काय मंडळी कशी झाली आषाढी एकादशी? साबुदाण्याची खिचडी/वडे, भगर , उपवासाची भाजी, हाणलीत की नाही?
या तर मग कालच्या उपवासावर उतारा घेऊया. आजचा पदार्थ थोडा वेळ काढु आहे. पण जीभेचे चोचले पुरवायचे तर पेशंस हवेतच नाही का?

चला तर लागुया तयारीला.
साहित्य :
ग्रेव्हीसाठी :
१ मोठा कांदा बारीक चिरलेला.
२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
१/४ लहान चमचा हळद.
१-२ लहान चमचे लाल तिखटं.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.
कबाबसाठी :
१/२ किलो मटण.
१-१/२ चमचा आलं लसुण पेस्ट.
१ लहान कांदा.
२ चमचे लाल तिखट./ ३-४ लाल मिरच्या.
१ चमचा जीर.
१" दालचिनी.
४-५ लवंगा.
१०-१५ काळीमिरी.
१ वेलची.
२ हिरव्या मिरच्या.
कोथिंबीर.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.
अंडी. (एक सोडुन बाकीची उकडून घ्यावी.)
३/४ वाटी चणा डाळ. (३-४ तास भिजवलेली.)
ब्रेड क्रंम्स्
तळण्यासाठी तेल.
कृती :
कुकरमध्ये २ चमचे तेलावर कांदा गुलाबी होईस्तो परतुन घ्यावा. त्यात लाल तिखट, खडा मसाला, हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्यावं.
मसाल्यात मटण टाकुन परतुन घ्यावं. थोड पाणी वाढवुन, कुकरचं झाकण लावुन ३-४ शिट्या घ्याव्या.
मटण शिजत असतानाच बाजुला एका भांड्यात थोडं पाणी टाकुन चण्याची डाळ शिजवुन घ्यावी.
कुकर थंड झाला की मग झाकण काढुन त्यात चवी नुसार मीठ टाकावं आणि पाणी आटे पर्यंत परत शिजवावं.
गार झाल्यावर, मटण, शिजवलेली चणा डाळ आणि कोथिंबीर (पाणी न टाकता) मिक्सरमध्ये वाटुन घ्यावं.
उकडलेली अंडी सोलुन घ्यावी. वाटलेल्या मिश्रणाची पारी करुन त्यात अंड ठेवुन पारी बंद करावी.
एका बशीत अंड फेटुन घ्याव. दुसर्या बशीत ब्रेड क्रंम्स् घ्यावे. आवरणातली अंडी फेटलेल्या अंड्यात आणि ब्रेड क्रंम्समध्ये घोळून घ्यावी. नंतर ती हलक्या सोनेरी रंगावर तेलात तळुन घ्यावी.
एकीकडे मटण शिजत असताना ग्रेव्हीची सुरवात करावी. कढईत २ चमचे तेलावर कांदा परतुन घ्यावा.
त्यात लाल तिखट, हळद आणि दही टाकुन चांगल एकत्र करावं. आवश्यकते नुसार पाणी आणि मीठ टाकावं.
.
नान, रोटी बरोबर वा नुसतंच स्टार्टर म्हणुन सर्व्ह करावं.