मित्रांबरोबरच्या ओल्या कट्ट्याची सांगता करताना हटकुन मागवले जाणारे जे दोन पदार्थ आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जीरा राईस + तडका मारलेली डाळ आणि दुसरा हा दाल खिचडा. पैकी उपहार गृहातला दाल खिचडा मी हल्ली हल्ली पर्यंत टाळत आलोय. अहो हाटिलात जाउन काय ती पचपचीत पिवळी खिचडी मागवायची? एकदा मित्राला विचारलेही की 'का लेका ती पचपचीत खिचडी मागवतोस?' त्यावर हवेत गिरक्या घेणार्या आपल्या पतंगाला सावरत तो म्हणाला 'आता आणि चावायचे कष्ट कोण घेणार?'
असो, यावेळी अश्याच एका कट्ट्या नंतर चुकुन दाल खिचडा माझ्या पुढ्यात आला. एकदा का ताटात अन्न आलं की मी त्याचा अपमान करत नाही मग ती अगदी शेपुची भाजी असो. पहिला चमचा तोंडात गेल्यावर एखाद्या ४-५ वर्षाच्या पोराने घसरगुंडीवरुन स्वतःला झोकुन द्यावे त्या प्रमाणे तो घास माझ्या बत्तीशीला कसलेही कष्ट न देता जीभेवरुन जो घरंगळला तो थेट जठरातच जाउन विसावला. आणि मला माझ्या मित्राच्या मुक्ताफळाचा अर्थ कळला.
तर अशी ही दाल खिचडी/खिचडा आज (चक्क रैवार असुन) खाण्याचा मुड आला.
साहित्य :
१ वाटी तांदुळ. (आंबे मोहर/कोलम) (शक्यतो बासमती तांदुळ टाळा.)
१/२ वाटी मुगडाळ. (साला सकट मिळाली तर उत्तम.)
२ मोठे चमचे तुर डाळ. (ऑप्शनल.)
१ मध्यम कांदा चिरलेला.
२ मध्यम टॉमेटो चिरलेला.
२-३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन.
१ इंच आलं बारीक चिरलेलं.
५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरलेला.
कोथिंबीर.
२ तमाल पत्रं.
१/२ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे लाल तिखट.
२ लहान चमचे जीरं.
चिमुटभर हिंग.
कडीपत्त्याची दोन पानं
३ मोठे चमचे साजुक तुप.
मीठ चवीनुसार.
कृती :
तांदुळ आणि डाळी किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे.
एका भांड्यात एक चमचा साजुक तुप तापवुन त्यात भिजवलेल्या डाळी आणि तांदुळ परतुन घ्यावे.
अंदाजे डाळ आणि तांदळाच्या अडिच ते तीन पट गरम पाणी त्यात घालावं. हळद हिरव्या मिरच्या आणि चवी नुसार मीठ घालावं.
झाकण ठेवुन मध्याम आचेवर शिजवत ठेवाव. अधुन मधुन पाण्याचा अंदाज घ्यावा. गरज वाटलीच तर १/२ वाटी गरम पाणी वाढवावे.
खिचडी शिजतेय तो वर एका कढईत २ चमचे साजुक तुप तापवून त्यात तमालपत्र, जीरं, हिंग, आलं-लसुण, कडीपत्ता यांची फोडणी करावी.
नंतर त्यात कांदा घालुन तो पारदर्शक होईस्तव परतुन घ्यावा. नंतर त्यात लाल तिखट आणि टॉमेटो घालुन शिजवावं.
टॉमेटो पार शिजला की त्यात ७-८ मोठे चमचे तयार खिचडी घालुन परतुन घ्यावं. आच बंद करवी.
तयार फोडणी खिचडीत ओतुन खिचडी घोटुन घ्यावी जेणेकरुन भाताची कणी मोडेल. वरुन भरपुर कोथिंबीर घालावी.
वरुन तुपाची धार सोडावी.
लो तैयार है खिचडी संग तीन यार दही, पापड और अचार.
