॉमेटो गळुन गेल्यावर मग त्यात टॉमेटोची पेस्ट टाकुन परताव.




तयार मसाला परत तेल सोडु लागला की मग त्यात साफ केलेले खेकडे सोडावे.
थोडसं पाणी टाकुन वरुन झाकण ठेवाव आणि १० मिनिटे वाफ द्यावी.
खेकड्याच सुक हव असेल मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजत ठेवावे. रस्सा हवा असल्यास ताबडतोब आच बंद करावी.
वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबू पिळुन आडवा हात मारावा.
पण जर फुरसत असेल तेव्हाच याच्या वाटे जावे. आणि हाणुन झाल्यावर मस्त ताणुन द्यावी.



Wednesday, 27 July 2011

अंडा करी



साहित्य :



४ अंडी. (उकडलेली वा कच्चीच आवडीनुसार.)



१ लहान चमचा हळद.
१ मोठा चमचा लाल तिखट.
१ मोठा चमचा भाजलेली जीरेपुड.
१ मोठा चमचा गरम मसाला.
दीड ते दोन चमचे आलं-लसुण पेस्ट.



दोन मध्यम कांदे उभे चिरुन.
दोन मध्यम बटाटे गोल फोडी करुन. (आवडत असल्यास.)
२-३ टॉमेटो बारीक चिरुन.
तेल, मीठ चवीनुसार.

कृती:



बटाट्याचे काप किंचीत मीठ लावुन थोड्याश्या तेलावर शिजवुन घ्यावे.



दुसर्‍या एका भांड्यात थोड्या तेलावर कांदा, आल लसुण पेस्ट टाकुन गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.
नंतर त्यात सगळे मसाले टाकुन तेल सुटे पर्यंत चांगल परताव. त्याच दरम्यान टॉमेटो टाकावा. मसाला खाली भांड्याला लागत असल्याच किंचीत पाणी घालावं.



टॉमेटो शिजल्यावर त्यात बटाट्याचे काप घालुन पुन्हा एकदा परताव.
ज्या प्रमाणात रस्सा हवा त्या नुसार पाणी टाकव. चवीनुसार अंदाज घेत मीठ टाकाव. झाकण ठेवुन एक वाफ काढावी.
ज्यांना उकडलेली अंडी आवडतात त्यांनी अंडी सोलुन त्याला सुरीने टोचे मारुन रश्यात टाकावी.
कच्ची अंडी आवडत असल्यास थोड्या थोड्या अंतरावर अंडी फोडुन टाकावी. (पण त्यानंतर बिल्कुल ढवळु नये.) परत वरुन झाकण ठेवुन १० मध्यम आचेवर शीजु द्यावे.



गरमागरम भाकरी सोबत लुत्फ घ्यावा.




Smile