जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 19 June 2011

हमस / हमुस

नमस्कार मंडळी, छोट्याश्या सुट्टी नंतर परत हजेरी लावतोय.  आज आपल्यासाठी घेउन आलोय लो कॅलरी आणि भरपुर प्रोटिन्सनी युक्त अशी मध्यपुर्वेतेली खास डिश हमस / हमुस. मला स्वतःला हा प्रकार फार आवडतो. पण बर्‍याच जणांना हा प्रकार बिल्कुल आवडत नाही. (यात माझ्या घरातल्या सगळ्यांचा समावेश आहे. )




साहित्यः



१ बाउल काबुली चणे (छोले).
२-३ मोठे चमचे ऑलिव्हचं तेल.
२ मोठे चमचे ताहिना /ताहिनी. (भाजलेल्या पांढर्‍या तिळाची पेस्ट.)
एका लिंबाचा रस.
१-२ पाकळ्या लसुणं बारीक चिरलेला.
मीठ चवी नुसार.
सजावटी साठी : काळे / हिरवे ऑलिव्ह, लाल तिखटं, कोथिंबीर.

कृती :

रात्रभर भीजत ठेवलेले काबुली चणे सकाळी कुकर मध्ये ३ शिट्ट्यावर उकडुन घ्यावे.



२-३ चमचे उकडलेले चणे बाजुला काढुन बाकीचे फुड प्रोसेसर / मिक्सरमध्ये काढुन त्यात ताहिना, लसुण, ऑलिव्हच तेल, मीठ टाकावं. हे सगळं वाटुन घेताना त्यात वरुन थोडा थोडा लिंबाचा रस घालावा. लिंबाच्या रसाची आणि ताहिनाची रासायनीक प्रक्रिया होउन याची घनता वाढते. खूप घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालावं.



आवडी नुसार वरुन उकडलेले काबुली चणे, ऑलिव्ह, लाल लिखट, कोथिंबीर टाकुन सजावट करावी.



मध्य-पुर्वेत शक्यतो हमस हा 'खबुस' या लेबनीज रोटी सोबत खल्ला जातो. 'खबुस' उपलब्ध नसल्यास पीटा ब्रेड आहेच. बरेच ठिकाणी यात वरुन बोनलेस चिकनचे छोटे छोटे तुकडे टाकुनही वाढतात. जोडीला भरपुर सलाडं आणि फलाफल / फिलाफलचं तोंडी लावण.