जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 4 December 2011

पाया

आमचा बा पाया बनीवन्यात यकदम येक्ष्पर्ट. आम्ही तेच्या पास्नचं धडं गिरवलं ल्हान आसताना. आज लै दिसानं बकर्‍याचं पाय दिसलं दुकानात, तवा बाची आठवन आली. लगेच बकयाचं पाय घेतलं आन बाला फोन लावला. थोडी उजलनी केली. आन खुशीत घरला निघालू. आवं आवं जरा दम खावा. सांगतु की सम्द बैजवार. पर दोस्तहो तुमचाकडं मोप टैम आसान तरच जा जी याच्या वाटेन. रांधल वाढलं खाल्लं आसं शिंपळ नस्तय ह्ये. वाईच टैम खानारी रेशीपी हाय ही.
पन ते म्हंत्यात नंव्हका सब्र का फल चवदार व्हताय. ते आक्षी खरं बगा.


सगल्यात पैल घ्या बकर्‍याचं चार पाय. खाटका कडनच यवस्थीत साफ करुन घ्या.
(आता ह्यो फटु मुद्दाम टाकत न्हाई. उगा कुनाच्या प्वटात कालव कालव हुयाची. Wink )




योक मोठा कांदा.
३ तांबोटी/टमाटी.
३-४ मोठं चमचं आल लस्नाच वाटन.



थोडं सुक मसालं.
यात योक योक चमचा हळद , धनं पुड , जीरं पुड , लाल तिखटं , घरचा मसाला / पाया मसाला.



थोडा खडा मसाला घ्या. जीर, लवंग, दालचीनी, काळीमीरी, तमालपत्र, चक्रीफुल, येल्ची.
थोडी कोथमीरी, आल्याचं बारीक लांब तुकडं, लिंबू.
१/२ वाटी ताज दही नाय तर नारलाचं दाट दुध.
तेल, मीट तुमच्या मर्जी वानी.



सर्वात पैले बकर्‍याचं पाय स्वछ धूउन घ्या. (तुकडं खाटकाकडनच करुन घ्या.)
आन बाजुला ठिउन द्या.





कांदा आन तांबोटी जित्की बारीक कापता येतीन तित्की बारीक कापून घ्या. तुमच्या कडं ते फूड प्रोफेसर असान तर त्याले कामाला लावा.
आम्ही गरीबं आपलं सुरीनच कापतू.





एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकुन मंग तेच्यात कांदा टाका. कांद्याच्या गालावं गुलाबी
आली की मंग त्यात आल-लस्नाचं वाटान टाकुन त्येचा कच्चा वास जाई पर्यंत परतत र्‍हा.





नंतर त्यात बारीक चिरलेली तांबोटी टाका. आन कांद्या तांबोट्याचा पार लगदा हुईस्तव शिजवून घ्या.





नंतर त्यात सम्दे मसाले (पावडर वाले) टाका. आवडी परमान मीट टाका आन बसा ढवळत.
ह्यो मसाला यकदम नीट शिजाया होवा. बाजून तेल सुटाया लागलं की कळनच तुमास्नी.





नंतर पायाचे तुकडे टाकुन, यवस्थित ढवळुन घ्या. मसाला सगळी कडुन बसला पायजे. जरा २ -४ मींट मोठ्या धगीवर परतत र्‍हा.





आता यात बर्‍यापैकी म्हंजे निदान ३/४ लिटर पाणी टाका. यवस्थित ढवळा.
वर जो खडा मसाला सांगीटलाय नव्ह, तो येका तलम कापडात गुंडाळुन त्याची पुरचुंडी बांधा, आन द्या सोडुन यात.
वरन झाकन ठेउन ३-४ तास लहान धगीवर शिजाया ठेवा.
आता तुमच्याकडं तेवढा टैम नसन ( त्यातच ते बेणं ग्यासच पण पैसं बी वाढल्याल) तर मंग कुरला झाकन लावून तेच्या ७-८ शिट्या घ्या. पटापट न्हाई बरका. शेगडी मध्यम धगीवरच ठेवा.
(आता शिट्या घ्या म्हनलं की आमचे काही मित्र लगेच येनार आन सांगनार शिट्या घेयाची गरज न्हाई. ठिक है बाबा तुमाना शिट्या घेतल्या बिगर जमत आसन तर तुम्ही शिट्या नका घीउ.)
कोळश्याची शेगडी आसन तर लैच ब्येष्ट.
कुकर बंद केला की गप गुमान झोपी जायाच. कुकर उघडाचा ते डायरेक्ट दुसर्‍या दिवशीच.
आता कळ्ळ म्या वर का म्हन्लो की तुमचाकडं मोप टैम आसान तरच जा जी याच्या वाटेन.


Wink



दुसर्‍या दिवशी झाकंन काडल्यावर हे आसं दिसन. ती खडा मसालावाली पुरचुंडी काडुन फेकुन द्या.
आत्ता टेस्ट घ्याया हरकत नाय.


Smile



आसच थोडं गरम करुन खाल्लं तरी चालल की.
पर थोडं चवीत बदल कराचा आसन. रस्सा थोडा दाट पायजे आसन तर त्यात १/२ वाटी ताज दही किंवा नारलाचं दाट दुध टाका. चांगलं ढवळा आन मंग थोडं गरम करा.





वरनं थोडं लिंबू मारुन, आलं, कोथमीरी टाकुन सजवा.




येच्या सोबतीला कर तंदुर मधली, नै तर आपली ज्वारी बाजरीची रोटी आसन तर आजुन काय पायजे राव.
पर मी येच्या संगटीनं अप्पम बनवलं तेबी एकदम भन्नाट लागल बगा.
तर मंग कवा बुलाविताय आमास्नी 'पाया' खाया?


अप्पमचा इडो :


अप्पमसाठी २ कप तांदुळ भिजत ठिवलेला, १ कप भात, ३ कप नारलाचा चव आन चवी परमान मीट ह्य सम्द एकत्र वाटुन रातभर आंबाया ठेवा.



6 comments:

  1. दुष्टा...मी अजिबात नाही कमेंटणार.......निषेध !!!

    ReplyDelete
  2. च्यायला!
    एकदम घराची आठवण दिलीस रे !

    ReplyDelete
  3. अरे कसला भारी लिहितोस तू ...माहितीये का तूला ? म्हणजे कुकिंग तर भारीच पण लिहायची कला hi अप्रतिम....आज फ्रायडे ....आणि सोबत तुझ किचन ! पाणी सुटलाय रे तोंडाला....असा अन्याय कोणावरही न होवो :) सगळाच जमेल अस वाटत नाहीये ...पण जेवढ जमेल ते करून नवर्याला खुश करणार हे नक्की......जाता जाता मनातला प्रश्न .विचारतेय .....
    by any chance ...r u vadaval??

    ReplyDelete
  4. धन्स पूजा.
    तुझा अंदाज १००% बरोबर. :)

    'तांबोटी'वरून ओळखलं का? ;)

    ReplyDelete
  5. तांबोटी आणि अजून बराच काही....... :) आणि एक सांगू का ? हे पाया बिया करायची आपली पद्धत युनिक आहे रे ! म्हंजे comparison नाहीच रे त्याला ...मला न आज माझ्या आजी ची जाम आठवण येतेय ...ती जाम भन्नाट करायची हे
    प्रकार :(

    ReplyDelete