जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Thursday, 27 January 2011

माझं क्रिकेट जीवन.

विश्वचषकाचे पडघम वाजु लागलेत. क्रिकेटच्या जुन्या आठवणींनी अंमळ नॉस्टॅल्जिक झालोय. म्हणुन आज खाऊगल्ली सोडुन जरा दुसर्‍याच गल्लीत फेर-फटका मारतोय.

~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.

बालपणी ज्या काही गोष्टींच बाळकडू पाजल गेल त्यातील एक प्रमुख म्हणजे क्रिकेट. तेव्हा रेडिओ, ट्रांझिस्टर जरी घराघरांतुन आढळुन येत असले तरी टीव्ही मात्र चैन या प्रकारातच मोडत होता. आम्ही गोरेगावला एका हाउसिंग बोर्डाच्या चाळ वजा इमारतीत रहायचो. मी असेन तेव्हा ४-५ वर्षांचा. घरात आम्ही ५ माणसे. आई, बाबा, दिदि, मी आणि माझा मामा. सगळे क्रिकेट वेडे. इतकच काय अगदी आधीच्या पिढीतली आईची आत्या सुद्धा क्रिकेटची षौकीन. क्रिकेटचा मोसम चालु झाला की तरुणांच्या कानाला ट्रांझिस्टर चिकटलेला दिसायचा. (हो तेव्हा आता सारखं १२ मास क्रिकेट नसायचं.) आपल्या संघाकडुन एखादा चौकार, षटकार (हे फार दुर्मीळ असायचं तेव्हा) पडला वा प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडली की नुसता जल्लोश व्हायचा. मैदानावरच्या लोकांच्या गोंगाटात केली जाणारी ती आकाशवाणीवरची कॉमेंट्री इतकी जिवंत असायची की आपण जणु प्रत्यक्ष तिथेच आहोत असा भास व्हायचा. म्हणुनच नंतर जेव्हा टिव्ही आला तेव्हा टिव्हीला मुका करुन रेडिओला प्लेबॅकच्या कामगीरीवर बसवल जायच. एकीकडे डोळे सामना पहातायत आणि कान रेडिओला चिकटलेले अस दृष्य मी बरेच ठिकाणी पाहिलय. याचा सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे टिव्हिवर वरंवार येणार्‍या जाहितींच्या मधले काही मोक्याचे निस्टणारे क्षण टिपता यायचे.
आमच्या घरी बिल्डिंग मधला पहिला टिव्ही आला तेव्हा दर शनिवारी-रविवारी संध्याकाळी जवळ जवळ आख्खा मजला आमच्या घरी असायचा. घराला थेटराचच स्वरुप यायच. :) आणि जेव्हा क्रिकेएटचे सामने चालु व्हायचे तेव्हाचा तर माहोल विचारुच नका. वडिलधारी मंडळी सोफ्यावर खुर्चीवर ठाण मांडायचे. त्यांची मंडळी खाली चटईवर. आणि बाकीची चिल्ली पिल्ली त्यांच्या आकारमाना नुसार कुणाच्या मांडीवर, कुणाच्या पुढ्यात तर काही चटई पुढे लादीवर. कार्यक्रम आटोपला आणि मंडळी आपापल्या बिर्‍हाडी गेली की झाडलोट करताना चण्या-शेंगदाण्याची टरफल हमखास दिसायची.

बालमोहन-शारदाश्रम या शाळांतल्या मुलांसारख, खेळ विभागातल भाग्य आमच्या नशीबी नव्हत. अहो जिथे फुटबॉल/व्हॉलीबॉल मधली हवा लाथा, बुक्क्या मारुन कमी होते असली कारण देउन साध्या साध्या खेळांपासुन आम्हाला वंचीत ठेवल जायच तिथे क्रिकेटच्या बॅट, पॅड, स्टंप असली महागडी साहित्य असलेल्या खेळाच तर नाव काढायची पण बंदी. (अतिशयोक्ती वाटेल वा भाईकाकांच वाक्य चोरतोय अस वाटेल पण हे १००% सत्य आहे.) आम्ही खेळायचो ते केवळ लंगडी, कब्बड्डी, लांब आणि उंच उडी असले शारिरीक खेळ. मधल्या सुट्टीत मात्र आम्ही एखादा चपटा दगड घेउन शाळेच्या ओपन हॉल मध्ये फुटबॉल खेळायचो. तिकडे पण क्लेम लागलेले असायचे. हॉल एकच त्यामुळे अनेक वर्गातली पोर टपलेली असायची. रोज कोणीतर आपल्या डब्याला मुकायचा. कारण मधल्या सुट्टीची घंटा झाली की एक जण सुसाट हॉल कडे पळायचा क्लेम लावायला. बाकीचे मग डब्यातले जिन्नस माकडा सारखे तोंडात कोंबुन मागाहुन यायचे. पुढे मागे काही जण हिम्मत करुन बॅट घेउन येऊ लागले. बॉल काय दप्तरात लपवुन आणाता यायचा. पण बॅट आणण हे खर जोखिमेच असायच. चुकुन जर एखादे दिवशी कुठली काच फुटली तर ओरडा आणि मार बसायचाच. त्याच दु:ख नसायच ते तर पाचविलाच पुजलं होतं. पण सगळ साहित्यसुद्धा जप्त व्हायच. वर घरी हजेरी घेतली जायची ती वेगळी.

शाळेत जरी क्रिकेटसाठी एकदम प्रतिकुल परिथिती असली तरी घरी तस नसायच. इमारतीच्या गच्ची वर इतकच कशाला गॅलरीत सुद्धा टुर्नामेंट्स भरवायचो आम्ही. एकटप्पा आउट. बॉल मजल्यावरुन /गच्चीवरुन खाली गेला आउट, कुणाच्या काचेला /दरवाज्याला लागला आउट. असल्या कसलेल्या क्ष्रेत्र रक्षकांना चुकवत बॅटींग करायची हे खायच काम नसायच. मग तिकडे अगदी २०-२५ धावा केल्या की शतक ठोकल्याचे भाव चेहेर्‍यावर आसयचे. कॉलेजमध्ये गेल्यावर दिवस पालटतील अस वाटलं होत.
पण तिथे ही फारस प्रसन्न चित्रं नव्हत. पहिल्या दिवशी मोठ्ठ मैदान पाहुन खुश झालो होतो मी. पण लवकरच तो उत्साह मावळला. कँपस मध्ये पण आजु बाजुला कॉलेजेस तरी किती? आर्ट्स, कॉमर्स, सायंस, इंजिनियरिंग, डिप्लोमा, मॅनेजमेंट, आयुर्वेदिक आणि ही सगळी कमी म्हणुन वर शाळा ही. आता इतक्या सगळ्या कॉलेज मध्यला मुलांना मिळुन एक मैदान म्हणजे तुम्हीच विचार करा. एका वेळी मैदानावर १५-२० सामने चालु असायचे. कोण कुणाच्या चेंडु मागे धावतोय काही कळायच नाही.

मध्यंतरी गोरेगाव सोडुन सांताक्रुझला रहायला गेलो होतो. तिथे कॉलनीत मोठ्ठ मैदान होत. पण तिथे जास्त करुन फुटबॉलच खेळलं जायच. कॉलनीतले रस्ते मस्त ऐसपैस होते आणि रहदारी अशी नसायचीच त्यामुळे ते रस्त्यांनाच आम्ही मैदान मानलं. त्याच सुमारास बाबांनी मला काश्मिरवरुन मस्त सिझनची बॅट आणली होती. पण त्या बिचारीने सिझनचा बॉल जन्मात पाहिला नाही. आमचा सगळा कारभार सुरवातीला लाल रबरी चेंडु आणि नंतर टेनीसचा टणक चेंडु यावरच चालायचा. वेग वेगळ्या बिल्डिंगच्या/कॉलनीच्या टिमशी, एक चेंडु आणि २१ रुपये बोली वर मॅचेस लावल्या जायच्या. पुढे चौकात रात्री हॅलोजन लावुन बॉक्स क्रिकेटच्या टुर्नामेंट्स सुद्धा भरवायचो.

नोकरीला लागल्यावर हे सगळं खेळण कमी कमी होत गेल. पण तोवर सचिन रमेश तेंडुलकर नावाच्या तार्‍याचा उदय झाला होता. स्वतःच्या खेळाची भुक त्याची खेळी पहाण्यावर भागवु लागलो. अश्यात एक दिवस परदेशातुन नोकरीच बोलावण आल. आणि माझा मुक्काम मुंबई वरुन दुबईला हलला. दुबईला मी एका शिपींग कंपनीत आयटी डिपार्ट्मेंट मध्ये लागलो. ८-९ सह-कंपन्या होत्या. सगळ्यांशी ओळख झाली नव्हती. जास्त करुन भारतिय पाकिस्तानी आणि लंकन लोक आमच्या कंपनीत होते. त्यामुळे परदेशात असुनही कधी भारतापासुन लांब असल्याच जाणवत नव्हतं. एक दिवस एक माणुस माझ्याकडे चौकशी करत आला. "आप मुंबईसे हो?.....तो फिर किरकेट तो खेलेही होंगे?" म्हटल हो. "तो फिर आज शाम को काम के बाद रुक जाना थोडी देर." मागाहुन त्याच नाव अमिर आणि तो पाकिस्तानी असल्याच कळल. संध्याकाळी ५:३० ला घरी जायला निघालो. खाली १५-२० माणस थांबली होती. मी गेल्यावर अमिरनं माझी सगळ्यांशी ओळख करुन दिली. त्यान माहिती पुरवली की पुढच्या महिन्यात शिपिंग-ट्रॉफी आहे. दुबईतल्या सगळ्या नावाजलेल्या शिपिंग कंपन्या त्यात भाग घेतात. त्यासाठी आपल्या कंपनीच्या टीमच सिलेक्शन आहे. तेव्हा तु पण चल. माझ्या साठी हा सुखद धक्का होता. ४-५ गाड्यामध्ये आम्ही सगळे कोंबले गेलो आणि गाड्या मैदानाकडे सुसाट निघाल्या.
मैदानावर आल्यावर सगळ्यात आधी मलाच पॅड बांधायला सांगीतल. मी म्हटल पॅड नको मी तसाच करतो बॅटिंग. २ क्षण त्याने माझ्याकडे आदराने पाहिल. "तेरी मर्जी." मी पीच कडे कुच केल. तोवर टाळक्यात प्रकाश पडला नव्हता. पहिला बॉल सुंम्म्म्म्म्म करत कानाच्या बाजुने गेला आणि धाबं दणाणलं.. चक्क सिझनचा बॉल होता. मी तडक किट कडे धाव ठोकली. अमिरची नजर चुकवत पॅड हेल्मेट सगळ घेतलं. बाप जन्मात पहिल्यांदा पॅड बांधले होते. ते सगळ लटांबर सांभाळत चालताना भयंकर अवघडल्या सारख झाल होतं. धावणार कसं हा प्रश्न आवासुन पुढ्यात होता. पण ती नुसतीच नेट प्रॅक्टिस होती त्यामुळे पहिल्याच दिवशी धावाधाव करायची पाळी आली नाही. बरेच जण मारुन मुटकुन आणलेले वाटले. त्यामुळे वासरात लंगडी गाय म्हणुन माझा नंबर लागला. कॉलेज सोडल्या पासुन जवळ जवळ ३-४ वर्षांनी खेळत होतो. पहिले दोन दिवस मजेत गेले. आणि तिसर्‍या दिवशी जी अवस्था झाली की ज्याच नाव ते. हात, खांदे, पाय, कंबर सगळ्यांनी अवयवांनी बंड पुकारल. रुममेट्स दात काढत होते. पुढे नेट प्रॅक्टिससाठी ऑफिस मधुन १ तास लवकर जायची परवानगी मिळाली. आठवड्यातुन ३ दिवस प्रॅकटिसला जायचो. लवकर सटकायला मिळायच म्हणुन मी रुममेट्सना दात दाखवायचो. (ऑफिस मधेले मित्रच रुममेट्स होते.)

तहान लागल्यावर विहीर खणायला घेतली की जी होते तिच गत आमची २००० च्या स्पर्धेत झाली.
अगदीच तळाला नव्हतो, पण आदल्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडी प्रगती होती. आमच्या कंपनीचा अरबी मालक स्वत: सामने पहायला आला होता. जरी हरलो तरी त्याने कौतुक केलं. आणि पुढच्या मोसमात सुरवाती पासुनच सराव करा असा सल्ला दिला. त्यासाठी आर्थीक पाठबळाचीची तरतुद केली. स्वतः मालक इतका इंटरेस्ट घेतोय म्हटल्यावर आम्हाला अजुन स्फुरण चढल. दुबईतली तेव्हाची बहुतेक सगळी मैदान म्हणजे मरुभुमीवर वसवलेली. एखाद गवताच पात दिसेल तर शप्प्थ. आणि पीच म्हणजे सिमेंटचा कोबा आसायच. फक्त फायनल्स खर्‍याखुर्‍या हिरव्यागार मैदानावर व्हायची. पण तिथे आमचा संघ फक्त प्रेक्षक म्हणुनच जायचा. आमचा संघ म्हणजे भारतीय उपखंडातल्या जागतिक ऐक्याचा नमुना होता. ४ भारतीय, ४ पाकिस्तानी, ३ श्रिलंकन असे मोजुन ११ जण असायचे. १२ वा राखीव खेळाडु दादा पुता करुन आणावा लागायचा.
नुसती नेट प्रॅक्टिस करुन भागणार नव्हत. कारण नेट मध्ये सगळेच शेर असायचे. मग हळु हळु दर शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही मॅचेस खेळु लागलो. (याबद्दल लग्न झाल्यावर बायकोच्या कैक शिव्या खाल्यात.) मॅचेस २०-२० षटकांच्याच आसायच्या. कारण दुबईच्या रखरखत्या उन्हात ४० षटक मैदानावर वावरायच म्हणजे खायच काम नव्हत. आम्ही २००१ आणि २००२ मध्ये उप-उपांत्य फेरी पर्यंत पोहोचलो. वर्षागणिक जोष वाढत होता. २००३ मध्ये पहिल्यांदा त्या हिरव्या मैदानावर खेळायच भाग्य लाभलं तेही फ्लड लाईट्स मध्ये. अंतिम सामन्यात हरलो पण तीन वर्षातच अगदी पायथ्यापासुन ते माथ्या पर्यंतचा पल्ला गाठला होता हे आमच्यासाठी खुप होत.

त्या वर्षी एका नव्या स्पर्धांची घोषणा झाली. ६-६ षटकांचे सामने. ७ खेळाडुंचा संघ आणि फक्त ६ षटकं. परत त्यात प्रत्येकाने गोलंदाजी केलीच पाहिजे (किपर वगळता) हा नियम आणि एखाद्या खेळाडुने ३१ वैयक्तिक धावा केल्या की त्याला बळजबरीची व्हि.आर.एस. आताशी आमचा संघ जरा बरा खेळु लागला होता. कंपनीत आमचा भाव वधारला होता. म्हणुन ऑफिसमधले बाकीचेही लोकही क्रिकेट खेळण्याकडे ओढले जाउ लागले. संघात वर्णी लावण्यासाठी चुरस वाढली. आणि त्या नादात मी गोलंदाजी सोडुन यष्टिरक्षणाची कामगीरी हाती घेतली. त्या स्पर्धेत पहिल्याच एंट्रीत आम्ही उप-विजेते झालो. मालक भलताच खुश झाला. नंतर वेगवेगळ्या स्पर्धांतुन आम्ही खेळलो. पण मुख्य लक्ष्य होत शिपिंग ट्रॉफी. ही शिपिंग ट्रॉफी फिरती आसायची जो संघ सलग तीन वर्ष जिंकेल त्याला ती कायमची मिळणार होती.

२००४ मध्ये आमचा कर्णधार कंपनी सोडुन गेला. उप-कप्तानाकडे सुकाणु आलं. गांगुलीने जे भारतासाठी केल तेच या पठ्यानं आमच्या संघात केलं. शेवटच्या सामन्यात हटकुन नांगी टाकणार्‍या आमच्या संघात एक नवा त्वेष भरण्याच काम त्यान केल. हळु हळु वेगवेगळ्या स्पर्धांतुन निव्वळ हजेरी लावणारे आम्ही, मैदानं मारुन येऊ लागलो. अखेरीस तो सोन्याचा दिवस उगवला. २ एप्रिल २००४ साली आम्ही शिपिंग ट्रॉफी पहिल्यांदा हातात घेतली. त्यानंतर मात्र मग मागे वळुन पाहिल नाही. २००४ ते २००८ सलग ५ वर्ष आम्ही जेतेपद पटकावल. २००६ सालीच शिपिंग ट्रॉफी कायमची आमच्याकडे आली.
नंतर इनस्पोर्ट्स मध्ये शेड वजा स्टेडियम मध्ये इनडोअर क्रिकेट स्पर्धेतही भाग घेतला. हे इनडोअर क्रिकेट पण धमाल असायच. सगळ्या बाजुंनी जाळी. अगदी वर छताला सुद्धा जाळी असायची. १० ते १२ षटकांचे सामने असायचे. एक जोडी मैदानात उतरायची त्यांनी किमान २ षटकं खेळायचीच. बाद झाले तरी परत खेळायचं. पण एकदा बाद झालात की ५ धावा वजा व्हायच्या. बरेच वेळा तर काही संघ (-) निगेटिव्ह धावसंख्या उभारुन यायचे. तिथे पदार्पणातच विजेतेपद पटकावल.

२००९ मध्ये जॉब सह देश पण बदलला. तव्हा पासुन क्रिकेट खेळण तिथेच थांबलय. मागाहुन कळल की आम्ही दुबईत ज्या मैदानांवर खेळायचो ती सर्व एका मोठ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी बळी गेली.
तो जोष, तो उत्साह, ती रग अजुन आहे. आजही क्रिकेट पहाताना हात सळसळतात. पण सध्या केवळ बेंबिच्या देठापासुन ओरडत भारतीय संघाला प्रोत्साहन देण्या पलीकडे काही करु शकत नाही.

ह्या काही चित्ररुपी आठवणी.

मरुभुमी.





अंतिम सामन्याचा हिरवा गालीचा.



जल्लोष




हीच ती फिरती ट्रॉफी.



हे मानचिन्ह




आमचा संघ मालकांसहीत.




आणि हे ते इनडोअर क्रिकेटच मैदान

No comments:

Post a Comment