जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 3 July 2016

आंब्याचा बदामी हलवा

नमस्कार मंडळी,
  एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे.
साहित्यः

२ वाट्या आमरस, १ वाटी कॉर्न स्टार्च, २ वाट्या साखर (आमरसाच्या गोडीनुसार कमी जास्त)

सुका मेवा (काजू, बदाम) , केसर, वेलची पूड, साजुक तूप
कृती :

एका नॉनस्टिक कढईत २ चमचे तूपात आमरस घालून परतावा.

एक उकळी आली की कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून टाकावं व गुठळ्या न होऊ देता ढवळत राहावं. रस थोडा दाटसर
झाला की त्यात साखर टाकावी.

मधे मधे चमचाभर तूप सोडत रहावं. आणि मिश्रण उलथण्याने हलतं ठेवावं. यामुळे त्यात हवेचे बुडबूडे तयार होत राहतील. ही प्रक्रिया किमान ४०-५० मिनिटे चालू ठेवावी.

जेव्हा कडेने तूप सुटू लागेल तेव्हा त्यात सुक्यामेव्याचे काप, वेलचीपूड, केशर टाकावे.

जेव्हा मिश्रण एकजीव गोळा होईल तेव्हा हलवा शिजत आला असे समजावे. जितका जास्त वेळ शिजवू तेवढा तो चिवट होत जाईल.

एका पसरट भांड्याला तुपाचं बोट लावून त्यात मिश्रण किमान २-४ तास थंड करत ठेवावं. लवकर थंड करण्यासाठी फ्री़जचा वापर टाळावा. थंड झाल्यावर सुरीने काप करावे.

No comments:

Post a Comment