जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 2 September 2012

वांगी भात

काय मंडली काय चाल्लावं? रैवारचं नल्ली बल्ली फोडलावं कं नाय? आज जल्ला आमच्या हतं मार्केट बंद. आन माजा फिरीज पन रोडावलता. त्यात हतं मिपावं एकाव-एक धागेकाडुन, मिपाशी कुक मंडली माजं डोस्कं फिरवुन रायली. जल्ला त्यातला एक पदार्थ घरान अशेल तर शप्पत. फिरीजमन डोकावलं ता एक वांगं तेवरंच भेटलं. आता ह्याचा काय कराचां म्हनुन थोडा डोस्कं खाजवलन. थोडं सामानाची जुलवा जुलवं केली नं ह्यो बग मीनी काय केला तं.




आवरलं असेन तर मंग कसं काय केला त सांगतव. वांगं आवरत नसेन तर इकरुनच कल्टी मारली तरी चालन.
सगल्यान पैलं तर वांगींभात मसाला आना मार्केटान. नय भेटला तरी वांदा नाय. मी सांगतं नं कसा बनवाचा तो..



२ मोठे चमचे चना डाल.
२ मोठे चमचे उडिद डाल.
२ चमचे धने (नसतीन तरं धना पुड)
३-४ लाल सुक्या मिरच्या (त्यावं नसतीन तर लाल तिखटं.)
१ छोटा चमचा मेथी दाने.
१ छोटा चमचा जीर.
१ छोटा चमचा खसखस.
थोडा हिंग.
२-३ वेलच्या.
दालचिनी १ इंच.
३-४ लौंगा



ह्ये जकलं कोरडंस भाजुन घ्याचं. (मिरची नं धने नसतीन तर त्या पावडरी गॅस बंद केल्यावं टाकाच्या.



सगलं गार झाल्यावं मिक्सरान टाकुन पाऊडर करुन घ्याची. (माजी मोठी माय त्यात सुकं खोबरं बी टाकाची. पन मंग तो मसाला जास्त दिस टिकाचा नाय, लगेच वापरावा लागाचा. म्हनून मीनी नाय घात्ला.)
वाटान घाटन झाला तं आता मेन डिशकडे वलु. पैले एक वाटी भात मोकला शीजवून घ्या. तुमाना बासमती आवरत असनं तर तो घ्या पण त्ये काय कंपल्सरी नाय. मीनी तर सादा कोलम घेतला. हा पण भात एकदम सुट्टा झाला पायजे. नाय तर वांग्याची खिचडी खावी लागल.



१ लहान चमचा मोहरी.
१-१ लहान चमचा चना डाल, उडीद दाल. (या दोनी १०-१५ मिनिट पान्यात भिजवाच्या.)
कडीपत्ता
३-४ हिरव्या मिरच्या.
१/२ चमचा हलद.
२ मोठे चमचे सुकं खोबरं.
थोडी चींच (आंबट आवडत असन तर.)
तमाल पत्र.
४-५ चमचे तेल.
मीठ.



येक वांगं. (लहान असतीन तर ५-६.)
१ कांदा बारीक चिरलेला.
सगल्यान पैले कढईत तेल तापवुन घ्यांच.



तेल तापलं की त्यान मोहरी, चनाडाल-उडीदडाल टाकाची. थोडं परतल्यावं त्यात कडीपत्ता मिरची कांदा तमाल पत्र टाकुन परतुन घ्याचं.



वांग्याच्या लहान फोरी करुन घ्याच्या. कांदा गुलाबी झाल्यावं मंग त्यात वांग्याच्या फोरी घालाच्या. थोडावेल शिजल्यावं मंग त्यात हलद घालाची.



वांगं शिजा लागलं की मंग त्यात ३ चमचे वांगी भात मसाला टाकाचा.



५ मिनटानी त्यात सुक खोबरं टाकाचं. आवरत असन तर मंग चींचेचा कोल टाकाचा. (पण चींच, वांग शिजल्या नंतरच टाकं हा बाला, नाय तर मग वांदा व्हाचा.) मीठ टाकांचं.

 


मसाला नं वांगं शिजलं की मंग त्यात शिजवलेला भात टाकुन एकत्र कराचा. झाकान लावून एक वाफ काराची.
मना तललेला वांग पण लय आवरतं. म्हनुन मग मी ४ वांग्याचे काप पन केले.



मंग कं बगतं कं बाला? येना जेवाला.

Thursday, 23 August 2012

स्टफ्ड चिकन ब्रेस्ट

राम राम मंडळी, काय श्रावण सुटला की नाही अजुन? ज्यांनी सोडला असेल त्यांनी ही पाककृती करुन पहायला हरकत नाही आणि जे अनंतचतुर्द्शी पर्यंत थांबणार आहेत त्यांनी नुसती पहायला हरकत नाही.
नेहमी त्याच प्रकारच चिकन खाऊन कंटाळलेल्या जीवांसाठी हा थोडासा बदल. कमी तिखट, चीज यांमुळे मुलांच्या आवडीचं तर पालेभाजी, पौष्टिक अळंबी मुलांच्या पोटत गेल्यामुळे 'पालक' पण खुश. Wink



साहित्य :



२ चिकन ब्रेस्ट.



१ ते १/२ जुडी पालक.
थोडेसे मश्रुम्स्.
३ चीजच्या चकत्या.
सॉसेज (ऑप्शनल.)
२५ ग्रॅम बटर.
काळीमीरी पूड.
मीठ चवी नुसार.

कृती :



एका भांड्यात थोडं पाणी खळखळून उकळवावं. आच बंद करुन नंतर त्यात निवडलेल्या पालकची पानं ३-४ मिनिट बुडवून (ब्लांच करावी) लगेच बाहेर काढावी.
मश्रुम बारिक चिरुन घ्यावे.
पालकची पानं ही चिरुन घ्यावी.



फ्राइंगपॅनमध्ये बटर टाकुन त्यावर पालक आणि मश्रुम परतुन घ्यावे.
बटरमध्ये मीठ असतं आणि पालकमध्ये क्षार त्यामुळे चवी नुसार किंचीत मीठ घालावं.
आच बंद केल्यावर जे पाणी सुटलं असेल ते आणि थोडसं मिश्रण बाजुला काढुन ठेवावं. बाकी पालक आणि मश्रुम वेगळे काढुन ठेवावे.



चिकन ब्रेस्टला उभा चरा देउन तो उघडावा.
वरुन खालुन मीठ भुरभुरवून १५ मिनीटं तसच ठेवून द्यावं.



एका ब्रेस्टवर चीजची चकती ठेवावी. त्याच्यावर मश्रुम, पालकचं मिश्रण ठेवावं.
आवडत असल्यास १/२ सॉसेज ठेवावा.



मग ह्या चिकन ब्रेस्टचा रोल करुन घ्यावा.

ओव्हन २००° C वर ५ मिनिटं तापत ठेवावा.
अॅ्ल्युमिनियम फॉईलमध्ये चिकन ब्रेस्ट गुंडाळुन तापलेल्या ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे शिजवून घ्यावं. (ओव्हन नसल्यास फ्राइंगपॅनमध्ये केलत तरी चालेल. वेळ कमी लागेल.)



ओव्हन मधुन काढल्या नंतर फॉईल उघडावी. आत जे वितळलेलं चीज असेल ते बाजुला काढुन ठेवलेल्या पालकच्या रसात टाकावं.
फ्राइंगपॅनमध्ये १/२ चमचा तेल टाकुन त्यात १/४ चमचा लाल तिखट टाकावं आणि चिकनचे रोल त्यात १ मिनिट परतुन घ्यावे. वरुन ताजी काळीमीरी पुड भुरभुरावी.

सॉस :
फ्राइंगपॅनमध्ये बाजुला काढलेलं पालकच मिश्रण, रस आणि वितळलेल चीज (अॅवल्युमिनियम फॉईल मधला) मंद आचेवर ठेवावं.
गरजे नुसार पाणी टाकावं. १/२ चमचा कॉरन्स्टार्च पाण्यात मिसळुन ते ही टाकावं. थोडं दाट झालं की आच बंद करावी.



Sunday, 1 July 2012

नर्गीसी कबाब




काय मंडळी कशी झाली आषाढी एकादशी? साबुदाण्याची खिचडी/वडे, भगर , उपवासाची भाजी, हाणलीत की नाही?
या तर मग कालच्या उपवासावर उतारा घेऊया. आजचा पदार्थ थोडा वेळ काढु आहे. पण जीभेचे चोचले पुरवायचे तर पेशंस हवेतच नाही का? Smile
चला तर लागुया तयारीला.

साहित्य :
ग्रेव्हीसाठी :



१ मोठा कांदा बारीक चिरलेला.
२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
१/४ लहान चमचा हळद.
१-२ लहान चमचे लाल तिखटं.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.

कबाबसाठी :



१/२ किलो मटण.
१-१/२ चमचा आलं लसुण पेस्ट.
१ लहान कांदा.
२ चमचे लाल तिखट./ ३-४ लाल मिरच्या.
१ चमचा जीर.
१" दालचिनी.
४-५ लवंगा.
१०-१५ काळीमिरी.
१ वेलची.
२ हिरव्या मिरच्या.
कोथिंबीर.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.



अंडी. (एक सोडुन बाकीची उकडून घ्यावी.)
३/४ वाटी चणा डाळ. (३-४ तास भिजवलेली.)
ब्रेड क्रंम्स्
तळण्यासाठी तेल.

कृती :



कुकरमध्ये २ चमचे तेलावर कांदा गुलाबी होईस्तो परतुन घ्यावा. त्यात लाल तिखट, खडा मसाला, हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्यावं.



मसाल्यात मटण टाकुन परतुन घ्यावं. थोड पाणी वाढवुन, कुकरचं झाकण लावुन ३-४ शिट्या घ्याव्या.
मटण शिजत असतानाच बाजुला एका भांड्यात थोडं पाणी टाकुन चण्याची डाळ शिजवुन घ्यावी.



कुकर थंड झाला की मग झाकण काढुन त्यात चवी नुसार मीठ टाकावं आणि पाणी आटे पर्यंत परत शिजवावं.



गार झाल्यावर, मटण, शिजवलेली चणा डाळ आणि कोथिंबीर (पाणी न टाकता) मिक्सरमध्ये वाटुन घ्यावं.



उकडलेली अंडी सोलुन घ्यावी. वाटलेल्या मिश्रणाची पारी करुन त्यात अंड ठेवुन पारी बंद करावी.



एका बशीत अंड फेटुन घ्याव. दुसर्‍या बशीत ब्रेड क्रंम्स् घ्यावे. आवरणातली अंडी फेटलेल्या अंड्यात आणि ब्रेड क्रंम्समध्ये घोळून  घ्यावी. नंतर ती हलक्या सोनेरी रंगावर तेलात तळुन घ्यावी.



एकीकडे मटण शिजत असताना ग्रेव्हीची सुरवात करावी. कढईत २ चमचे तेलावर कांदा परतुन घ्यावा.
त्यात लाल तिखट, हळद आणि दही टाकुन चांगल एकत्र करावं. आवश्यकते नुसार पाणी आणि मीठ टाकावं.
.

नान, रोटी बरोबर वा नुसतंच स्टार्टर म्हणुन सर्व्ह करावं.






Sunday, 17 June 2012

चीज मश्रुम्स



राम राम मंडळी, एका  छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. :)

साहित्य : 
अळंबी (मश्रुम्स) ,




सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(अंड न आवडणार्‍यांना अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात मिसळुन ते दाट मिश्रण वापरता येईल.)



तळण्यासाठी तेल.

कृती : 



फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.



अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.




ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.



सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.
तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.


चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.


.

.