जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Wednesday, 20 July 2011

मेदुवडा

हल्ली किचन मध्ये जाउन काही खास बनवण्याचा उत्साह नसतो. पण दुपारी एका मित्राने फोन केला. फोनवर माझ्या ब्लॉगच बरच कौतुक केल. (आमच विमान लगेच हवेत.) मग त्याने हळुच पिल्लु सोडलं की तो संध्याकाळी घरी येतोय. (हवेतल्या विमानाच क्रॅश लँडिंग..)
आता आयत्या वेळी काय करावं बरं? थोडा वेळ डोक खाजवल्यावर संध्याकाळच्या खादाडीसाठी मेदुवडे करायच ठरवलं.
लंच टाईम मध्ये घरी जाउन डाळ भिजत घातली. बाकी कस काय ते पुढे .....

साहित्य :



२ वाट्या उडदाची डाळ.



१ वाटी बारीक चिरलेला कोबी.
१ मध्यम कांदा (बारीक चिरलेला).
२-३ मिरच्या (बारीक चिरलेल्या).
१ इंच आलं (लहान तुकडे करुन).
थोडीशी कोथिंबीर.
२ कडिपत्त्याची पाने.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.

कृती :

२-४ तास भिजत ठेवलेली उडदाची डाळ पाणी काढुन टाकुन थोडी भरड वाटुन घेतली.



वाटलेल्या पिठात कांदा, कोबी, आलं, मिरची, कडिपत्ता, कोथिंबीर आणि मीठ टाकुन एकत्र करुन घेतले.



एकीकडे कढईत तळण्यासाठी तेल तापत ठेवल.
एका स्वछ झिपलॉक /प्लॅस्टिकच्या पिशवीवर पीठाचा गोळा घेउन, हलक्या हाताने दाब देत वडा थापला. मधोमध एक छोटस भोक पाडल.
वडा अलगद हाताने उचलुन तेलात सोडला. (हे सगळं लिहायला/वाचायला कित्ती सोप्पय नाही? Wink )
पण शेवटी पोपट झालाच. पिशवी वरुन उचलत वडा तेलात सोडतानाच त्याने असा काही आकार घेतला की ज्याच नाव ते. मित्राला आणि मलाही भुक सपाटुन लागली होती. शेवटी मेदुवड्याच्या आकाराचा नाद सोडुन सरळ गोळाभजीच्या आकाराचे वडे केले.



चार पाच भज्या सदृश्य वडे पोटातल्या कावळ्यांना अर्पण केले. ते शांत झाल्यावर माझ्यातला 'कलाकार'(?) हट्ट सोडायला तयार होईना.
म्हणुन यावेळी हातावरच मेदुवड्याचा आकार देउन वडे सरळ तेलात सोडले.
वेडे वाकडे का होईनात पण या वेळेस मेदुवड्या सदृश्य लुक आला खरा. Smile




नारळाच्या चटणी सोबत कुरकुरीत मेदुवडे.

8 comments:

  1. ह्या ब्लॉगचे जेव्हढ कौतुक करावे तेव्हढे थोडेचं...मस्त जमलेत मेदुवडे....कधीकधी काय बनवावे सुचतच नाही..पण आज मेदुवडे बघुन मलाही खावसे वाटत आहेत....अप्रतिम लुक !!!

    ReplyDelete
  2. तुझी नि त्या पानाची दृष्ट काढाविशी वाटते.
    किती लाजवतोयंस बायकांना! ;-)

    ReplyDelete
  3. >>तुझी नि त्या पानाची दृष्ट काढाविशी वाटते.
    थँक्यु कांचन ताई.
    >>किती लाजवतोयंस बायकांना! ;-)
    :p

    ReplyDelete
  4. गणपा, आज प्रथमच तुझ्या ब्लॉगवर आले. एकदम झकास! भूक लागली बघ ते वडे पाहून. मस्त मस्त!

    ReplyDelete
  5. धन्स भानसताई. ब्लॉग आवडला हे ऐकुन बरं वाटल. :)

    ReplyDelete
  6. प्रतिक
    तुमचा ब्लॉग नेहमीच वाचनात असतो. आणि यातील बरेचसे पदार्थ मी (यशस्वीरित्या) केलेले आहेत.
    नवीन लग्न झाल्यामुळे या ब्लॉग च्या जास्त विज़िट्स होत आहेत आणि मला उपयोगीही पडत आहे.

    मेदुवडा उत्तम जमला आणि पीठ थोड कमी पातळ ठेवल्याने भोकाचे मेदुवडे छान वळले गेले.

    ReplyDelete