जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 26 January 2014

अळूचं फदफदं

गेल्या आठवड्यात पहिल्यांदा इथे भाजी मार्केटमध्ये अळूचं पान पाहिलं तेही कचरर्‍यात पडलेलं. इथले लोक अळूच्या पानांना काय म्हणतात ते माहित नसल्याने मग त्याच्याकडे बोट दाखवून विक्रेत्याला विचारलं की ही पानं कुठेशी मिळतील? त्यावर म्हणाला ही आम्ही विकत नाही कोथिंबीरीसारख्या भाज्या ने-आण करताना पॅकिंग म्हणुन वापरतो. मग त्याला विचारलं पुढल्यावेळी माझ्यासाठी थोडी वेगळी आणशील का? तर त्याने शुक्रवार पर्यंत थांबायला सांगीतल. त्याचा फोन नंबर घेऊन ठेवला आणि गुरुवारी त्याला पानं आणण्याची आठवण करुन दिली. परवा त्याने कबुल केल्या प्रमाणे पानं आणुन दिली. आपल्याकडे तशी ही बारामाही असणारी पानं पावसाळ्याच्या आस पास बाजारात सर्रास दिसतात. गावाला मात्र घरी अंगणात-परसदारी मोकळी जागा असल्यानं वडीचं आणि भाजीचं अळू नेहमी असतं.
शुक्रवारी पानं मिळतीलच ही खात्री होती म्हणुन फदफदं करायचा बेत फिक्स होता. दोन दिवस आधीच वाल भिजत घातले होते. शनिवार पर्यंत मोडही आलेले. आईला फोन करुन एकादा पाककृतीची उजळणी करुन घेतली. हो आयत्यावेळी पोपट नको व्हायला काय? Wink

साहित्य : 



१ वाटी/बाऊल बिरडं. (सोललेले वाल)
१ नग मध्यम आकाराचा कांदा
५-६ अळूची पानं देठां सकट
१-२ हिरव्या मिरच्या



वाल नसले तर चणे/ चणाडाळ ही चालेल.



फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग, असल्यास कडीपत्याचं पान.
१/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, २ पेर दालचीनी, १ १/२ चमचा आलं-लसुण पेस्ट.
चिंच-गुळ, मीठ स्वादानुसार.

कृती : 



अळूची पानं बारीक चिरुन घ्यावी. देठाची सालं काढून त्याचे ही बारीक तुकडे करुन घ्यावे.
मिरच्यांना उभा चर देऊन तुकडे करुन घावे. कांदा मध्यम,लांब-उभा चिरुन घ्यावा.



मोहरी, मिरची, कडीपत्ता, हिंग यांची फोडणी करुन त्यात कांदा, हळद टाकुन परतावं.
नंतर त्यात अळूचे देठ आणि चिरलेली पानं घालावी. लाल तिखट, किंचीत मीठ भुरभुरुन एकत्र करावं.



अळूची पानं थोडी बसली की मग त्यात आलं-लसुणाची पेस्ट टाकावी, गरम मसाला, दालचीनीची वाटुन टाकावी.
नंतर त्यात बिरडं घालुन हलक्या हातानं सगळं एकत्र करुन घ्यावं. चवी नुसार मीठ घालावं.



थोडंस पाणी टाकून, वर झाकण आणि त्यात पाणी ठेऊन मंद आचेवर भाजी शिजत ठेवावी. (चणा असेल तर कुकरला लावली तरी चालेल, पण बिरड्याचं अगदीच पीठ होऊन जातं तेव्हा शिट्या घेताना काळजी घ्यावी.)
वाल संपुर्ण शिजले की मगच त्यात चींचेचा कोळ आणि गुळ टाकुन पुन्हा उकळी आणावी. रस भाजी हवी असल्यास गरजे नुसार पाणी वाढवावं किंवा मग आटवावं.

  

 .


पराठा अन वाफाळत्या भातासोबत ताट वाढलय.
आज साधाच बेत आहे, या जेवायला. Smile

6 comments:

  1. तोंपासु!
    आज घरात Alu आणलाय,
    चल ये बनवायला!!

    ReplyDelete
  2. प्रतिक, तुमच्या सर्वच पाकृ अप्रतिमच अाहेत विषेशत: तुमच्या आईच्या पाकृ तर जपून ठेवाव्या अशाच आहेत म्हणून मी तुमचा ब्लॅागच जपून ठेवला आहे.
    तुम्ही २०१५ मध्ये एकही पाकृ न देण्याचे कारण कळेल का?
    तुमच्यासह तुमच्या आईंना अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete