जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday 24 July 2011

मुर्ग अचारी.

        येत्या शनिवारी गटारी अमावस्या. म्हणजेच रविवार पासुन श्रावण लागणार. माझ्या सारख्या वार न पाळणार्‍याला काय ३६५ दिवस गटारीच. पण त्यामुळे माझ्यासाठी गटारीचं महत्व कमी झालय अस नाही.
मी लहान असताना आमच्या घरी गटारीला खुप मजा असायची. बरेच नातेवाईक जमायचे आमच्या घरी. खाटकाकडे बरीच मोठी रांग असायची. म्हणुन बाबा पहाटेच जाउन मटण /चिकन घेउन यायचे. तोपर्यंत आम्हा चिल्ल्या पिल्यांकडे लसुण सोलणे, खोबरं किसणे अशी काम लागलेली असायची. आई दिदिची एकीकडे चहा-न्याहारीची धावपळ चालु असे. माम्या मावश्या वाटणं घाटणं आदी जेवणाच्या पुर्व तयारीला लागलेल्या असायच्या.
           पुरुषमंडळींची थोडीफार आचमनं चालायची. साधारण अकरा बाराच्या सुमारास आमची स्वारी एक कापडाची धोकटी सायकलच्या हँडलला टांगुन त्यात सोड्याच्या रिकाम्या बाटल्या घेउन खडखडाट करत निघायची. आतल्या खोलीत मामा, काका, बाबांची बैठक बसायची. आम्हा पोरा टोरांची मध्ये मध्ये उकडलेली अंडी, मक्याचा चिवडा, वेफर्स, फरसाण, सुक चिकन आदी चखण्यावर हात मारण्यासाठी लुडबुड चालु असायची. बैठकीला चढत्या अंगाने रंग भरायचा. अनेक गहन विषयांवर चर्चा चालु असायची. पण राजकारण आणि क्रिकेटया दोघांना मरण नसायचं.
          साधारण एक दिड च्या सुमारास होममिनिस्टर पहिली घंटा द्यायच्या. शेवटी दोन अडीच वाजता पानं मांडायला घेतली जात. नाईलाजाने पुरुषमंडळी बैठक आवरती घेत. आईच्या हातचं सुग्रास जेवण, त्या नुसत्या घमघमाटानेच भुक अधिकच चाळवली जायची. मटणाचा लालेलाल रस्सा, कोंबडीच सुकं, सोबतीला गरमा गरम भाकर्‍या, वाफाळता भात, कोशिंबीर. मुलांसाठी खास भेजा / कलेजी फ्राय, जिरावण म्हणुन सोलकढी किंवा चींचकढी असा जंगी बेत असायचा.
           आज ८-९ वर्ष जास्त झाली अशी एकत्र गटारी साजरी करुन. आजही सगळे जमतात एकत्र पण फक्त मी त्यांच्यात नसतो. Sad पण त्यादिवशी फोन वरुन सगळ्यांची गप्पा टप्पा होतात. आणि पुढल्या वर्षी नक्की येण्याच मी आश्वासन देतो.

छ्या साला उगाच नॉस्टॅल्जीक का काय म्हणतात ते झालो. तुमचाही बहुमुल्य वेळ घेतला.
आता जास्त चर्‍हाट न लावता मुळ विषयाकडे वळु. तर मंडळी येत्या शनिवारी गटारी अमावस्या. जे शनिवार पाळतात ते शुक्रवारीच गटारी साजरी करणार. तर त्यासाठी तयारी करता यावी म्हणुन आजच ही पाककृती देत आहे. आवडल्यास बदल म्हणुन करुन पहा.

मुर्ग अचारी :
 


साहित्य :



२ लहान चमचे जीरं.
२ लहान चमचे मेथी दाणे.
२ लहान चमचे राई.
२ लहान चमचे बडिशेप.
२ लहान चमचे काळीमिरी.
एक ते दिड इंच दालचीनी.
२ लाल मिरच्या. (ऑप्शनल)



२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२-३ टॉमेटो बारीक चिरलेले.
कढीपत्याची पाने.



२-३ हिरव्या मिरच्या + लिंबाचा रस.
२ चमचे दही
१ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे आलं-लसुण पेस्ट.
तेल, मीठ, लाल तिखट चवी नुसार.
अर्धा ते पाउण किलो चिकन.

कृती :

राई + जीर + बडीशेप + काळीमिरी + दालचीनी + मेथी दाणे कोरडे भाजुन घ्यावे. थंड झाल्यावर थोडे वाटुन भरकट पुड करुन घ्यावी.



चिकन स्वच्छ धुवुन त्यातलं पाणी पुर्ण पणे काढुन टाकाव. (पेपेर नॅपकिनने पाणी टिपुन घेतलं तर उत्तम.) त्यात वरिल वाटलेली पुड, दही, मीठ, आणि हळद लावुन एकत्र कराव. आणि किमान अर्धातास तरी मुरत ठेवाव.



एका कढईत अर्धा डाव तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. नंतर त्यात आल लसणाच वाटण टाकुन चांगल परताव. तेल सुटल्यावर त्यात प्रत्येकी १/२ चमचा मेथी दाणे, बडिशेप, जीर घालुन परताव.



१/२ चमचा हळद आणि २ चमचे लाल तिखट टाकुन सतत परत रहाव. परत तेल सुटु लागल की त्यात बारीक चिरलेला टॉमेटो टाकुन चांगल एकत्र कराव.



टॉमेटो पुर्ण गळुन गेल्यावर आणि बाजुने तेल सुटु लागल की मग त्यात मुरवलेल चिकन टाकुन चांगल ढवळुन घ्याव. वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजवत ठेवाव. १५ मिनिटांनी झाकण काढुन मंद आचेवर आतल पाणी आटे पर्यंत शिजवावं.




वरुन १-२ चमचे तेलात मोहरी कढीपत्ता आणि लिंबाच्या रसात बुडवलेल्या मिरच्या टाकुन फोडणी करावी. ही फोडणी तयार चिकन वर टाकावी.

समस्त जालीय स्नेह्यांना हॅप्पी गटारीच्या शुभेच्छा.  Wink

7 comments:

  1. मुजरा सरकार... मुजरा !!

    मला जे बोलायचं आहे, ते शब्दात मांडणं खुप कठीण जाईल मला.
    पण हां, तू बनवलेली कोंबडी ताटात पडल्यावर संपवायला कठीण जाणार नाही याची खात्री आहे... !!

    ReplyDelete
  2. कांदा, टमाटं आणि कढीपत्त्याचा फोटो जाम आवडला.. बाकी दिसायला अप्रतिम दिसतंय सगळं.. जहबहर..

    ReplyDelete
  3. सुहास, आनंद धन्यवाद. :)

    ReplyDelete
  4. बापरे !!!! प्रचंड.....

    ReplyDelete
  5. तुझी गटारी सुरु झाली वाटते.......सगळं कस जमत रे तुला??????
    तुला ही शुभेच्छा !!!

    ReplyDelete